रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्याचे संकेत देतात ही लक्षणे, कोरोनापासून वाचण्यासाठी घ्या खबरदारी By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 03:57 PM 2020-06-02T15:57:16+5:30 2020-06-02T16:20:02+5:30
निरोगी जीवनासाठी व्यक्तीच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. मात्र शरीराच्या तंदुरुस्तीकडे झालेले दुर्लक्ष आणि खानपानातील वाईट सवयी यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. सध्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहेत. या गंभीर आजारापासून वाचण्यासाठी अद्यापतरी कुठल्याही औषधाचा शोध लागू शकलेला नाही. त्यामुळे सध्यातरी कोरोनाविरोधातील लढाईत रोगप्रतिकारशक्ती निर्णायक भूमिका बजावत आहे. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे त्यांना कोरोनाचा फारसा धोका नाही. मात्र ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, असे लोक कोरोनाला झटपट बळी पडत आहेत.
निरोगी जीवनासाठी व्यक्तीच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. मात्र शरीराच्या तंदुरुस्तीकडे झालेले दुर्लक्ष आणि खानपानातील वाईट सवयी यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यास तुम्ही वारंवार आजारी पडू शकता. तसेच त्या आजारातून सावरण्यासाठी बराच काळ लागू शकतो. शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्याचे संकेत काही लक्षणांमधून दिसू लागतात. ही लक्षणे कोणती त्याची माहिती खालीलप्रमाणे.
वारंवार थकवा जाणवणे तु्म्हाला वारंवार थकवा आणि सुस्ती जाणवत असेल तर त्याची अनेक कारणे असू शकतात. अपुरी झोप, तणाव, अॅनिमिया किंवा क्रोनिक फटिग सिंड्रोम ही त्याची कारणे असू शकतात. मात्र जर तुम्हाला वारंवार थकवा का जाणवतोय याचे कारण कळत नसेल. तसेच पुरेशी झोप घेतल्यानंतरही तुम्हाला थकवा जाणवत असेल तर त्याचे कारण तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असणे हे असू शकते.
वारंवार आजारी पडणे ऋतूबदलानंतर येणारी आजारपणे ही सामान्य बाब आहे. पण तुम्ही जर प्रत्येक ऋतुमध्ये आजारी पडत असाल, तर त्यामागे तुमची कमकुवत रोगप्रतिकारशक्ती हे कारण असू शकते. तुमची रोगप्रतिकारशक्ती जीवाणू, विषाणू आणि इतर आजारांशी लढत असते. मात्र जर तुम्हाला तोंड येणे, सर्दी किंवा ताप वारंवार येत असेल, तर तुम्ही त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
अॅलर्जीची समस्या अनेक जणांना अॅलर्जीचा त्रास असतो. त्यामुळे त्यांना वारंवार तापसरीचा सामना करावा लागतो. मात्र जर तुमच्या डोळ्यांमधून नेहमी पाणी येत असेल. कुठल्याही खाद्यपदार्थामुळे रिअॅक्शन होत असेल. तसेच त्वचेवर ओरखडे येत असतील तसेच सांधेदुखी आणि पोटदुखीचा त्रास होत असेल तर हे तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याची लक्षणे आहेत.
जखम बरी होण्यास वेळ लागणे आपल्या शरीरावर एखादी जखम झाल्यास तो घाव भरताना त्वचेवर एक शुष्क पापुद्रा तयार होतो. त्यामुळे शरीरातून रक्त बाहेर येण्यास अटकाव होतो. मात्र जर तुमच्या शरीरावरील जखम लवकर बरी होत नसेल तर ते तुमची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असल्याचे संकेत आहेत.
पचनाच्या समस्या आतड्यात असलेलेल विविध जीवाणू रोगप्रतिकार शक्तीवर थेट प्रभाव टाकत असतात. जर तुम्हाला जुलाब, अल्सर, गॅस, बद्धकोष्ट या समस्या वारंवार जाणवत असतील तर तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाली आहेत, हे तुम्ही समजून जा.
कमकुवत रोगप्रतिकारशक्तीचा प्रकृतीवर थेट प्रभाव पडतो. त्यामुळे तुम्हाला थकव्यापासून केस घळण्यापर्यंत अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थिती आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही सकस आहार, योग्य व्यायाम आणि पुरेशी झोप घेतली पाहिजे.