Corona Virus : सावधान! बरं झाल्यावरही कोरोना पाठ सोडेना; वर्षभरानंतर दिसताहेत 'या' 4 समस्या By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 04:21 PM 2024-03-17T16:21:19+5:30 2024-03-17T16:36:03+5:30
Corona Virus : लाँग कोविडमुळे थकवा आणि अशक्तपणामुळे लोकांमध्ये अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांची नोंद होत आहे. जगभरात कोरोना संसर्गाची प्रकरणं नियंत्रणात असली तरी, आरोग्य तज्ञ संसर्गाच्या धोक्यांबाबत खबरदारी घेण्याचा सल्ला देत आहेत. संशोधकांनी सांगितलं की, कोरोना व्हायरस म्यूटेट होत राहतो, त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी आपण सर्वांनी सातत्याने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
लस घेतलेली असली तरीही, नवीन व्हेरिएंटपासून संसर्ग होण्याचा धोका असू शकतो. लस निश्चितपणे गंभीर आजारांपासून संरक्षण देतात. कोरोनाच्या जागतिक धोक्यांमध्ये, लाँग कोविड, ज्याला पोस्ट कोविड सिंड्रोम असेही म्हणतात, साथीच्या रोगाच्या सुरुवातीपासूनच तज्ञांसाठी हे चिंतेचे कारण बनले आहे.
कोविडनंतरची लक्षणे काही लोकांमध्ये एक वर्षापेक्षा जास्त काळ दिसून येत आहेत. लाँग कोविडमुळे थकवा आणि अशक्तपणामुळे लोकांमध्ये अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांची नोंद होत आहे. सर्वात जास्त दिसणाऱ्या चार समस्यांबद्दल जाणून घेऊया.
आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं की, कोरोना संसर्गातून बरे झालेल्या लोकांमध्ये दिसणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे दीर्घकाळ अशक्तपणा आणि थकवा येणे. काही लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
संशोधकांनी सांगितलं की, वृद्ध लोक आणि इतर आजारांनी ग्रस्त लोकांमध्ये कोविड नंतरच्या या समस्या दीर्घकाळ राहण्याची शक्यता असते. संसर्गादरम्यान, व्हायरसशी लढताना शरीरात मायक्रोन्यूट्रिएंट्सची कमतरता असते, ज्यामुळे अशा समस्या ठीक झाल्यानंतरही कायम राहू शकतात.
क्लीव्हलँड क्लिनिकच्या अहवालानुसार, कोविड-19 ची सौम्य किंवा गंभीर लक्षणे असलेल्या मोठ्या संख्येने रुग्णांमध्ये लाँग कोविडच्या बाबतीत हृदयाशी संबंधित समस्या दिसून येत आहेत. काही परिस्थितींमध्ये यामुळे हार्ट अटॅकच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.
अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या अहवालानुसार, संसर्गातून बरे झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा त्रास होण्याचा धोका दुपटीने वाढला आहे. कोरोना व्हायरसमुळे हृदयाचे गंभीर नुकसान झाले आहे आणि त्याची कार्यक्षमता कमी झाली आहे.
आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की, लाँग कोविडचा आणखी एक दुष्परिणाम हा संसर्गातून बरे झालेल्या लोकांमध्ये झोपेच्या समस्येच्या रूपात दिसून येत आहे. अभ्यास अहवालात असे आढळून आले आहे की कोविड-19 मुळे सुमारे 40% लोक बरे झाल्यानंतरही झोपेच्या समस्यांची तक्रार करतात.
यामध्ये निद्रानाश, दिवसा झोप न लागणे, रात्री अनेक वेळा जाग येणे किंवा सकाळी फ्रेश न वाटणे यासारख्या समस्यांचा समावेश होतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अशा सतत झोपेच्या समस्या केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम करतात.
द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये पोस्ट कोविड संदर्भात प्रकाशित झालेल्या संशोधनात असे म्हटले आहे की, बरे झालेल्या लोकांमध्ये बौद्धिक क्षमता कमी झाल्याचे आढळून आले आहे. त्याच वेळी, ज्या लोकांमध्ये कोरोनाची अधिक गंभीर लक्षणे होती त्यांचा आईक्यू कमी झाला आहे.
आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की कोरोना व्हायरसमुळे शरीराचे अनेक प्रकारे नुकसान झाले आहे, त्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून ज्यांना संसर्ग झाला आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि बरे झाल्यानंतर त्यांच्या संपूर्ण शरीराची तपासणी करून घ्यावी जेणेकरुन कोविड नंतरच्या समस्या वेळेत शोधता येतील आणि त्यावर उपचार करता येतील.