Omicron : ओमायक्रॉनमुळे वाढली चिंता; दीड ते तीन दिवसांत दुप्पट होतायेत रुग्ण, WHO नं सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 07:24 PM2021-12-18T19:24:11+5:302021-12-18T19:32:05+5:30

Omicron : अनेक देशांमध्ये, नवीन व्हेरिएंटमुळे संसर्गाची लाट ठोठावलेली आहे किंवा तोंडावर उभी आहे.

जिनिव्हा : कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे (Omicron Variant) जगभरात चिंतेचे वातावरण आहे. अनेक देशांमध्ये, नवीन व्हेरिएंटमुळे संसर्गाची लाट ठोठावलेली आहे किंवा तोंडावर उभी आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शनिवारी सांगितले की, ओमायक्रॉनची प्रकरणे दीड ते तीन दिवसांत दुप्पट होत आहेत, विशेषत: स्थानिक प्रसार असलेल्या भागात होत आहेत.

यासह, दक्षिण-पूर्व आशिया प्रदेशातील सात देशांमध्ये कोरोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटची पुष्टी झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने त्याचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य सुविधा आणि सामाजिक उपाययोजना तातडीने वाढवण्याच्या गरजेवर भर दिला.

जागतिक आरोग्य संघटनेचे दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्राच्या प्रादेशिक संचालिका पूनम खेत्रपाल सिंग यांनी सांगितले की, देश ठोस आरोग्य आणि सामाजिक उपायांनी ओमायक्रॉनचा प्रसार रोखू शकतात. 'आपले लक्ष सर्वात जास्त धोका असलेल्या लोकांच्या सुरक्षेवर राहिले पाहिजे,' असे त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

ओमायक्रॉनने दिलेला धोका तीन महत्त्वाच्या प्रश्नांवर आधारित आहे. ओमायक्रॉनचा प्रसार, लस ओमायक्रॉनविरोधात किती चांगले संरक्षण करते आणि इतर व्हेरिएंटच्या तुलनेत ओमायक्रॉन व्हेरिएंट किती संसर्गजन्य आहे. पूनम खेत्रपाल सिंग यांनी सांगितले की, "आतापर्यंत आपल्याला माहीत आहे की ओमायक्रॉन डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक वेगाने पसरत आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे, गेल्या काही महिन्यांत जगभरात संसर्गाची प्रकरणे वाढली आहेत."

याचबरोबर, त्या म्हणाल्या की, दक्षिण आफ्रिकेतून येणार्‍या डेटामुळे ओमायक्रॉन व्हेरिएंटद्वारे पुन्हा संसर्ग होण्याचा धोका वाढत असल्याचे दिसते. मात्र. ओमायक्रॉनमुशे गंभीररित्या आजारी पडण्याबाबत मर्यादित डेटा उपलब्ध आहे. तसेच, आम्हाला येत्या आठवड्यात अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओमायक्रॉन व्हेरिएंटकडे डोळेझाक केले जाऊ नये."

ओमायक्रानमुळे लोकांना अधिक गंभीर आजार होत नसला तरी, मोठ्या प्रमाणात प्रकरणे पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेवर भार टाकू शकतात. त्यामुळे, आयसीयू बेड, ऑक्सिजनची उपलब्धता, पुरेशा आरोग्य सेवा कर्मचारी यासह आरोग्य सेवा क्षमतेचा आढावा घेणे आणि ते सर्व स्तरांवर मजबूत करणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने ओमायक्रॉनला चिंताजनक व्हेरिएंटमध्ये घोषित केले. या नव्या व्हेरिएंटमुळे दक्षिण आफ्रिकेत कोरोनाची प्रकरणे 300 टक्क्यांनी वाढली आहेत.

दक्षिण आफ्रिकेत या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे वृत्त प्रथम आढळल्यानंतर अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेसह इतर आफ्रिकन देशांवर प्रवास बंदी लादली आहे. याआधी जगाने कोरोना डेल्टा व्हेरिएंटने घातलेला धुमाकूळ पाहिला आहे.

याचबरोबर, कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरिएंटबाबत जगभरात चिंतेचे वातावरण आहे. कोरोनावर आधीच अस्तित्वात असलेली प्रतिबंधक लस नवीन व्हेरिएंटवर काम करेल का? किंवा यासाठी नवीन लस बनवण्याची गरज आहे का, यावर सध्या चर्चा सुरु आहे.