बापरे! Monkeypox आणि Corona चा डबल अटॅक; देशात वेगाने वाढतोय धोका, 'अशी' घ्या काळजी By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 11:50 AM 2022-08-06T11:50:08+5:30 2022-08-06T12:01:25+5:30
Monkeypox And Corona : जगभरात मंकीपॉक्सचा कहर पाहायला मिळत असून आतापर्यंत तब्बल 80 देशांमध्ये 20 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही आतापर्यंत आठ रुग्ण आढळून आले असून ज्यातील 5 रुग्ण केरळ आणि 3 दिल्लीमधील आहेत. कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातलेला असतानाच आता विविध आजारांनी डोकं वर काढलं आहे. कोरोना, ओमायक्रॉन, ब्लॅक फंगलनंतर आता मंकीपॉक्सचा मोठा धोका निर्माण झाला आहे. देश आता दुहेरी संकटाचा सामना करत आहे. एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असताना दुसरीकडे मंकीपॉक्सच्या वाढत्या रुग्णांनी प्रशासनाच्या चिंतेत भर टाकली आहे.
जगभरात मंकीपॉक्सचा कहर पाहायला मिळत असून आतापर्यंत तब्बल 80 देशांमध्ये 20 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही आतापर्यंत आठ रुग्ण आढळून आले असून ज्यातील 5 रुग्ण केरळ आणि 3 दिल्लीमधील आहेत. तर एका रुग्णाचा मंकीपॉक्समुळे मृत्यू झाला आहे. वेगाने पसरणाऱ्या या व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंकीपॉक्स आणि कोरोनाचा धोका असतानाच आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. ज्यामध्ये मंकीपॉक्सपासून वाचण्यासाठी काय करायचं आणि काय करायचं नाही ते देण्यात आलं आहे. तसेच देशात मंकीपॉक्समुळे कोरोनासारखी परिस्थिती होऊ नये यासाठी तयारी करण्यात आली आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा चार कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 19,406 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,26,649 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असताना काही राज्यात पुन्हा गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे.
सरकारने मंकीपॉक्सची लस तयार करण्यासाठी टेंडर काढलं आहे. य़ाआधी पुण्यातील नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ वायरोलॉजीने मंकीपॉक्स व्हायरसचा स्ट्रेन वेगळा केला होता. याचा वापर लस आणि डायग्नोस्टीक किट तयार करण्यासाठी केला जाणार आहे. भारतात 14 जुलैला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर आता आठ रुग्ण सापडले आहेत. 30 जुलैला एकाचा मृत्यू झाला.
दिल्ली, उत्तराखंड, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशसह अनेक राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोरोना आणि मंकीपॉक्सच्या डबल अटॅकपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी ते जाणून घेऊया... जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सचा प्रसार रोखू शकतो असं म्हटलं आहे. लोकांनी यासाठी सतर्क असणं अत्यंत गरजेचं आहे.
मंकीपॉक्स आणि कोरोना हे दोन्ही संसर्गजन्य आजार आहेत. एक संक्रमित व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला संक्रमित करू शकतो. त्यामुळे त्यापासून बचाव केला पाहिजे. कोणामध्येही लक्षणं आढळली तर त्या व्यक्तिपासून लांब राहा. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस आली आहे. मात्र मंकीपॉक्सवर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही. यामध्ये शरीरावर बारीक फोड, पुरळ येतात.
असा करा बचाव संक्रमित व्यक्तीपासून स्वत:ला लांब ठेवा. हात धुण्यासाठी साबण अथवा सॅनिटायझरचा वापर करा. तसेच संक्रमित व्यक्ती जवळ असेल तर मास्क आणि ग्लव्स घाला. संक्रमित व्यक्तीच्या चादर किंवा अन्य वस्तुंचा वापर करू नका. त्याचे कपडे देखीव वेगळे ठेवा आणि वेगळे धुवा. लक्षणं आढळून आली तर सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांना जाणं टाळा.
मंकीपॉक्सची वाढती प्रकरणे लक्षात घेता, सरकारने लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देणारी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. विशेषतः लहान मुले आणि गर्भवती महिलांना त्याचा जास्त धोका असल्याने त्यांनी आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. तज्ज्ञांच्या मते, रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास मंकीपॉक्सचा धोका वाढतो. मुले आणि गर्भवती महिलांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते. लहान मुलांना याचा जास्त धोका असतो.
1970 मध्ये 9 वर्षांच्या लहान मुलामध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला होता. गर्भवती महिलांनाही मंकीपॉक्सची लागण होऊ शकते, असे एका संशोधनातून समोर आले आहे. हे संशोधन काँगोमध्ये करण्यात आले होते, ज्यामध्ये 216 महिलांचा समावेश होता. या संशोधनात सहभागी 5 पैकी 4महिलांचा गर्भपात झाला होता. त्याच वेळी, गर्भात वाढणाऱ्या मुलांमध्येही मंकीपॉक्सची लक्षणे आढळून आली.
महिलांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. संक्रमित व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवतानाही हा आजार हेाऊ शकतो. यासाठी बाधित व्यक्तीपासून सुरक्षित अंतर ठेवणे कधीही चांगले. स्वतःला लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधून आजाराबाबत खात्री करून घ्यावी. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी ताजी फळे आणि भाज्या खा. रोज हळदीचे दूध प्या.
अन्नपदार्थ शेअर करू नका. तसेच, ब्रश, टूथपेस्ट, टॉवेल इत्यादी गोष्टी शेअर करू नका. संक्रमित व्यक्तीपासून अंतर ठेवा. सर्दी, खोकला आणि मंकीपॉक्सची लक्षणे दिसल्यास त्या व्यक्तीपासून लगेच वेगळे राहणेच जास्त चांगले. घराबाहेर पडताना मास्क लावा. याच्या मदतीने तुम्ही कोरोना व्हायरसचाही संसर्गही टाळू शकता. (टिप- ही माहिती आम्ही केवळ वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची शारीरिक स्थिती वेगळी असल्यानं कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.)