काळजी घ्या! ना बीपी, ना शुगर... तरीही येतोय सायलेंट हार्ट अटॅक; जाणून घ्या कारण, व्हा सावध By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 12:22 PM 2023-01-25T12:22:06+5:30 2023-01-25T12:32:27+5:30
Silent Heart Attack : सगळ्यात भयंकर प्रकार म्हणजे सायलेंट हार्ट अटॅक. ही अशी परिस्थिती आहे की एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅकची लक्षणे देखील कळत नाहीत. आजच्या काळात माणसाची जीवनशैली अशी बनली आहे की हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. आता तरूणांनाही हृदयविकाराच्या झटक्यासारख्या गंभीर अवस्थेतून जावे लागते. सगळ्यात भयंकर प्रकार म्हणजे सायलेंट हार्ट अटॅक. ही अशी परिस्थिती आहे की एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅकची लक्षणे देखील कळत नाहीत.
कधी कधी सायलेंट अटॅक जीवघेणा ठरतो. अशी एक घटना समोर आली आहे, ज्याने डॉक्टरांनाही हैराण केलं आहे. दिल्लीतील 42 वर्षीय व्यक्ती एका फॅमिली फंक्शनसाठी कारने जात होती. या व्यक्तीला ना मधुमेह आहे ना बीपीची समस्या. असे असतानाही कार चालवत असताना त्या व्यक्तीला अचानक अटॅक आला.
घाईघाईत त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. त्या व्यक्तीला व्हेंटिलेटरवर ठेवले आणि सीपीआर आणि वेगवेगळ्या प्रकारचे शॉक ट्रीटमेंट देण्यास सुरुवात केली, पण त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. नंतर रुग्णाला तातडीने इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात हलवण्यात आले.
अपोलो येथील कार्डिओलॉजी विभागाचे वरिष्ठ डॉक्टर अमित मित्तल यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली . अमित मित्तल यांनी सांगितले की, रुग्णाला अपोलोमध्ये आणताच त्याची अँजिओग्राफी करण्यात आली. त्याच्या हृदयाच्या धमन्या 90 ते 100 टक्के ब्लॉक झाल्याचं अँजिओग्राफीतून समोर आलं. रुग्णाची तातडीने अँजिओप्लास्टी करण्यात आली.
अँजिओप्लास्टी केल्यानंतर रुग्णाचे हृदय पुन्हा सामान्य स्थितीत आले आहे. प्रकृती बरी झाल्यावर रुग्णाला व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. रुग्णाच्या प्रकृतीत आणखी सुधारणा झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. आता 60 टक्के रुग्णाचे हृदय सामान्यपणे काम करत आहे.
अपोलो रुग्णालयातील कार्डिओ विभागातील आणखी एक वरिष्ठ डॉक्टर मुकेश गोयल यांनी सांगितले की, रुग्णाची प्रकृती मिनिटा-मिनिटाला खालावत असल्याने ही एक अतिशय गंभीर घटना आहे. रुग्णाला सतत वेंट्रिक्युलर फायब्रिलेशनची समस्या भेडसावत होती. सर्व प्रयत्न करूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती.
डॉ.गोयल पुढे म्हणाले की, जेव्हा त्यांना अपोलोमध्ये आणण्यात आले तेव्हा आमच्यासाठी जलद उपचार मिळणे सर्वात महत्त्वाचे होते. अँजिओप्लास्टीच्या वेळीही डॉक्टर त्याला सतत मसाज आणि शॉक देत होते. डॉ.गोयल पुढे म्हणाले की, सायलेंट हार्ट अटॅकची अशी घटना तरुणामध्ये क्वचितच पाहायला मिळते.
डॉ. गोयल यांनी सांगितले की, "तुमच्या 30 ते 40 टक्के धमन्यांमध्ये प्लाक असू शकतो, ज्यामुळे नियमित हालचालीत अशी लक्षणे उद्भवू शकत नाहीत." अर्थात तुमचे कोलेस्टेरॉल नॉर्मल असो वा नसो, पण काही वेळा तणावासारख्या गोष्टींमुळे प्लाक वाढतो, त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याची समस्या उद्भवते आणि या गुठळ्या वाढायला वेळ लागत नाही आणि रक्तवाहिन्यांपर्यंतचा रक्तप्रवाह थांबतो.''
डॉ. गोयल यांनी सांगितले की, रुग्ण आता औषधांवर आहे. त्याला रक्त पातळ करणारे औषध देण्यात आले आहे. यासोबतच कोलेस्टेरॉल आणखी कमी करण्यासाठी औषधही देण्यात आले आहे, जेणेकरून धोका आणखी कमी करता येईल. तीन महिन्यांनंतर ही व्यक्ती 30 ते 40 मिनिटे सायकल चालवू शकेल आणि तीन ते चार किलोमीटर चालू शकेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.