Corona Vaccination: एकच नंबर! कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी मोठी खूषखबर; तिसऱ्या लाटेआधी चिंताच मिटली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 06:57 PM2021-08-30T18:57:04+5:302021-08-30T18:59:43+5:30

Corona Vaccination: बहारिनमध्ये कोरोनाच्या विविध लसींच्या प्रभावाबद्दल संशोधन; चार निकष विचारात

गेल्या अनेक आठवड्यांपासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळाली. मात्र आता कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत आहे. तिसऱ्या लाटेचा धोका कमी करण्यासाठी लसीकरणाला वेग देण्याची गरज आहे.

गेल्याच आठवड्यात एकाच दिवसात १ कोटी लोकांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला. लसीकरण मोहिमेत सर्वाधिक वापर कोविशील्ड आणि कोवॅक्सिनचा केला जात आहे. त्यातही बहुतांश जणांना कोविशील्ड लस मिळत आहे.

देशासह जगभरात डेल्टा व्हेरिएंटचा धोका वाढत असल्यानं चिंता वाढली आहे. कोरोना लसीचा एक डोस घेतलेल्यांनासुद्धा कोरोनाची लागण होत आहे. या पार्श्वभूमीवर कोलंबिया विद्यापीठ आणि बहारिनच्या संशोधकांनी लसींचा प्रभाव तपासून पाहिला. यातून महत्त्वाची आकडेवारी समोर मआली.

बहारिनची लोकसंख्या १५ लाखांपेक्षा थोडी कमी आहे. देशात १० लाख ३ हजार ९६० जणांना कोरोनाची लस दिली गेली आहे. बहारिननं लसीकरण अभियानात चीनच्या सायनोफार्म, रशियाच्या स्पुटनिक, अमेरिकेच्या फायझर आणि ऑक्सफर्डच्या ऍस्ट्राझेनेका लसीचा वापर केला आहे. ऍस्ट्राझेनेका लस भारतात कोविशील्ड नावानं उपलब्ध आहे.

९ डिसेंबर २०२० ते १७ जुलै २०२१ दरम्यान बहारिनमध्ये ५ लाख ६९ हजार ५४ लोकांना सायनोफार्म लस देण्यात आली. १ लाख ८४ हजार ५२६ जणांना स्पुटनिक, १ लाख ६९ हजार ५८ जणांना फायझर-बायोएनटेक आणि ७३ हजार ७६५ जणांना कोविशील्ड दिली गेली. याशिवाय लसीकरण न झालेल्या २ लाख ४५ हजार ८७६ जणांचादेखील सर्वेक्षणात सहभाग होता.

लसीकरण झाल्यानंतर संक्रमित होण्याचा दर, रुग्णालयात दाखल होण्याचा दर, आयसीयूमध्ये दाखल होण्याचा दर आणि मृत्यू दर अशा चार निकषांच्या आधारे लसींचं मूल्यमापन करण्यात आलं. त्यात कोविशील्डची कामगिरी उजवी ठरली. विशेष म्हणजे सर्व लसींच्या तुलनेत कोविशील्ड अधिक स्वस्तदेखील आहे.

कोरोनापासून संरक्षण देणाऱ्या सर्व कंपनींच्या लसींची तुलना केल्यास कोविशील्डची कामगिरी उत्तम आहे. कोविशील्ड घेतलेल्या दर १० हजारांपैकी केवळ १५२ जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. म्हणजेच कोविशील्ड घेतलेल्या केवळ १.५२ टक्के लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली. या यादीत फायझर दुसऱ्या, स्पुटनिक, सायनोफार्मचा क्रमांक लागतो.

कोरोना लस घेऊनही मृत्यूमुखी पडलेल्यांची आकडेवारी पाहता, त्यातही कोविशील्डची कामगिरी शानदार आहे. कोविशील्ड लस घेतल्यानंतर कोरोना होऊन दर १० हजारांमागे केवळ ३ लोकांचा (०.०३ टक्के) मृत्यू झाला. या यादीत कोविशील्डनंतर स्पुटनिक व्ही, फायझर, सायनोफार्मचा क्रमांक लागतो.

कोरोनाची लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण होऊन आयसीयीमध्ये दाखल करण्याची गरज भासलेल्यांची संख्यादेखील सर्वेक्षणातून पुढे आली. याबाबतीत स्पुटनिक व्ही पहिल्या स्थानी आहे. स्पुटनिक लस घेतलेल्या कोणालाही आयसीयूची गरज भासलेली नाही. त्यानंतर कोविशील्डचा (०.१ टक्के) क्रमांक लागतो. त्यानंतर फायझर, सायनोफार्मचा नंबर लागतो.