काय आहे Molnupiravir? कोरोनाविरोधात कितपत प्रभावी? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2021 11:10 IST2021-11-06T10:54:56+5:302021-11-06T11:10:57+5:30
What is Molnupiravir: कोरोनाशी लढण्यासाठी उपलब्ध असलेली Molnupiravir ही पहिली प्रभावी गोळी आहे, असा मर्क कंपनीचा दावा आहे.

युरोपीय देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. याविरुद्ध लसीकरण मोहीम सुरू असूनही त्यावर नियंत्रण मिळवणे जगाला अद्याप शक्य झालेले नाही. दरम्यान, कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी एक गोळी आणली आहे. या गोळीचे Molnupiravir असे नाव आहे.
इंग्लंड सरकारने ही गोळी रुग्णांवर वापरण्यास मान्यता दिली आहे. ही गोळी आघाडीची फार्मा कंपनी मर्कने (Merck) विकसित केली आहे. जगभरात आतापर्यंत 50 लाखांहून अधिक लोकांचा कोरोना महामारीमुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप पूर्णपणे संपलेला नाही. आतापर्यंत, लस हा कोरोनाला प्रतिबंध करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग मानला जात आहे.
परंतु कोरोनाचे नवीन व्हेरिएंट सतत येत असल्यामुळे लस 100 टक्के प्रभावी असल्याचा दावा कोणीही करू शकत नाही. अशा परिस्थितीत लस लागू केल्यानंतरही लोकांना कोरोना होऊ शकतो. हे तथ्य आहे. दरम्यान, कोरोनावर मात करण्यासाठी गोळी विकसित केल्यामुळे या लढाईला आणखी धार मिळण्याची शक्यता आहे. रुग्णाला पाच दिवस दररोज सकाळी आणि संध्याकाळी एक गोळी घ्यावी लागेल.
कंपनीचा दावा
कोरोनाशी लढण्यासाठी उपलब्ध असलेली ही पहिली प्रभावी गोळी आहे, असा मर्क कंपनीचा दावा आहे. हे औषध विकसित करण्यासाठी मर्कने अमेरिकन कंपनी Ridgeback Biotherapeutics कंपनीसोबत भागीदारी केली आहे. तसेच, कंपनीचा दावा आहे की या गोळीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत असे आढळून आले की, यामुळे रूग्णालयात दाखल होण्याचा किंवा मृत्यू होण्याचा धोका लक्षणीयरित्या कमी झाला आहे.
चाचणीत 775 जणांचा समावेश
गोळीच्या या चाचणीत 775 जणांचा समावेश करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. प्राथमिक माहितीनुसार, कोविड-19 संसर्ग झाल्यानंतर 5 दिवसांच्या आत हे औषध घेतलेल्या रुग्णांमध्ये रुग्णालयात दाखल होण्याचा आणि मृत्यूचा धोका 50 टक्क्यांनी कमी झाला आहे.
कंपनीने चाचणीबाबत सविस्तर सांगितले
कंपनीने चाचणीबाबत सविस्तर माहिती दिली की, molnupiravir घेतलेल्या फक्त 7.3 टक्के रुग्णांना एकतर रुग्णालयात दाखल करावे लागले किंवा त्यांचा मृत्यू झाला, तर ज्या कोरोना रुग्णांना डमी गोळी देण्यात आली, त्यांच्यामध्ये हा दर 14.1 टक्के होता. यासोबतच कंपनीने म्हटले आहे की, molnupiravir चे सेवन केलेल्या रुग्णांपैकी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही तर ज्या रुग्णांना त्याचे डमी लॉग देण्यात आले होते, त्यापैकी 8 रुग्णांचा मृत्यू झाला.
कशाप्रकारे काम करते ही गोळी? (How Does Molnupiravir Works)
हे औषध आपल्या शरीराच्या आरएनए यंत्रणेतील अडथळे दूर करते. या आरएनए यंत्रणेमुळे, व्हायरस आपल्या शरीरात प्रवेश केल्यानंतर आपोआप वाढतो. अशाप्रकारे, ही गोळी शरीरात व्हायरस वाढण्यापासून थांबवते. अशाप्रकारे, जेव्हा शरीरातील व्हायरसची संख्या कमी होते, तेव्हा अशा परिस्थितीत माणूस गंभीर आजारी होण्यापासून वाचतो, असे इंग्लंडच्या औषध नियामक मंडळाचे म्हणणे आहे. तसेच, मर्क कंपनीचे म्हणणे आहे की प्री-क्लिनिकल आणि क्लिनिकल डेटामुळे असे समजते की डेल्टा सारख्या सर्वात कॉमन सार्स-सीओवी-2 व्हेरिएंटविरूद्ध देखील molnupiravir पूर्णपणे प्रभावी आहे.
या गोळीला Lagevrio असेही म्हणतात
इंग्लंडच्या औषध नियामक मंडळाचे म्हणणे आहे की, या गोळीला Lagevrio असेही म्हणतात. कोविड-19 संसर्ग झाल्यानंतर लगेचच त्याचा वापर करावा. औषध नियामक मंडळाने आपल्या देशात कोरोनाची लागण झालेल्या लोकांसाठी त्याचा वापर करण्यास मान्यता दिली आहे.
मधुमेह, हृदयविकार रुग्णांवर प्रभावी
ही गोळी मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा आदी आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांनाही दिली जाऊ शकते, असे इंग्लंडच्या औषध नियामक मंडळाने म्हटले आहे. अशा आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांवर याचा दुष्परिणाम होत नाही.
भारतात कधी येणार?
भारतात या औषधाच्या वापराबाबत येथील औषध नियामक मंडळाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. अशा स्थितीत सध्या भारतात त्याचा वापर करता येणार नाही. मर्क कंपनीचे म्हणणे आहे की, या गोळीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जात आहे आणि या वर्षाच्या अखेरीस गोळ्यांचे 10 दशलक्ष डोस बनवणार आहे. कंपनीने या गोळीच्या 17 लाख डोससाठी अमेरिकेशी करार केला आहे.