टेन्शन वाढलं! कोरोनानंतर आला जीवघेणा Marburg Virus; 'ही' 10 लक्षणं दिसताच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 11:05 AM2023-02-20T11:05:26+5:302023-02-20T11:11:22+5:30

Marburg Virus : कोरोना व्हायरस साथीच्या रोगानंतर मारबर्ग व्हायरसने आता चिंता वाढवली आहे.

कोरोना व्हायरस साथीच्या रोगानंतर मारबर्ग व्हायरसने आता चिंता वाढवली आहे. या धोकादायक व्हायरसमुळे आफ्रिकेत 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. हा व्हायरस जीवघेण्या इबोलासारखाच आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने अलीकडेच मध्य आफ्रिकेतील एक लहान देश इक्वेटोरियल गिनीमध्ये व्हायरसची पुष्टी केली आहे.

मारबर्ग व्हायरसमुळे या देशात 10 जणांचा मृत्यू झाला असून आणखी 16 संशयित प्रकरणांची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. असे मानले जाते की हा व्हायरस खूप प्राणघातक आहे आणि त्यावर उपचार न केल्यास तो 88 टक्के लोकांसाठी प्राणघातक ठरू शकतो. हा धोकादायक व्हायरसची लक्षणे काय आहेत आणि तो कसा टाळता येईल हे जाणून घेऊया...

असं मानलं जातं की मारबर्ग व्हायरसची उत्पत्ती आफ्रिकन फळ खाणाऱ्या वटवाघळांमध्ये झाली आहे. सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शन (CDC) नुसार, युगांडामधून आयात केलेल्या माकडांसह काम करणार्‍या लोकांमध्ये 1967 मध्ये जर्मनी आणि पूर्वीच्या युगोस्लाव्हियामध्ये आढळला.

डब्ल्यूएचओच्या मते, खाणींमध्ये किंवा गुहांमध्ये जास्त वेळ काम करणाऱ्या अशा लोकांना जास्त धोका असतो कारण अशा ठिकाणी वटवाघुळं आढळतात. हा व्हायरस संक्रमित व्यक्तीच्या रक्ताच्या किंवा इतर शारीरिक द्रव्यांच्या थेट संपर्काने, दूषित झालेल्या पृष्ठभागांद्वारे, जसे की कपड्यांद्वारे पसरतो.

WHO च्या मते, मारबर्ग व्हायरसची लक्षणे अचानक सुरू होऊ शकतात आणि त्यात खूप ताप, तीव्र डोकेदुखी आणि अस्वस्थता यांचा समावेश होतो. या व्यतिरिक्त, स्नायू दुखणे आणि वेदना देखील असू शकतात. याचा प्रत्येक अवयवावर परिणाम होऊ शकतो.

तज्ञांचा असा विश्वास आहे की तुम्हाला गॅस्ट्रोइंटेस्टाइनल (आतड्यांसंबंधी) समस्या होऊ शकते. या व्हायरसमुळे रक्तस्त्राव सहज होऊ शकतो. पहिल्या सात दिवसांत त्वचेवर पुरळ दिसू शकतात.

हा व्हायरस केंद्रीय मज्जासंस्थेवर परिणाम करू शकतो, ज्यामुळे तुम्हाला भ्रम, आक्रमकता आणि चिडचिड होऊ शकते. मारबर्ग व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आठ ते नऊ दिवसांनी पीडित व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

मारबर्गसाठी सध्या कोणतीही लस नाही आणि त्यावर उपचार करण्यासाठी कोणतीही औषधं नाहीत. परंतु रुग्णांना मदत केली जाऊ शकते. तथापि, लक्षणे कमी करण्यासाठी रुग्णाची काळजी घेणे आवश्यक आहे. रुग्णाला भरपूर द्रव पदार्थ द्या आणि इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्याचा प्रयत्न करा.

तज्ञांचा असा विश्वास आहे की सध्या व्हायरसचा प्रादुर्भाव केवळ प्रादेशिक असल्याचे दिसून येत आहे परंतु संसर्ग पृथ्वीच्या एका भागातून दुसर्‍या भागात फार लवकर पसरू शकतो. उदाहरणार्थ, मध्य आफ्रिकेतील इबोला व्हायरसचा साथीचा प्रादुर्भाव कमी होता पण नंतर तो मोठ्या महामारीत बदलला.

मारबर्ग व्हायरस हा संपूर्ण जगासाठी चिंतेची बाब ठरू शकतो. वेगाने पसरणाऱ्या व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात य़ेत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.