Coronavirus : "आशियातील अनेक देशांमध्ये कोरोनाची प्रकरणे वेगाने वाढू शकतात", WHO कडून मोठा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 11:08 AM2022-03-17T11:08:19+5:302022-03-17T11:19:54+5:30

Coronavirus : WHO ने जगभरातील देशांना इशारा देताना म्हटले आहे की, येत्या काही दिवसांत कोरोना प्रकरणांमध्ये मोठी वाढ होऊ शकते.

नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने (Corona) जगभरात हाहाकार माजवला आहे. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून देशात कोरोनाचे रुग्ण सतत कमी होत आहेत, त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. परंतू, आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मोठा इशारा दिला आहे. WHO ने जगभरातील देशांना इशारा देताना म्हटले आहे की, येत्या काही दिवसांत कोरोना प्रकरणांमध्ये मोठी वाढ होऊ शकते.

आयएएनएस या वृत्तसंस्थेनुसार, WHO ने म्हटले आहे की, जगभरात कोरोनाचे रुग्ण अचानक वाढू शकतात. याचे कारण म्हणजे कोरोनाची टेस्टिंग सतत कमी होत आहे आणि गेल्या काही आठवड्यांपासून कमी प्रकरणे नोंदवली जात आहेत.

याशिवाय, कोणत्या देशांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळू शकतात, हेही WHO ने सांगितले आहे. WHO च्या मते, आशियातील अनेक देशांमध्ये कोरोनाची प्रकरणे वेगाने वाढू शकतात. तर काही देशांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्यास सुरूवात झाली आहे.

चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत असताना WHO कडून इशारा देण्यात आला आहे. चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा सर्वांना हैराण केले आहे, त्यामुळे अनेक भागात लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे, तर इतर भागात कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत.

चीनमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2 ची प्रकरणे नोंदवली जात आहेत. हा व्हेरिएंट जास्त धोकादायक नसला तरी त्याचा प्रसार वेगाने होत असल्याचे म्हटले जात आहे. चीनशिवाय इतर काही देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.

कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटने जगाला हैराण केले आहे, ओमायक्रॉन नंतर आता नवीन व्हेरिएंट सुद्धा समोर आला आहे. ज्यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. इस्रायलमध्ये या व्हेरिएंटची दोन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

कोरोनाचा हा नवीन व्हेरिएंट BA.1 आणि BA.2 च्या सब व्हेरिएंटमुळे तयार झाल्याचे म्हटले जात आहे. सध्या या व्हेरिएंटबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही, मात्र ते फारसे धोकादायक नसल्याचे इस्रायलने म्हटले आहे.

जगातील सर्वच देशांमध्ये कोरोनाची स्थिती पाहता भारतातही याबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. जूनपर्यंत भारतात तिसऱ्या लाटेचा प्रभाव दिसून येईल, असा दावा केला जात आहे. त्यामुळेच आरोग्य मंत्रालय कोरोनाबाबत सातत्याने बैठका घेत आहे.

यासोबतच कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मात्र, सध्या भारतात कोरोनाचे रुग्ण सातत्याने कमी होताना दिसत असून त्याबाबत लादलेले निर्बंधही जवळपास हटवण्यात आले आहेत.