रशियाची कोरोनावरील Sputnik V लस भारतात तयार होणार, इतकी आहे एका डोसची किंमत

By ravalnath.patil | Published: November 27, 2020 04:15 PM2020-11-27T16:15:15+5:302020-11-27T16:39:03+5:30

मॉस्को - रशियाने तयार केलल्या कोरोनावरील स्पुतनिक व्ही लसीबाबत मोठी माहिती समोर येत आहे. ही लस भारतात तयार केली जाणार आहे.

रशियाचा सार्वभौम संपत्ती फंड (Russia's sovereign wealth fund) आणि भारतीय औषधी कंपनी हेटरो यांनी भारतात स्पुतनिक व्हीच्या लससाठी 100 मिलियन (10 कोटी) पेक्षा जास्त डोस तयार करण्यास सहमती दर्शविली आहे.

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, स्पुतनिक व्ही च्या ट्विटर अकाऊंटवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात त्याविषयी माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, रशियाने गेल्या काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, कोरोनावर स्पुतनिक व्ही लस 95 टक्के प्रभावी आहे आणि या लसच्या एका डोसची किंमत 10 डॉलर (सुमारे 750 रुपये) असेल. तसेच, लस ठेवण्यासाठी अत्यंत कोल्ड स्टोरेजची देखील आवश्यकता भासणार नाही.

दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या भारतात सुरू आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे. सध्या लस चाचणीचा तिसरा टप्पा बेलारूस, युएई, व्हेनेझुएला आणि इतर देशांमध्ये सुरू आहे.

भारतात हैदराबादस्थित डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीमध्ये या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात चाचण्या सुरू आहेत. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडने म्हटले आहे की, भारतातील चाचण्यांचा अंतिम टप्पा मार्च 2021 पर्यंत पूर्ण होईल.

रशियन अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले की, कराराच्या अनुषंगाने स्पुतनिक व्ही ही लस डिसेंबरमध्ये रशियाकडून इतर देशांना मर्यादित प्रमाणात दिली जाईल, तर जानेवारी 2021 मध्ये इतर देशांमध्ये वितरण होईल.

लसीचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि किंमती आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर रशियातील लोकांना ही लस विनामूल्य मिळणार आहे.