CoronaVirus News: ...तर लस घेतलेल्यांमुळे पसरू शकतो 'डेल्टा'; WHOचा इशारा अन् 'लसवंतां'ना दिलासा By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 02:43 PM 2021-07-15T14:43:32+5:30 2021-07-15T14:58:35+5:30
CoronaVirus News: जागतिक आरोग्य संघटनेनं दिली महत्त्वाची सूचना; कोरोना लस घेतलेल्यांना काळजी घ्यावी लागणार देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत अधूनमधून वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जात आहे.
देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट अतिशय भयंकर होती. कोरोनाच्या लाटेनं शिखर गाठलं असताना दररोज ४ लाखाहून अधिक रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कमी पडली.
संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लसीकरणाला वेग दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं धोक्याचा इशारा दिला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेल्या व्यक्ती डेल्टा व्हेरिएंटच्या वाहक बनू शकतात, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
कोरोना लसीचा डोस घेतलेल्या व्यक्ती डेल्टा व्हेरिएंटच्या वाहक बनू शकतात आणि त्यांच्यामुळे इतरांना धोका निर्माण होऊ शकतो. अमेरिका, ब्रिटनसह जगातील अनेक देशांत असे प्रकार पाहायला मिळाले असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
'जगभरात आधीच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंटच्या प्रसाराचा वेग वाढला आहे. लॉकडाऊननंतर लोकांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. गर्दी वाढल्यानं कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट वेगानं हातपाय पसरत आहे,' अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञ आणि महामारीतज्ज्ञ डॉ. मारिया वॅन केरखोवे यांनी दिली.
'कोरोना लसीचा डोस घेतलेल्या लोकांनाही डेल्टा व्हेरिएंटची लागण होत आहे. अनेक लोकांमध्ये संक्रमणाची लक्षणं दिसत नाहीत. मात्र ते विषाणूचे वाहक होत आहेत,' असं केरखोवे यांनी सांगितलं.
कोरोना लस घेतलेल्या अनेकांना डेल्टा व्हेरिएंटची लागण झाली आहे. अशा व्यक्ती लस घेतलेल्यांसाठी धोकादायक ठरत आहे. लस घेतलेल्या कोरोनाच्या वाहक ठरत आहे. त्यांच्या माध्यमातून कोरोनाचा विषाणू लस न घेतलेल्यांपर्यंत पोहोचत आहे, अशी माहिती केरखोवे यांनी दिली.
कोरोनाची लस घेतलेले अनेक जण विषाणूचे वाहक होत आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींना लक्षण जाणवल्यास त्यांनी स्वत:चं विलगीकरण करावं, आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यावरच घराबाहेर पडावं, अशा सूचना जागतिक आरोग्य संघटनेनं दिल्या आहेत.
कोरोनाची प्रतिबंधात्मक लस घेतलेल्यांना डेल्डा व्हेरिएंटमुळे फारसा धोका नाही. लस घेतली असल्यानं त्यांच्यात गंभीर लक्षणं दिसत नाहीत. मात्र त्यांच्यामुळे लस घेतलेल्यांना मोठा धोका आहे, असा धोक्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.
कोरोना लसीचे दोन्ही डोस न घेतलेल्यांना डेल्टाचा धोका अधिक आहे. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये १८ वर्षांखालील लोकसंख्येचं लसीकरण झालेलं नाही. त्यामुळे या व्यक्तींना डेल्टाचा अधिक धोका आहे, असं डॉ. मारिया केरखोवे यांनी दिली.