जगातील सर्वात महाग 'ब्लॅक डायमंड अॅपल', आरोग्यासाठीही आहे फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 06:40 PM2023-06-06T18:40:30+5:302023-06-06T18:48:53+5:30

Black Diamond Apple: सफरचंदात अनेक पोषक तत्वांसोबतच त्यात फायबरचे प्रमाणही जास्त असते.

जगभरात खाल्या जाणार्‍या लोकप्रिय फळांबाबत विचार केला तर सफरचंद या यादीत अग्रस्थानी आहे. सफरचंदात अनेक पोषक तत्वांसोबतच त्यात फायबरचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे डॉक्टर रोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात.

सफरचंदांच्या रंगांबद्दल बोलायचे तर ते लाल, हिरवे, पांढरे आणि पिवळे असतात. या सर्व सफरचंदांचे प्रकार आणि फायदे वेगवेगळे आहेत. पण असेच एक सफरचंद आहे, ज्याबद्दल तुम्हाला क्वचितच माहिती असेल, पण ते इतर सफरचंदांपेक्षा जास्त लोकप्रिय आहे.

या सफरचंदाचे नाव ब्लॅक डायमंड अॅपल आहे, जे तिबेटच्या डोंगरावर आढळते. या संफरचंदाचा रंग गडद जांभळ्यापासून काळा होतो. मात्र, हे सफरचंद आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

ब्लॅक डायमंड सफरचंद आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर आहे. इतर सफरचंदांप्रमाणेच यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात आढळते, जे आतडे आरोग्य आणि पचनासाठी फायदेशीर आहे. याशिवाय, या सफरचंदात व्हिटॅमिन सीसह अनेक आवश्यक पोषक घटक असतात.

यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीराला फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. दरम्यान, थेट सूर्यप्रकाश आणि अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे या सफरचंदाचा रंग काळा होतो.

या फळाची दुर्मीळता आणि काळजीपूर्वक लागवडीच्या प्रक्रियेमुळे 'ब्लॅक डायमंड सफरचंद' महाग मिळते. या काळ्या सफरचंदाची किंमत जवळपास 500 रुपये आहे. हे सफरचंद लाल सफरचंदांपेक्षा अधिक आरोग्यदायी असल्याचे म्हटले जाते.

याला अनेकदा लक्झरी फळांच्या श्रेणीत ठेवले जाते. सफरचंदाचा विशिष्ट रंग आणि त्यातून मिळणारे फायदे हे त्याच्या लागवडीचे परिणाम आहेत. लागवड प्रक्रियेमध्ये अचूक तापमान आणि प्रकाश नियंत्रित करणे समाविष्ट असते.