Women Health: मासिक पाळी नियमित वेळेत यावी, त्यासाठी उपयुक्त ठरतील 'या' पाच सवयी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 12:35 PM2024-06-26T12:35:56+5:302024-06-26T12:48:28+5:30

Women Menstrual Health: महिलांना मासिक पाळीशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मासिक पाळी उशिरा येणे किंवा अनेक महिने न येणे हे देखील त्रासाचे कारण बनते. मासिक पाळीत काही महिन्यांचे अंतर असल्यास आणि जर पिरियड सायकल बिघडायला लागली तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. खरं तर, या कालावधीत त्रास होणे हे काही वाईट सवयींचे लक्षण असू शकते. त्या सवयी बदलण्यावर आणि सुधारण्यावर भर द्यावा, अन्यथा ही समस्या काळानुसार वाढू शकते, सांगताहेत आहारतज्ज्ञ डॉ. भोरकर.

स्त्रियांचे आरोग्य आणि नियमित मासिक पाळी यांचा घनिष्ट संबंध आहे. पाळी वेळेत असेल तर ते सुदृढ आरोग्याचे लक्षण मानले जाते. याउलट, मासिक पाळीत अडथळे येत असतील तर आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यावर प्रतिबंध लागावा म्हणून वेळेतच पुढील पाच सवयी बदला.

महिलांनी जास्त वेळ झोपू नये. आपल्या शरीराला गरज आहे तेवढीच झोप घ्यावी. गरजेप्रमाणे झोप घेतल्यास, तुमची मासिक पाळी देखील नियमित होईल. विशेषतः तरुण वयात अति झोपेमुळे शरीर जड होते, वजन वाढ होते आणि सुस्तपणा येतो. पूर्ण शरीराचे गणित बिघडते. हॉर्मोनल बॅलेन्स उत्तम ठेवण्यासाठी झोपेवर मर्यादा घाला किंवा रात्रीची ७-८ तास झोप घ्या, त्याव्यतिरिक्त झोपू नका. अथवा पाळीच्या समस्या उद्भवू शकतात.

अचानक वजनात फरक दिसून आला, तर त्याचा परिणाम मासिक पाळीवर देखील होतो. झपाट्याने वजन कमी झाल्यामुळे किंवा वाढल्यामुळे शरीरात अनेक बदल होतात, ज्यामुळे पीरियड सायकल देखील बदलू शकते. म्हणजेच जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त व्यायाम करत असाल किंवा तुमच्या वजनाकडे अजिबात लक्ष दिले नाही तर तुमची मासिक पाळी देखील अनियमित होऊ शकते.

उत्तम आहार हे उत्तम आरोग्याचे रहस्य आहे. जर तुमचा आहार योग्य नसेल तर त्याचा फटका तुमच्या शरीराला सहन करावा लागतो. जरी तुम्ही बाहेरचे जंक फूड जास्त खाल्ले किंवा तुमच्या आहारात आवश्यक पोषक तत्वांचा समावेश केला नाही तरीही तुमची मासिक पाळी वेळेवर येणे थांबू शकते. त्यामुळे सकस आहार खा. बाहेरील जंक फूड जास्त खाणे टाळा. ज्या पदार्थांत पोषक तत्वांचा समावेश असेल, असे पदार्थ खा.

अनेक मुली गर्भधारणा टाळण्यासाठी लग्नाआधी किंवा लग्नांनंतर गर्भनिरोधक गोळ्या जास्त प्रमाणात सेवन करतात. गर्भनिरोधक गोळ्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडवतात, ज्यामुळे अनियमित मासिक पाळीची समस्या देखील उद्भवते.

तणावामुळे शरीराचे अनेक नुकसान होते. जसा आरोग्यासाठी ताण हानीकारक आहे, तसाच हा ताण पीरियड सायकलवर देखील परिणाम करू शकतो. तणाव कमी करणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे, अन्यथा मासिक पाळीवर त्याचा परिणाम वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो. यामुळे तुमची मासिक पाळी अनियमित होवू शकते. त्यामुळे नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमच्या शरीरावर देखील त्याचा चांगला परिणाम होईल.