'मंकीपॉक्स'चा माकडांशी काय संबंध? त्यांच्यामुळेच हा आजार पसरतो का? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 11:35 AM2024-09-09T11:35:09+5:302024-09-09T11:45:09+5:30

Mpox case in India: आफ्रिकन आणि युरोपीय देशानंतर आता भारतात 'मंकीपॉक्स'चा पहिला संशयित रुग्ण आढळला आहे.

Mpox case in India : आफ्रिकन आणि युरोपीय देशानंतर आता भारतात 'मंकीपॉक्स'चा पहिला संशयित रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण संसर्गग्रस्त देशातून भारतात परतला असून, सध्या त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. मंकीपॉक्स हा माकडांशी संबंधित आजार आहे, पण हा विषाणू माकडांमधून पसरतो, हे पूर्णपणे योग्य नाही. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या आजाराला माकडाचे नाव का आणि कसे पडले?

माकडाचे नाव मंकीपॉक्सशी कसे जोडले गेले?अमेरिकन हेल्थ एजन्सी सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या अहवालात म्हटले आहे की, हा आजार पूर्वी मंकीपॉक्स म्हणून ओळखला जात होता, परंतु नंतर त्याचे नाव Mpox ठेवण्यात आले. अगदी सामान्य भाषेत, याला Mpox ऐवजी मंकीपॉक्स म्हणतात.

Mpox हा एक झुनोटिक रोग आहे, म्हणजे तो प्राणी आणि मानवांमध्ये पसरू शकतो. या आजाराचा पहिला रुग्ण 1958 मध्ये आढळला होता. या आजाराचा विषाणू माकडांमध्ये आढळून आला होता. त्यामुळेच या आजाराला मंकीपॉक्स असे नाव देण्यात आले. पण, हा विषाणू कुठून आला, हे अद्याप कळू शकलेले नाही.

शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की, आफ्रिकन उंदीर अथवा खारऊताई आणि मानवेतर प्राण्यांमध्ये (माकडा) या विषाणू आढळतो. त्यांच्यातून याचा संसर्ग इतरांमध्ये पसरतो. मानवांमध्ये मंकीपॉक्सची पहिली केस 1970 मध्ये आढळली होती. रुग्ण डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोचा रहिवासी होता. 2022 मध्ये Mpox जगभर पसरला. त्यापूर्वी या आजाराचे रुग्ण फार दुर्मिळ होते.

विषाणू कसा पसरतो? सीडीसीच्या अहवालात म्हटले आहे की, या आजाराचा विषाणू संक्रमित रुग्णाच्या लाळ, घाम आणि इतर गोष्टींद्वारे निरोगी व्यक्तीमध्ये पसरू शकतो. हा विषाणू संक्रमित गर्भवती महिलेकडून तिच्या बाळामध्येदेखील पसरू शकतो. मंकीपॉक्स विषाणू एखाद्या संक्रमित कपड्याला किंवा पृष्ठभागाला स्पर्श केल्यानंतरही सामान्य व्यक्तीला आजारी बनवू शकतो.

संक्रमित रुग्णामध्ये लक्षणे दिसण्यासाठी 1 ते 4 दिवस लागू शकतात. ताप, स्नायू दुखणे, थंडी वाजून येणे, पुरळ येणे, लिम्फ नोड्स सुजणे यासारखी लक्षणे दिसतात. काही प्रकरणांमध्ये, श्वास घेण्यात अडचण येणे, अन्न गिळण्यास त्रास होणे आणि डोळ्यांना सूज येणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात.

जागतिक आरोग्य संघटना म्हणते की, आफ्रिकन देशांमध्ये अशी अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यांच्यात संक्रमणाचे मूळ अद्याप सापडले नाही. विविध देशांची सरकारे आपत्कालीन प्रतिसादाद्वारे त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. असे अनेक देश आहेत जिथे लोकांमध्ये या आजाराबद्दल जागरूकता नसल्यामुळे, त्याची प्रकरणे पसरली आणि उघडकीस आली.