Tomato Fever : बापरे! चिमुकल्यांना 'टोमॅटो फिव्हर'चा मोठा धोका; 5 वर्षांखालील मुलांवर करतो अटॅक, 'ही' आहेत लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 04:58 PM2022-08-28T16:58:07+5:302022-08-28T17:24:37+5:30

Tomato Fever : देशात टोमॅटो फिव्हरचा कहर पाहायला मिळत आहे. वाढत्या रुग्णांमुळे लोक हैराण झाले आहेत.

देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशात टोमॅटो फिव्हरचा कहर पाहायला मिळत आहे. वाढत्या रुग्णांमुळे लोक हैराण झाले आहेत. कोरोना आणि मंकीपॉक्सचा धोका असतानाच आता आणखी एका गंभीर आजाराचे रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

केरळमधून टोमॅटो फिव्हरची सुरुवात झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, हा आजार साधारणपणे पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये होतो. शाळा सुरू झाल्याने मुलांचे जनजीवन सुरळीत झाले मात्र याच दरम्यन अॅलर्जी, फ्लू, टायफॉइड, डेंग्यू आदी आजारांमुळे पालकांची काळजी वाढली. टोमॅटो फ्लू या आजाराने आता पालकांची झोप उडवली आहे. मुलांमध्ये तो अत्यंत वेगाने पसरत आहे.

टोमॅटो फिव्हर किंवा टोमॅटो फ्लू हा आजार हेड, हँड, फूट, माऊथ (HFMD) या आजाराच्या रुपाने देखील ओळखला जातो. हा एक दुर्मिळ आजार असून संपूर्ण शरीरावर दाणे आणि फोड आल्यासारखे होतात. या आजाराचा आणि टोमॅटो खाण्याचा काहीही संबंध नाही. फक्त आकार आणि रंग हा टोमॅटोप्रमाणे असल्यामुळे याचं नाव टोमॅटो फिव्हर ठेवण्यात आलं आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, टोमॅटो फिव्हर अथवा टोमेटो फ्लू हा असा आजार आहे जो खास करून 5 वर्षांखालील मुलांवर अटॅक करतो. टोमॅटो फिव्हर कसा आला याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. तसेच हा आजार जीवघेणा किंवा घातक नाही पण अत्यंत संसर्गजन्य आहे.

टोमॅटो फिव्हरच्या मुख्य लक्षणांमध्ये डिहायड्रेशन, त्वचेवर पुरळ उठणे, त्वचेची जळजळ किंवा खाज सुटणे यांचा समावेश होतो. या संसर्गाने बाधित झालेल्या मुलांच्या शरीरावर टोमॅटोच्या आकाराचे लाल पुरळ दिसून येतात. यासोबतच खूप ताप येणं, सांधे सुजणे, थकवा येणे, अंगदुखी अशी लक्षणेही दिसू शकतात.

डिहायड्रेशनमुळे संक्रमित मुलाच्या तोंडात इर्रिटेशन जाणवू शकतं. तोंड कोरडे पडू शकते. हात, गुडघे यांचा रंग बदलणे हे देखील दुसरं लक्षण आहे. काहींना या दरम्यान खूप तहानही लागू शकते. मुलांमध्ये वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि नीट उपचार करा.

टोमॅटो फ्लूचे सर्वाधिक रुग्ण हे मुलांमध्ये सापडले आहेत. त्यामुळे लहान मुलांची सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची आहे. मात्र तज्ञांनी या आजाराकडे दुर्लक्ष न करण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे. तसेच अद्याप या आजारामुळे कोणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळालेली नाही. पण सतर्क राहणं गरजेचं आहे.

रिपोर्टनुसार, चिकनगुनियाप्रमाणे टोमॅटो फिव्हरमुळे मुलांची त्वचा लाल होते. यानंतर खाज येणे, रॅशेश येणे अशा समस्या जाणवतात. अशावेळी पालकांना आणि मुलांच्या कुटुंबियांना विशेष काळजी घ्यावी लागते.

साधारणपणे हा आजार फारसा धोकादायक नसतो. 7 ते 10 दिवसात संसर्ग बरा होतो. डॉक्टर काही औषधांचा सल्ला देतात. पुरळ किंवा फोड कमी करण्यासाठी डॉक्टर अँटीबायोटिक्स लिहून देतात. याशिवाय वेदना कमी करण्यासाठी एसीटामिनोफेन किंवा आइब्यूप्रोफेन देतात. मात्र, ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय देऊ नयेत.

संक्रमित मुलाला उकळलेले स्वच्छ पाणी द्या, जेणेकरून तो हायड्रेटेड राहू शकेल. फोड किंवा पुरळांना स्पर्श करणे किंवा खाजवणे टाळा. पुरेशी स्वच्छता राखा, घर आणि मुलांभोवती स्वच्छता ठेवा. थोडे दिवस बाहेर खेळायला पाठवू नका. कोमट पाण्याने आंघोळ करावी, संक्रमित व्यक्तीपासून अंतर ठेवा, सकस आहार घ्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.