आळस सोडा आणि जांभया देणे थांबवा, संदीप माहेश्वरीने सांगितलेले दहा उपाय ताबडतोब अंमलात आणा! By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 12:45 PM 2023-04-10T12:45:57+5:30 2023-04-10T12:51:16+5:30
उन्हाळा आणि आळस या एका नाण्याच्या दोन बाजू म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही! कारण उन्हाळयात सकाळी बिछान्यातून उठण्यापासून ते रात्री कामे आवरेपर्यंत प्रत्येक गोष्टीत आपण चालढकल करत राहतो. याला कारणीभूत असतो तो आळस! त्यावर मात कशी करायची हे सांगताहेत प्रख्यात मोटिव्हेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी!जिथे स्वच्छता असते तिथे आळस फिरकत नाही. आळस हा माणसाचा शत्रू आहे असे म्हणतात. हे कळत असूनही वळत नाही अशी आपली स्थिती होते. कारण मनाला काम करण्याची उमेद असली तरी मेंदू आळसावलेला असतो. त्याला कार्यरत ठेवून आळस घालवण्यासाठी जाणून घ्या पुढील दहा उपाय!
झोप पूर्ण झाली की दिवसभर उत्साह राहतो हे आपल्याला माहीत आहे. मात्र खूप झोपल्यानेही आळस भरतो. सहा तास शांत झोप लागली तरी झोपेचा कोटा पूर्ण होतो. शांत झोप लागण्यासाठी शरीराला पुरेसे श्रम हवेत. यासाठी सकाळी अर्धा तास व्यायाम करा आणि सायंकाळी अर्धा तास चाला त्यामुळे तन-मन सुदृढ होईल, तजेला जाणवेल आणि रात्री थकून रात्री झोप छान लागेल.
ऍक्युप्रेशर किट वापरा. ऍक्युप्रेशर थेरेपीने रक्ताभिसरण सुधारते. त्यासाठी छोटी छोटी उपकरणे बाजारात मिळतात. जसे की मेटल रिंग बोटात फिरवली असता ताण निघून जातो. सकाळी सकाळी काटेरी मॅटवर उभे राहिल्याने तळपायापासून डोक्यापर्यंत झिणझिण्या येतील आणि आळस कुठल्या कुठे निघून जाईल.
चेहऱ्यावर पाण्याचे हबके मारा. त्यामुळे झोप तर उडेलच शिवाय गार पाण्याचे हबके मारल्याने उत्साह संचारेल. त्यानंतर चहा कॉफी पिण्याऐवजी सकाळी उठल्यावर पहिल्या वीस मिनिटात कोणतेही फळ खा. कारण चहा-कॉफीतुन मिळणारा तजेला पाच दहा मिनिटे टिकेल, याउलट फळातून मिळणारी ऊर्जा दोन ते तीन तास टिकेल.
सकाळी उठून वेळेत अंघोळ करा. घरातला पसारा आवरा. जिथे स्वच्छता असते तिथे आळस फिरकत नाही. वेळ जात नसेल तर आवराआवर करा, मात्र रिकामे बसू नका. टापटीप राहा, सुस्त बसून राहू नका. या वातावरण निर्मितीचाही आळस घालवण्यास फायदा होतो.
स्वतःला रोज काहीतरी ध्येय आखून द्या. हाताला आणि मेंदूला काम नसेल तर शरीर सुस्तावते. ते कार्यरत ठेवा. ध्येयविरहित आयुष्य जगू नका. असाध्य गोष्टींचा ध्यास बाळगू नका. अपेक्षाभंग होऊन आणखी आळशी व्हाल.
त्याऐवजी छोटे छोटे गोल सेट करा आणि वेळेची मर्यादा आखून घ्या. त्यामुळे काम वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी तर येईलच आणि काम वेळेत पूर्ण झाल्याचे समाधानही मिळेल.
रोज सकाळी किंवा आदल्या दिवशीच दिवसभराच्या कामाची आखणी करा. काय करायचे आहे हे माहीत नसते तेव्हा तुम्ही आळसावता. एका कामानंतर दुसरे काम कोणते याची जाणीव मेंदूला असेल तर ते तुम्हाला सतत कार्यरत ठेवण्यास मदत करेल.
सद्यस्थितीत मोबाईलमुळे आळस जास्त वाढतोय. मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे डोळ्यावर, डोक्यावर, मनावर ताण येतो. तुम्हाला तुमची ऊर्जा आजमावून बघायची असेल तर तीन दिवस मोबाईलचा उपास करून बघा, दहापट ऊर्जा वाढल्याचे अनुभवाल!
दिवसभरातला काही वेळ स्वतःला द्या. त्या क्षणी डोकं, मन पूर्ण शांत ठेवा. त्यामुळे डोक्यात, मनात नक्की काय सुरु आहे, आपल्याला काय हवे आहे हे कळेल आणि त्यावर काम करता येईल.
या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात आणा आणि बघा लोक तुमचा आदर्श ठेवून तुमच्याकडून प्रेरणा घेत आळस झटकून कामाला लागतील! त्यामुळे इतरांचे प्रेरणा स्थान बना आणि त्यासाठी बदलाची सुरुवात स्वतःपासून करा!