तिसर्या लाटेत ओमायक्रॉनमुळे 'हे' लोक संक्रमित; केंद्र सरकारचा धक्कादायक रिपोर्ट! By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 07:46 PM 2022-02-04T19:46:04+5:30 2022-02-04T19:53:19+5:30
Omicron : रूग्णालयात दाखल झालेल्या 1520 रूग्णांवर केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, त्यांच्यापैकी बहुतेकांना घसादुखीची समस्या होती आणि या लाटेमध्ये औषधांचा वापर पूर्वीपेक्षा कमी होता. नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे (Omicron variant) उद्भवलेल्या तिसऱ्या लाटेत रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांचे सरासरी वय 44 वर्षे आहे, तर याआधी हा आकडा 55 वर्षांचा होता.
रूग्णालयात दाखल झालेल्या 1520 रूग्णांवर केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, त्यांच्यापैकी बहुतेकांना घसादुखीची समस्या होती आणि या लाटेमध्ये औषधांचा वापर पूर्वीपेक्षा कमी होता. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (ICMR) महासंचालक बलराम भार्गव (Balram Bhargava) यांनी ही माहिती दिली.
महासंचालक बलराम भार्गव म्हणाले की, ओमायक्रॉन व्हेरिएंट हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण ठरले. या सर्वेक्षणासाठी 37 रुग्णालयांमधील डेटाचे विश्लेषण करण्यात आले. यामध्ये असे आढळून आले की, रुग्णांचे सरासरी वय 44 वर्षे आहे आणि सर्वात सामान्य समस्या किंवा लक्षण म्हणजे घसा खवखवणे असे दिसून आले.
आधीच्या कोरोना लाटेत संक्रमित लोकांचे सरासरी वय 55 वर्षे होते. हा निष्कर्ष कोव्हिड-19 च्या नॅशनल क्लिनिकल रजिस्ट्रीमधून आला आहे, ज्यामध्ये 37 मेडिकल सेंटर्समध्ये दाखल झालेल्या रुग्णांबद्दल डेटा गोळा करण्यात आला आहे.
याचबरोबर, या सर्वेक्षणासाठी दोन वेगवेगळ्या कालावधीची निवड करण्यात आली होती. यामध्ये पहिला कालावधी 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर असा होता, ज्यावेळी डेल्टा व्हेरिएंटचे वर्चस्व असल्याचे मानले जाते.
दुसरा कालावधी 16 डिसेंबर ते 17 जानेवारी असा होता, जेव्हा असे समजले जाते की ओमायक्रॉनची अधिक प्रकरणे येत होती, असे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितले.
महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितले की, तिसऱ्या लाटेत औषधांचा वापर फारच कमी झाल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. यासोबतच श्वसनाचे गंभीर आजार, किडनी निकामी होणे आणि इतर आजारांशी संबंधित गुंतागुंतही कमी होते.
डेटाच्या विश्लेषणानुसार, लसीकरण झालेल्या लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण 10 टक्के आणि लसीकरण न झालेल्या लोकांमध्ये 22 टक्के होते. याशिवाय, लसीकरण झालेल्या 10 पैकी 9 जण आधीच अनेक आजारांनी ग्रस्त होते, ज्यांचा मृत्यू झाला.
लसीकरण न केलेल्या प्रकरणांमध्ये, 83 टक्के लोक आधीच अनेक आजारांनी ग्रस्त होते. लसीकरण न झालेल्या लोकांच्या (11.2 टक्के) तुलनेत लसीकरण झालेल्यांमध्ये (5.4 टक्के) व्हेंटिलेशनची गरज खूपच कमी दिसून आल्याचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितले.