Health tips: उन्हाळ्यात 'या' चूका टाळाल तर आजारांपासून वाचाल, तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 05:52 PM 2022-03-24T17:52:47+5:30 2022-03-24T18:10:00+5:30
उन्हाळा सुरु झाला की अनेक गोष्टींमध्ये बदल होण्यास सुरुवात होते. यापैकी एक म्हणजे आपले आरोग्य. काही लोकांना वाढलेल्या तापमानामुळे डिहायड्रेशन होते किंवा अशक्त वाटते. 'आज तक'ला दिलेल्या माहितीत दिल्लीतील क्लिनिकल न्युट्रिशनिस्ट डॉक्टर मेघा जैना आणि हेड क्लिनिकल न्युट्रिशनिस्ट उपासना शर्मा यांनी उन्हाळ्यातील आहार कसा असावा, काय काळजी घ्यावी तसेच कोणत्या चूका करु नयेत याबाबतची संपूर्ण माहिती दिली आहे. उन्हाळ्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. डॉ. मेघा यांच्यामते उन्हाळ्यात अतिसार, पित्त, डिहायड्रेशन आणि अपचन या समस्या जाणवतात.
यावर उपाय म्हणून पाण्याचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ सेवन करणे गरजेचे आहे. तसेच लिंबू पाणी, ज्युस किंवा नारळ पाणी याचे सेवन करावे.
डॉक्टर उपासना यांनी सांगितले की, उन्हाळ्याच्या दिवसांत आपण जास्त प्रमाणात सरबत पितो. या सरबतांमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे तुमच्या रक्तातील साखर वाढु शकते व तुमचं वजनही वाढू शकतं.
त्यामुळे सरबत पिण्याचं प्रमाण कमी करा. उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका. तळलेले पदार्थ खाणं टाळा.
तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांत गोड खावंस वाटत असेल तर आंबे खा, असं डॉक्टर मेघा सांगतात. बाहेरचे गोड पदार्थ खाणे पुर्णपणे टाळा. बाहेरचे खाण्यापेक्षा आंबा खाणे कधीही चांगलेच. त्यामुळे तुमची गोड खाण्याची इच्छाही पूर्ण होईल आणि तुमच्या आहारात एक हेल्दी पदार्थ म्हणून याचा उपयोग होईल.
पण लक्षात ठेवा तुम्ही आंबे एखाद्या मिड मिल म्हणजे जेवणानंतर न खाता सकाळी नाश्त्यानंतर थोड्यावेळाने खा. यामुळे तुमचे वजन वाढणार नाही.
तसेच तुम्ही उन्हाळ्यात आईसक्रीमही खाऊ शकता. मात्र तेही जेवणानंतर न खाता मिड मिल म्हणूनच खा कारण आईसक्रीम पचायला वेळ लागतो.
उन्हाळ्यात सर्वात जास्त समस्या भेडसावते ती ब्लड प्रेशरची. अनेकांना उन्हाळ्यात उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. अशावेळी सकाळी किंवा रात्रीचे कोणतेही जेवण टाळू नये. अनेकजण वजन कमी करण्यासाठी सकाळचे जेवण करत नाहीत. जेवण स्कीप करणे अत्यंत चूकीची सवय आहे.
अनेकदा लोक उन्हाळ्यात बाहेरुन घरी आल्यावर थंड पाणी पितात. हे अत्यंत चुकीचे आहे. उन्हातून घरात आल्यावर साधे पाणी प्यावे. मग फळ अथवा सॅलेड खावे. त्यानंतर जेवण करावी. हेच रुटीन फॉलो करावे. काहीजण उन्हातून घरी आल्यावर लगेच जेवतात. यामुळे अतिसाराचा त्रास होऊ शकतो.
विशेष करुन ज्या व्यक्ती डाएटिंगवर आहेत त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की उन्हाळ्यात सकाळचा नाश्ता महत्त्वाचा आहे. उन्हाळ्यात सकाळी व्यवस्थित भरपेट नाश्ता करावा. त्यानंतरच घराबाहेर पडावे. डाएटिंग करताना काहीवेळा नाश्ता स्कीप केला जातो. असे करु नये.