तुळशी लग्नच्या निमित्ताने विकत आणलेल्या आवळ्यांपासून वर्षभरासाठी बनवा 'हे' चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ! By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 01:55 PM 2022-11-05T13:55:10+5:30 2022-11-05T14:12:46+5:30
तुळशी लग्नाला आपण चिंचा, बोरे, उसाचे करवे, म्हणून आवळे असा नैसर्गिक खाऊ वाटतो. त्यानिमित्ताने सर्व गुणकारी रस पोटात जावे हा त्यामागचा मुख्य हेतू. त्याचे लाभ वर्षभर मिळावेत म्हणून हिवाळ्यात आवळ्याचे अनेक पदार्थ बनवले जातात, जे पौष्टीक असतात आणि वर्षभर टिकतात. मानसी शरश्चंद्र भोसेकर लिहितात, 'आवळा हा मूर्ती लहान पण किर्ती महान. फळांमध्ये आवळा आकाराने लहान पण गुणांनी महान आहे. आवळ्यात भरपूर प्रमाणात ' क ' जीवनसत्व असतं. आवळा पित्तशामक आहे. केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. यासाठीच आपण आवळ्याचे बरेच पदार्थ करून वर्षभर ते थोडे थोडे तोंडी लावता येतात. त्यापैकी आवळा सुपारी, मोरावळा, आवळ्याचं लोणचं, किसलेल्या आवळ्याचे लोणचं हे चार पदार्थ आपण आज शिकणार आहोत!' मोरावळा साहित्य : आवळे, साखर, आलं / सुंठ पूड, वेलची पूड. कृती : प्रथम आवळे स्वच्ध धुवून कोरडे करून किसून घ्यावे. १वाटी आवळ्याचा किस असल्यास अर्धी वाटी साखर घालून मंद आचेवर आटवावं. नंतर त्यात सुंठपूड व वेलची पूड घालावी. काचेच्या बाटलीत भरून ठेवावा. टीप : जास्त गोड हवा असल्यास पाऊण वाटी किंवा बरोबरीने साखर वापरावी. जसे की आवळा किस १वाटी : साखर १वाटी!
आवळा लोणचं साहित्य : आवळे, मोहरीचीडाळ, तिखट, मीठ हळद, हिंग, मेथीदाणे, लवंग, काळीमीरी, तेल. कृती : प्रथम आवळे स्वच्छ धुवून कोरडे करून चाळणीवर वाफवावे. थंड झाल्यावर बी काढावी. तेल गरम करून त्यात मेथीदाणे परतून त्याची पूड करावी. परातीत तिखट, मीठ, हळद, मोहरीची डाळ/ मोहरीची पूड व मेथीपूड एकत्र कालवून घ्यावी. तेल कडकडीत गरम करून त्यात लवंग व काळीमीरी तळून काढून घ्यावी व परातीतील मिश्रणात घालावी. नंतर त्यात भरपूर हिंग घालून ती गरम फोडणी परातीत ओतून मिश्रण लगेच कालवावं. गरम तेलाने तिखट, हळदीचा कच्चेपणा जातो. लगेच कालवल्याने तिखट जळत नाही. मिश्रण थंड झाल्यावर त्यात आवळ्याच्या फोडी कालवाव्या. मस्त लोणचं तयार. हे लोणचं काचेच्या बरणीत भरून ठेवावं.
किसलेल्या आवळ्याचे लोणचं साहित्य : आवळे, मीठ, तिखट, हळद, हिंग, मोहरीची डाळ, मेथीदाणे, लवंग, काळीमिरी, साखर, तेल. कृती : आवळे किसून त्यात मीठ व थोडी साखर घालावी. तेलात मेथीदाणे तळून पूड करावी. त्याच तेलात लवंग व काळीमिरी तळून काढून घ्यावी. मोहरीची डाळ, तिखट, हळद मेथीपूड, तळलेली लवंग व काळीमिरी एकत्र कालवावी. तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग व थोडी हळद घालून फोडणी करावी. गॅस बंद करावा. फोडणी जरा कोमट असताना लोणच्याच्या खारात घालावी. खार नीट कालवून तो किसलेल्या आवळ्यात घालावा.
आवळा सुपारी साहित्य : आवळे, आलं, जीरं, ओवा व काळंमीठ. कृती : प्रथम आवळे व आलं स्वच्छ धुवून पुसून घेतले. आवळे व आलं किसणीवर किसून घेतले. जीरं व ओवा किंचित गरम करून मिक्सरमध्ये फिरवून घेतला. जरा जाडसरच ठेवले. आवळ्याचा किस, आलं, ओवा, जीरं व काळमीठ एकत्र कालवून ताटात पसरवून सावलीतच वाळवलं. छान वाळल्यावर चवदार पाचक सुपारी तयार. टीप : सुपारी उन्हात वाळवली तर काळसर रंग येतो. सावलीत वाळवलीतर रंग बदलत नाही.