Omicron Variant : "ओमायक्रानबाबत कोणताही निर्णय घेणे घाईचे ठरेल, डिसेंबर अखेरपर्यंत प्रतीक्षा करावी", भारतीय तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 01:18 PM2021-12-16T13:18:13+5:302021-12-16T13:29:28+5:30

Omicron Variant : डिसेंबरअखेर ओमायक्रान व्हेरिएंटबाबत संपूर्ण माहिती उपलब्ध होईल, असे डॉ. अनुराग अग्रवाल म्हणाले.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे (Omicron Variant) भारतासह जगभरात चिंता वाढली आहे. दरम्यान, ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या लक्षणांवरून आतापासून अंदाज बांधणे चुकीचे ठरेल, असे भारतातील शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. डिसेंबरअखेर या व्हेरिएंटबाबत संपूर्ण माहिती उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.

ओमायक्रॉनच्या संदर्भात असे म्हटले जात आहे की, या व्हेरिएंटचा संसर्ग झाल्यास याची सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. मात्र, न्यूज18 शी बोलताना इन्स्टिट्यूट ऑफ जीनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीचे (IGIB) संचालक डॉ. अनुराग अग्रवाल यांनी सांगितले की, दक्षिण आफ्रिकेत या संसर्गानंतर जे काही घडले आहे, ते (सौम्य लक्षणे) भारतातही घडणे अपेक्षित आहे.

सौम्य व्हायरसमध्ये संपूर्ण आरोग्य यंत्रणा उखडून टाकण्याची ताकद आहे. भारताने चांगल्या परिस्थितीची आशा करावी, पण वाईट परिस्थितीसाठी तयार राहावे. किमान डिसेंबरच्यापूर्वी ओमायक्रॉनवर काहीही निष्कर्ष काढणे खूप घाईचे ठरेल, असे डॉ. अनुराग अग्रवाल म्हणाले.

दरम्यान, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (CSIR) अंतर्गत असलेली संस्था इन्स्टिट्यूट ऑफ जीनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (IGIB) ओमायक्रॉनचा शोध घेण्यासाठी आणि ते कसे कार्य करते हे समजून घेण्यासाठी SARS-CoV-2 जीनचे सीक्वेंसिंग करत आहे.

डॉ. अनुराग अग्रवाल म्हणाले, जेव्हा भारताच्या लोकसंख्येच्या आकाराचा विचार केला जातो तेव्हा एक मोठी समस्या असते हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यामुळे एकूण गंभीर रुग्णांची संख्या ही संपूर्ण आरोग्य यंत्रणा अस्वस्थ करण्यासाठी पुरेशी ठरणार आहे.'

काहीही निष्कर्ष काढण्यासाठी मला किमान डिसेंबरअखेरपर्यंत वाट पाहावी लागेल. सामान्यतः लाटेची सुरूवातीचा हिस्सा भाग सौम्य आणि कमी तीव्र असतो. याचे कारण असे आहे की, तरुणांना सर्वात प्रथम संसर्ग होतो. मात्र, संसर्ग घरी पोहोचताच आणि वृद्ध आणि असुरक्षित लोकांना संसर्ग होऊ लागला की, लाट तीव्र होते, असे डॉ. अनुराग अग्रवाल म्हणाले.

लोक अजूनही ओमायक्रॉनबाबत सतर्क नाहीत. लोकांनी ताबडतोब समजून घेतले पाहिजे की, वैयक्तिक संरक्षणात्मक उपाय त्यांना दीर्घकाळासाठी मदत करतील. त्यांनी मास्क घालण्याचे आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे, असे डॉ. अनुराग अग्रवाल यांनी सांगितले.

मोठ्या प्रमाणात म्यूटेटेड व्हेरिएंटची मोठी समस्या ही आहे की कोणती लस काम करेल हे अद्याप आम्हाला माहित नाही. आम्‍हाला आत्तापर्यंत माहित आहे की, ज्या व्यक्तीला नैसर्गिक कोरोना संसर्ग झाला आहे आणि लसीकरण केले गेले आहे, अशा व्यक्तीला जास्त धोका नाही, परंतु ज्याला कधीही संसर्ग झाला नाही आणि लसीकरण झाले नाही आहे, अशा व्यक्तींना अजूनही धोका आहे, असे डॉ. अनुराग अग्रवाल म्हणाले.