दिवाळी सणातील अभ्यंगस्नानाचे महत्त्व
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 17:15 IST2017-10-16T17:07:25+5:302017-10-16T17:15:51+5:30

दिवाळीत पहाटे उठून 'अभ्यंगस्नान' केले जाते. शरीराला तेल चोळून, उटणे लावून आंघोळ करण्याची पारंपरिक पद्धत आहे.
आयुर्वेदानुसार या 'अभ्यंगस्नाना'चे विशेष महत्त्व आहे. उटणे, सुगंधी तेल या सगळ्यांचे गुणधर्म लक्षात घेऊन विशिष्ट वेळेला ते वापरावे, असे आयुर्वेदात सांगितले आहे.
नरक चतुर्दशी ते बलिप्रतिपदा हे दीपावलीचे तीनही दिवशी नियमित अभ्यंगस्नान करण्यास सांगितले आहे. नरक चतुर्दशी दिवशी (मांगलिक स्नान) पहाटे लवकर उठून प्रथम अभ्यंगस्नान करण्यास सांगितले आहे.
शरीराला तेल लावून चोळून ते त्वचेत जिरविणे व नंतर ऊनपाण्याने स्नान करणे म्हणजे अभ्यंगस्नान. त्वचेला नेहमी स्निग्धता असावी लागते यासाठी अभ्यंग स्नानात म्हणून तेल लावायचे. ऊनपाणी हे मंगल व शरीराला सुखदायक आहे म्हणून ऊनपाण्याने स्नान सांगितले आहे.
उटण्यामुळे जास्तीची चरबी नाहीशी होते. त्वचेचा वर्ण व पोत सुधारतो. उटणे म्हणजे साफ करणाऱ्या, पोषण करणाऱ्या व सुगंधी वनौषधींचे वस्त्रगाळ चूर्ण.
आंघोळीच्या वेळेस साबणाऐवजी उटणं दुधात किंवा पाण्यात कालवून त्वचेला चोळून लावावे. साबणातील फेसामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल व आर्द्रताही निघून जाते, तर उटण्यामुळे ती राखली जाते.