World Milk Day: दूध आणि या पदार्थांचं कॉम्बिनेशन ठरू शकतं घातक, एकत्र खाणं करा बंद!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 12:11 PM2023-06-01T12:11:10+5:302023-06-01T12:23:05+5:30

World Milk Day: काही पदार्थ एकत्र सेवन केल्याने पचनक्रियासंबंधी समस्या, वजन वाढणं आणि त्वचेसंबंधी समस्या होऊ शकतात.

काही पदार्थ असे असतात ज्यांचं एकत्र सेवन केलं तर शरीराला फायदे मिळण्याऐवजी त्याचे दुष्परिणाम अधिक होतात. पण हे लोकांना माहीत नसतं. ते बिनधास्त कशासोबतही काहीही खातात आणि पितात.

दूध आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पण काही पदार्थ आणि दुधाचं एकत्र सेवन केल्यास त्याचे अनेक साइड इफेक्टही होतात. आयुर्वेदानुसार, काही पदार्थ एकत्र सेवन केल्याने पचनक्रियासंबंधी समस्या, वजन वाढणं आणि त्वचेसंबंधी समस्या होऊ शकतात.

उडीद डाळ आणि दूध दोन्ही गोष्टी पचनाला वेळ घेतात. त्यामुळे या दोन्ही एकत्र सेवन केल्याने गॅसची समस्या होऊ शकते. त्यासोबतच असे अनेक पदार्थ आहेत, जे दुधासोबत सेवन करणे महागात पडू शकतं.

चटपटीत किंवा चिप्स - दुधासोबत चिप्स आणि चटपटीत पदार्थ खाणे टाळा. मिठामुळे दुधात असलेल्या प्रोटीनचा पूर्ण फायदा मिळू शकत नाही. तसेच असे केल्याने त्वचेशी संबंधित समस्याही होऊ शकतात.

कांदा - तुम्ही जे खाताय त्यात कांदा असेल तर त्यासोबत किंवा ते खाऊन झाल्यावर दुधाचं सेवन करू नका. या कॉम्बिनेशनने खाज, एग्जिमा, शरीरावर लाल चट्टे अशा त्वचेसंबंधी समस्या होऊ शकतात.

तिखट - मसालेदार पदार्थ खात असाल तर त्यासोबत दूध किंवा दुधापासून तयार पदार्थ खाणे टाळा. हे पदार्थ एकत्र खाल्ल्याने पोटदुखी, अ‍ॅसिडिटी, गॅस आणि उलटीची समस्या होऊ शकते.

मासे - मासे गरम असतात. तर दूध थंड असतं. या दोन्ही गोष्टी एकत्र सेवन केल्यास गॅस, अॅलर्जीची समस्या होऊ शकते.

दही - दूध आणि दह्यापासून तयार पदार्थ एकाचवेळी खाऊ नये. हे पदार्थ एकाचवेळी खाल्ल्याने अॅसिडिटी, गॅस, उलटी आणि अपचन यांसारख्या समस्या होतात.

लिंबू - लिंबू किंवा इतर दुसरे आंबट पदार्थ खाणार असाल तर पुढील एक तास दुधाचं सेवन करू नका. हे एकत्र खाल्ल्याने अॅसिडिटी, गॅसची समस्या होऊ शकते.