काळजी घ्या! वेगानं पसरतोय Tomato Fever, नेमकी लक्षणं काय? आणि कुणाला सर्वाधिक धोका? जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 01:19 PM 2022-08-21T13:19:59+5:30 2022-08-21T13:24:13+5:30
Tomato Fever In India: कोरोना, स्वाइन फ्लू, मंकीपॉक्सनंतर आता टोमॅटो फिव्हर भारतात वेगानं पसरत आहे. मुख्यत्वे: लहान मुलांना याची लागण होत असल्याचं दिसून आलं आहे. आता हा टोमॅटो फिव्हर म्हणजे नेमकं काय? याची लक्षणं कोणती आणि काय काळजी घेतली पाहिजे याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात... जगासोबतच भारतही गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाशी लढा देत आहे. कोरोनानंतर मंकीपॉक्सनं जगाचं टेन्शन वाढवलं. आता नव्या रोगानं धडक दिली आहे. हँड फूट माऊथ डिसीज (HFMD) म्हणजेच टोमॅटो फीव्हर (Tomato Fever) या नावानंही ओळखला जातो. त्यामुळे हा नवा रोग आता आरोग्य तज्ज्ञांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.
लैंसेट रेस्पिरेटरी जर्नलच्या अभ्यासानुसार ६ मे २०२२ रोजी केरळमध्ये टोमॅटो फिव्हरचा पहिला रुग्ण आढळून आला आणि तेव्हापासून आतापर्यंत ८२ रुग्णांची नोंद झाली आहे. हा रोग मुख्यत्वे: पाच वर्षांच्या वयोगटातील लहान मुलांना होत आहे. त्यातही ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे अशांना जास्त धोका आहे.
टोमॅटो फ्लू म्हणजे काय? टोमॅटो फ्लूमध्ये चिकुनगुनिया सारखीच काही लक्षणे असतात, जसे की खूप ताप, अंगदुखी, सांधे सुजणे, थकवा. तथापि, संक्रमित मुलांना पुरळ आणि त्वचेची जळजळ देखील होते, ज्यामुळे शरीराच्या काही भागांवर फोड येतात. पोटदुखी, मळमळ, उलट्या किंवा जुलाब, हात, गुडघे, मागचा भाग यांचा रंग बदलणं ही काही इतर लक्षणे आहेत. टोमॅटो फ्लूचा SARS-CoV-2 शी कोणताही संबंध नाही.
टोमॅटो फ्लूचा धोका कुणाला? लॅन्सेट रिपोर्टमधील माहितीनुसार टोमॅटो फ्लूचा सर्वाधिक धोका लहान मुलांना आहे. याचा व्हायरस लहान मुलांना लगेच शिकार करतो. डॉक्टरांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार या रोगाची लागण पाच वर्षाखालील मुलांना सर्वाधिक वेगानं होते. टोमॅटो फ्लू वेगान पसरणारा असला तरी त्यातून जीवाचा धोका खूप कमी आहे. त्यामुळे घाबरुन जाण्याचं काहीच कारण नाही.
टोमॅटो फ्लूची लक्षणं काय? टोमॅटो फ्लूची प्राथमिक लक्षणं म्हणजे चिकनगुनिया किंवा डेंग्यूसारखीच आहेत. यात खूप ताप येणं, अंगावर लाल चट्टे उठणं, पायाला सूज, डिहायड्रेशन, शरिरात कणकण, ताप आणि थकवा लक्षणं देखील आढळून येतात. काही रुग्णांमध्ये अंगावरील लाल चट्टे मोठ्या आकाराचे असल्याचंही दिसून आलं आहे.
टोमॅटो फ्लूची कारणं काय? टोमॅटो फ्लू कशामुळे होतो, याचा कोणताही तपास अद्याप लागलेला नाही. वैद्यकीय तज्ज्ञांनाही या आजाराची कारणे शोधण्यात यश आलेले नाही. पण हा एक व्हायरल फिव्हर असल्याचं सांगण्यात ये आहे.
टोमॅटो फ्लूवर उपचार काय? टोमॅटो फ्लूपासून बचावसाठी स्वच्छता राखणे हा एक मोठा प्रतिबंधात्मक उपाय आहे. या व्हायरसचा प्रभाव ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये अधिक आहे. त्यामुळे घरातील लहान मुलांमध्ये टोमॅटो फ्लूची लक्षणं आढळून आली तर तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. अंगावर चट्टे किंवा फोड असल्यास ते अजिबात फोडू नका. जास्तीत जास्त पाणी प्या.
टोमॅटो फ्लू संसर्गजन्य असल्याने, रोगाचा प्रसार रोखण्यासाठी संक्रमित व्यक्तीशी जवळचा संपर्क टाळला पाहिजे. तामिळनाडू-केरळ सीमेवरील वालार येथे एक वैद्यकीय पथक कोईम्बतूरमध्ये ताप, पुरळ आणि इतर आजारांसाठी दाखल होणाऱ्यांच्या चाचण्या करत आहे, असे पीटीआयने वृत्त दिले आहे.विशेषत: लहान मुलांना हा आजार होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्य ही दोन पथ्ये पाळणे आवश्यक आहे.