भयंकर! कोरोना, मंकीपॉक्सनंतर आला जीवघेणा 'मारबर्ग व्हायरस'; 'ही' 10 लक्षणं दिसल्यास व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 12:22 PM2022-07-20T12:22:20+5:302022-07-20T12:34:45+5:30

Marburg Virus : मारबर्ग असं या व्हायरसचं नाव असून तो कोरोनापेक्षाही खतरनाक असल्याचं सांगितलं जातं आहे.

कोरोना, ओमायक्रॉन, मंकीपॉक्सनंतर आता आणखी एका व्हायरसबाबत धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. मारबर्ग असं या व्हायरसचं नाव असून यामुळे पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढलं आहे.

घाना देशात 'मारबर्ग व्हायरस' सारख्या धोकादायक आजाराची दोन प्रकरणे आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. सेनेगलच्या प्रयोगशाळेत या दोन्ही प्रकरणांची पुष्टी झाली आहे. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, पहिली केस 26 वर्षीय पुरुषाची आहे ज्याचा व्हायरसचे निदान झाल्यानंतर एका दिवसातच रुग्णालयात मृत्यू झाला. दुसरी केस 51 वर्षीय पुरुषाची आहे, जो 28 जून रोजी रुग्णालयात गेला होता आणि त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला.

मारबर्ग असं या व्हायरसचं नाव असून तो कोरोनापेक्षाही खतरनाक असल्याचं सांगितलं जातं आहे. या व्हायरसबाबात जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) अलर्ट दिला आहे. मारबर्ग व्हायरसमुळे भीतीचे सर्वच देशांची चिंता वाढली आहे.

मारबर्ग व्हायरस हा वटवाघळांमुळे होणारा आजार आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, संक्रमित प्राण्यापासून मानवांमध्ये व्हायरसचा प्रसार झाल्यानंतर तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित होऊ शकतो.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, या आजारामुळे मृत्यूचे प्रमाण सरासरी 50% आहे. पण व्हायरस स्ट्रेन आणि केस मॅनेजमेंटच्या आधारावर 24% किंवा 88% इतका कमी होऊ शकतो.

मारबर्ग आजाराची लक्षणे ही प्रामुख्याने 2 ते 21 दिवसांच्या दरम्यान कधीही सुरू होऊ शकतात. यानंतर तुम्हाला जास्त ताप, प्रचंड स्नायूदुखी आणि तीव्र डोकेदुखी यांसारखी लक्षणे जाणवू शकतात.

तिसऱ्या दिवसाच्या आसपास रुग्णाला पोटात दुखणे, उलट्या होणे, जुलाब आणि अंगदुखी या लक्षणांची समस्या होऊ शकते. 5 ते 7 दिवसांदरम्यान रुग्णाला नाकातून रक्त येणे, हिरड्यांमधून रक्त येणे आणि उलट्या होणे अशा तक्रार दिसू शकतात.

लक्षणे दिसू लागल्यानंतर 8 ते 9 दिवसांच्या दरम्यान रक्तस्त्राव होऊन रुग्णांचा मृत्यू होतो. यावर वेळीच उपचार न केल्यास ते प्राणघातक ठरू शकते. हा व्हायरस मलेरिया, टाइफाइड आणि इतर रोगांसारखाच आहे आणि त्याची लक्षणे सारखीच आहेत.

तज्ञांच्या मते, मारबर्ग व्हायरसची लागण झालेल्या रुग्णावर उपचार म्हणून द्रवयु्क्त आहार आणि इलेक्ट्रोलाइट्सवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो. ऑक्सिजन आणि रक्तदाब स्थिती नियंत्रणात ठेवली जाते.

संक्रमित व्यक्तीशी थेट संपर्क टाळावा. जर तुम्ही प्रभावित भागात राहत असाल तर तुमच्या हातात हातमोजे आणि मास्क घालणे आवश्यक आहे. त्याचवेळी, संक्रमित व्यक्तीला वेगळे ठेवणे आवश्यक आहे. या काळात त्याने वापरलेल्या कोणत्याही वस्तूपासून योग्य अंतर राखले पाहिजे.

तज्ज्ञांच्या मते, व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीचे रक्त, शरीरातील द्रव जसे की लघवी, लाळ, घाम, उलट्या इत्यादींच्या संपर्कात येऊन हा संसर्ग इतर लोकांमध्ये पसरू शकतो. संक्रमित व्यक्तीचे कपडे आणि अंथरूण वापरल्यानेही सुद्धा संसर्ग पसरण्याचा धोका असतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

मारबर्ग इबोला व्हायरसपेक्षाही किती तरी वेगाने पसरून लोकांना आपल्या विळख्यात घेतो. यामुळे होणारा मृत्यूदर हा 24 ते 88 टक्के आहे. यावरूनच याचा संसर्गाचा वेग किती आहे, याचा अंदाज लावता येतो.

मारबर्गची लक्षणं ही फ्लूसारखी असतात. लागण झाली की नाही हे समजण्यासाठी सँपल घेऊन त्याचं सीक्वेंसिंग केलं जातं. असे व्हायरस येत असतात पण आता कोरोनामुळे लोक अशा आजाराबाबत अधिक सतर्क झाले आहेत.

मारबर्गवर कोणतंही अँटीव्हायरल औषध किंवा लस नाही. सुदैवाने आफ्रिकाबाहेरील देशात याची प्रकरणं नाहीत पण तरी लोकांनी सतर्क राहणं गरजेचं असल्याचं डॉ. एम वली यांनी म्हटलं आहे.