'हे' देश आयुष्मान भारत सारख्या योजना चालवतात, जाणून घ्या, काय आहे खासियत...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 02:11 PM2024-09-13T14:11:03+5:302024-09-13T15:16:44+5:30

Aayushman Bharat : आयुष्मान भारत योजनेअंतर्गत वर्षाला ५ लाख रुपयांचा विमा उपलब्ध आहे.

अलीकडेच मोदी सरकारने आयुष्मान भारत योजनेत काही बदल केले आहेत. आता ७० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या सर्व वृद्धांना आयुष्मान आरोग्य योजनेंतर्गत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ४.५ कोटी कुटुंबातील जवळपास ६ कोटी वृद्धांना फायदा होणार आहे.

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत वर्षाला ५ लाख रुपयांचा विमा उपलब्ध आहे. हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. कारण जगातील फक्त काही देशांमध्येच अशा सर्वसमावेशक आरोग्य विमा योजना आहेत. तर जाणून घ्या, अशा योजना कोण-कोणत्या देशात आहेत....

ब्रिटनमध्ये 'नॅशनल हेल्थ सर्व्हिस' (NHS) आहे. याबद्दल बोलायचे तर ही योजना सर्व ब्रिटिश नागरिकांना मोफत आरोग्य सेवा पुरवते. या योजनेला सरकारकडून टॅक्सच्या माध्यमातून निधी दिला जातो. 'नॅशनल हेल्थ सर्व्हिस'अंतर्गत, रुग्णालयात दाखल करणे, औषधे आणि दंत उपचार यासारख्या सुविधा मोफत उपलब्ध आहेत.

अमेरिकेत 'मेडिकेअर' योजनेंतर्गत ६५ वर्षांवरील व्यक्ती आणि काही आजारांनी ग्रस्त तरुणांना आरोग्य सेवा मिळते. त्याचा खर्च लोकांच्या पगारातून वजा केला जातो आणि काही भाग त्यांना स्वतःला भरावा लागतो. यामध्ये रुग्णालयात दाखल होणे, डॉक्टरांच्या भेटी आणि इतर वैद्यकीय सेवांचा समावेश आहे.

कॅनडामध्ये 'कॅनडा हेल्थ अॅक्ट' अंतर्गत सर्व नागरिकांना आणि कायम रहिवाशांना मोफत आरोग्य सेवा प्रदान केल्या जातात. याचा खर्च प्रामुख्याने प्रांतीय आणि प्रादेशिक सरकारे उचलतात, तर फेडरल सरकारही योगदान देते. यामध्ये रुग्णालयात दाखल होणे, डॉक्टरांच्या सेवा आणि औषधांचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलियाची 'मेडिकेअर ऑस्ट्रेलिया' योजना सर्व नागरिकांना आणि कायम रहिवाशांना आरोग्य सेवा प्रदान करते. ही योजना सरकार टॅक्सद्वारे चालवते आणि यामध्ये रुग्णालयात दाखल होणे, डॉक्टरांचा सल्ला आणि औषधांचा खर्च समाविष्ट आहे.