एका रात्रीत २-३ किलो वजन कमी करणं ठरू शकतं जीवघेणं; शरीरावर होतो 'असा' वाईट परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 11:39 AM2024-08-08T11:39:37+5:302024-08-08T11:52:38+5:30

तज्ज्ञांच्या मते, एका रात्रीत दोन ते तीन किलो वजन कमी करणं केवळ अशक्यच नाही तर ते आरोग्यासाठी देखील अत्यंत घातक ठरू शकतं.

कुस्तीपटू विनेश फोगटला ५० किलो गटातील महिला कुस्तीचा अंतिम सामना खेळण्यास अपात्र ठरवले. विनेशने अंतिम फेरी गाठली होती. मात्र वजन थोडं जास्त असल्याने ती अपात्र ठरली.

रिपोर्ट्सनुसार, मंगळवारी रात्री विनेशचे वजन जवळपास दोन किलोने जास्त होतं. अशा परिस्थितीत तिने वजन कमी करण्यासाठी रात्रभर खूप प्रयत्न केले. तरीही तिचं वजन ५० किलोपेक्षा १०० ग्रॅम जास्त असल्याचं समोर आलं आहे.

विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्याप्रकरणी भारतीय ऑलिम्पिक टीमचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर दिनशॉ पारदीवाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "गोल्ड मेडलसाठी होणाऱ्या सामन्याआधी विनेश फोगटचं वजन हे दोन किलोने वाढलं होतं. ते कमी करण्यासाठी कठोर पावलं उचलण्यात आली."

"खूप मेहनत करूनही अतिरिक्त १०० ग्रॅम वजन कमी करता आलं नाही. "विनेश फोगटच्या न्यूट्रिशनिस्टला पूर्ण आशा होती की, तिचं अतिरिक्त वजन एका साध्या प्रक्रियेद्वारे कमी केलं जाऊ शकतं. परंतु तीन कठोर प्रयत्नांनंतरही ही प्रक्रिया प्रभावी ठरली नाही."

"कोचने वजन कमी करण्याची नेहमीची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल, असा त्यांचा विश्वास होता. वजन कमी करण्याची प्रक्रिया रात्रभर अवलंबली गेली. सकाळी सर्व प्रयत्न करूनही विनेशचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा १०० ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आलं" असं म्हटलं आहे.

तज्ज्ञांच्या मते, एका रात्रीत दोन ते तीन किलो वजन कमी करणं केवळ अशक्यच नाही तर ते आरोग्यासाठी देखील अत्यंत घातक ठरू शकतं. आपल्या शरीराचं वजन आपली हाडं, स्नायू आणि फॅट्स यांचं असतं. रात्रभर वजन कमी करण्याचा प्रयत्न करणं अत्यंत धोकादायक आहे.

कार्बोहायड्रेट किंवा प्रोटीन नाही तर यासाठी तुम्हाला पाणी पिणं बंद करावं लागतं. तसेच मीठही खायचं नाही. अशा परिस्थितीत डिहायड्रेशन देखील होऊ शकते. शरीरातून जास्त प्रमाणात पाणी कमी झाल्यामुळे कॉम्पलिकेशन्स होऊ शकतात.

अतिरिक्त पाणी आणि कार्ब्स कमी झाल्यामुळे, शरीर हायपोग्लाइसेमियाच्या स्थितीत जाऊ शकतं. अशा प्रकारे शुगर लेव्हर ७० मिलीग्राम प्रति डेसीलिटरपर्यंत कमी होऊ शकते. या स्थितीत शरीर थरथरू लागतं, घाम येतो, चक्कर येते आणि हृदयाचे ठोके वाढू शकतात.

आरोग्य आणखी बिघडल्यास, किडनी निकामी होण्याचा धोका देखील वाढू शकतो. याशिवाय हायपोग्लायसेमिया झाल्यास त्याचा तुमच्या मेंदूवरही वाईट परिणाम होऊ शकतो.

वेळेवर उपचार न केल्यास, हायपोग्लायसेमियाच्या तीव्र झटक्यामुळे बेशुद्ध पडू शकता आणि मृत्यू देखील होऊ शकतो. आरोग्यविषयक कोणत्याही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.