Mixing Covid-19 Vaccines: निराळ्या लसी मिक्स करून देण्यावरून WHO नं दिला इशारा, म्हटलं,"हा धोकादायक ट्रेंड" By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 12:01 PM 2021-07-13T12:01:55+5:30 2021-07-13T12:06:30+5:30
Mixing Covid-19 Vaccines: लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत अनेक ठिकाणी लसींचे डोस मिक्स करुन देण्यावर विचार सुरू आहे. अनेक ठिकाणी याची चाचणीही सुरू करण्यात आली आहे. कोरोनानं जगभरात हाहाकार माजवला होता. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु अनेक ठिकाणी दोन लसींचं मिश्रण देण्याच्या संभाव्यतेवर विचार सुरू आहे आणि अनेक ठिकाणी ते सुरूही करण्यात आलं आहे.
परंतु आता जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामिनाथन यांनी यासंदर्भात इशारा दिला आहे. निरनिराळ्या कंपन्यांनी तयार केलेल्या लसी एकत्र मिक्स देण्यावरून सर्वांना इशारा दिला.
हा एक धोकादायक ट्रेंड आहे आणि आरोग्यावर याचा काय परिणाम होईल यासंदर्भात कोणत्याही प्रकारचा अभ्यास ढालेला नाही. अशा परिस्थितीत निरनिराळ्या लसी एकत्र करून देणं हे अतिशय धोकादायक ठरू शकतं, असं स्वामिनाथन म्हणाल्या.
निरनिराळ्या कंपन्यांच्या लसी मिक्स करून देण्याचा अर्थ असा की पहिल्या डोसच्या रुपात रुग्णाला एका कंपनीचा डोस देण्यात येतो. तर दुसऱ्या डोसच्या रूपयात रुग्णाला दुसऱ्या कंपनीचा लसीचा डोस देण्यात येतो.
लस मिक्स करून देण्याबाबत लोकांना इशारा देताना डब्ल्यूएचओच्या मुख्य वैज्ञानिक म्हणाल्या की सध्या याबद्दल कोणताही डेटा नाही आणि त्याच्या प्रभावी परिणामकारकतेबद्दल काहीही तथ्यही नाही.
अशा परिस्थितीत आपण सर्वच जण डेटा फ्री आणि पुरावा नसलेल्या झोनमध्ये आहोत. त्यामुळे हा एकप्रकारचा धोकादायक ट्रेंड आहे, असंही त्यांनी नमूद केलं. यामुळे खाद्या देशात स्थिती बिकटही होऊ शकते, असं WHO चं म्हणणं आहे.
गेल्या महिन्यात ब्रिटनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासात एक दावा करण्यात आला होता. यामध्ये कोरोनापासून बचावासाठी ऑक्सफर्ड अॅस्ट्राझेनकाची (Oxford-AstraZeneca) लस आणि दुसरा डोस फायझर बायोएनटेक (Pfizer-BioNTech) ची घेतली तर त्यामुळे उत्तम इम्युनिटी तयार होते, असं त्यात नमूद करण्यात आलं होतं.
भारतात अॅस्ट्राझेनकाची लस ही कोविशिल्ड म्हणून दिली जाते. तसंच संशोधनानुसार कोणती लस पहिल्यांदा दिली गेली आणि कोणती लस नंतर देण्यात आली याचा कोणताही फरक पडत नसल्याचं अभ्यासाद्वारे सांगण्यात आलं आहे.