संकटं संपेना! कोरोनामुक्त झालेल्यांना आता 'या' आजाराचा धोका; रुग्ण संख्येनं वाढवली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 09:17 PM2021-07-16T21:17:20+5:302021-07-16T21:20:26+5:30

कोरोनातून बऱ्या झालेल्यांना गंभीर आजाराचा धोका; रुग्णसंख्येत वाढ होत असल्यानं चिंतेत भर

देशात आलेली कोरोनाीची दुसरी लाट आता हळूहळू ओसरत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे सतर्कता बाळगणं गरजेचं आहे.

कोरोनातून बऱ्या झालेल्या काहींना ब्लॅक फंगसची लागण झाल्याचे प्रकार देशाच्या बहुतांश राज्यांमधून समोर आले आहेत. यानंतर आता कोरोनामुक्त झालेल्यांसमोर नवं संकट निर्माण झालं आहे.

कोरोनातून बऱ्या झालेल्यांसमोर आता क्षयरोगामुळे अडचणी वाढल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लागण झालेल्या अनेकांना आता क्षयरोगाचा सामना करावा लागत आहे.

मध्य प्रदेशातील क्षयरोगींची संख्या अचानक वाढली आहे. भोपाळच्या हमीदिया रुग्णालयाच्या औषध विभागाचे प्रमुख डॉ. लोकेंद्र दवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनातून नुकत्याच बऱ्या झालेल्यांमध्ये क्षयरोगाची लक्षण दिसून आली आहेत.

हमीदिया रुग्णालयात प्रत्येक दिवसाला क्षयरोगाचे जवळपास १ डझन रुग्ण दाखल होत आहेत. भोपाळमधील सरकारी टीबी रुग्णालयात गेल्या १५ दिवसांत अनेक जण दाखल झाले आहेत. त्यापैकी बहुतांश जण कोरोना पॉझिटिव्ह होते.

कोरोनामुक्त झाल्यानंतर क्षयरोग झालेल्यांमध्ये एका १५ वर्षीय विभा नावाच्या मुलीचा समावेश आहे. तिला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाची लागण झाली होती.

आमच्या घरातील कोणालाही क्षयरोगाची समस्या नाही, असं विभाच्या आईनं सांगितलं. माझ्या मुलीला कोरोनाची लागण झाली होती. रेमडेसिविर आणि इतर औषधांच्या मदतीनं ती बरी झाली. मात्र आता तिला क्षयरोगाची लागण झाली आहे, असं विभाच्या आईनं सांगितलं.

कोरोनामुक्त झालेल्या अनेकांना आता क्षयरोगाची लागण होत असल्याचं विभावर उपचार करत असलेल्या डॉ. आकाश मंगोले यांनी सांगितलं. क्षयरोगाची लागण झालेले अनेकजण हे कोरोनावर मात केलेले आहेत. त्यांच्या थुंकीची चाचणी केल्यानंतर त्यांना टीबी झाल्याचं समोर आलं आहे.

कोरोनामुक्त झालेल्या किती जणांना कोरोनाची लागण झाली आहे याचा नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही. राज्य सरकारनं अद्याप सर्वेक्षण केलं नसल्यानं याबद्दलची आकडेवारी उपलब्ध होऊ शकलेली नाही.