Male Contraceptive Pills: आता पुरुषांसाठीही गर्भनिरोधक गोळ्या येणार; महिलांची मोठी चिंता मिटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 10:49 AM2022-06-12T10:49:08+5:302022-06-12T10:58:08+5:30

शरीर संबंधांनंतर अनेकदा पुरुषांपेक्षा महिलाच जास्त टेन्शनमध्ये असतात. चुकून गर्भधारणा झाली तर, या विचाराने त्यांच्या मनात काहूर माजलेले असते.

शरीर संबंधांनंतर अनेकदा पुरुषांपेक्षा महिलाच जास्त टेन्शनमध्ये असतात. चुकून गर्भधारणा झाली तर, या विचाराने त्यांच्या मनात काहूर माजलेले असते. यापासून वाचण्यासाठी उपाय आहेत, परंतू ते महिलांवरच लादलेले आहेत. सेक्सवेळी जर कंडोमचा वापर केला नसेल तर महिलेला ७२ तासांत गर्भनिरोधक गोळी घ्यावी लागते. याचे परिणामही महिलेलाच भोगावे लागतात. अशावेळी जर पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळी आली तर...

लवकरच पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळी येणार आहे. वैज्ञानिक अशा औषधावर काम करत आहेत जे पुरुषांच्या शुक्राणूंवर परिणाम करेल. यामुळे महिलांवर येणारा दबाव किंवा चिंता मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे.

एका नवीन संशोधनात पुरुषांवर या गर्भनिरोधक गोळ्यांचा प्रयोग करण्यात आला आहे. यामध्ये कमी साईड इफेक्ट आढळून आले. या गोळ्या प्रभावीपणे टेस्टोस्टेरोन कमी करण्यात यशस्वी ठरल्या आहेत. हे संशोधन अटलांटा जीएमध्ये एंडोक्राइन सोसायटीच्या वार्षिक बैठकीत सादर करण्यात आले.

डीएमएयू (DMAU) आणि 11बी-एमएनटीडीसी (11b-MNTDC) या दोन प्रकारच्या गोळ्यांवर हे संशोधन करण्यात आले. या गोळ्या टेस्टोस्टेरोन हार्मोनला रोखतात यामुळे शुक्राणुंची संख्या कमी होते. टेस्टोस्टेरोन रोखल्याने साईड इफेक्टची शक्यता असते. परंतू, या संशोधनात भाग घेतलेल्या पुरुषांनी सांगितले की, हे साईड इफेक्ट स्वीकारार्ह आहेत.

गर्भधारणा रोखण्यासाठी पुरुषांकडे नसबंदी आणि कंडोम हे दोनच उपाय आहेत. यामुळे या दोन्ही गोष्टी नसतील तर गर्भधारणा रोखण्याची जबाबदारी ही महिलांवरच असते. या गोळ्यांमुळे अनैच्छिक गर्भधारणा होण्याचे प्रमाण कमी होणार आहे. यामुळे सामाजिक आरोग्यही सुधारेल असे संशोधक तमर जैकबसोहन यांनी सांगितले.

या संशोधनामध्ये ९६ पुरुषांनी सहभाग घेतला होता. या पुरुषांना २८ दिवसांसाठी दोन किंवा चार गोळ्या त्यांच्या इच्छेनुसार घेण्यास सांगितले गेले होते. सात दिवसांनी या पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोनचा स्तर कमी झालेला आढळला. या संशोधनातील ७५ टक्के पुरुषांनी भविष्यात अशाप्रकारच्या गोळ्या घेण्यास इच्छुक असल्याचे सांगितले.

ज्या पुरुषांनी ४ गोळ्या घेतल्या त्यांची टेस्टोस्टेरोन लेव्हल दोन गोळ्या घेणाऱ्यांपेक्षा कमी आढळली. मेल कॉन्ट्रासेप्टिव पिल्स तयार करणाऱ्या संशोधकांच्या दाव्यानुसार ही गोळी गर्भधारणा पूर्णपणे रोखण्यात यशस्वी ठरली आहे. या गोळ्या पुरुषांमध्ये शुक्राणू तयार होण्यापासून रोखतात. यामुळे सेक्स दरम्यान गर्भधारणा होण्याची शक्यता 99 टक्क्यांनी कमी होते.