वर्ल्ड फिजिओथेरपी डे: 'या' आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी फिजिओथेरपी ठरते वरदान By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 01:24 PM 2021-09-09T13:24:07+5:30 2021-09-09T13:48:31+5:30
अस्थिव्यंगतज्ज्ञ औषधांच्या जोडीला अनेकदा फिजिओथेरपीचा उपाय सांगतात.व्याधीचे मूळ कारण शोधून काढून व्यायामाची शास्त्रीय पद्धतीने जोड देऊन दुखण्यावर मात करण्याची किमया फिजिओथेरपीमध्ये असते. त्यामुळे जुनी दुखणी, अपघातातील दुखापती, बदलत्या जीवनशैलीमुळे येणारे आजार, हाडांमधील जुनी दुखणी बरी करण्यासाठी मदत घेतली जाते. रोजच्या आयुष्यात आपल्या शरीराची हालचाल नीट होणं आवश्यक असतं. शरीराच्या प्रत्येक अवयवाचं कार्य पूर्ण क्षमतेने होत असतं. पण, काही वेळेस अपघात किंवा अशाच काही प्रसंगांमुळे आपल्या शरीरातील अवयव/सांधे आखडतात किंवा दुखावतात. अशा वेळी त्या अवयवांना/सांध्यांना पुन्हा सुधारण्याचं काम फिजिओथेरपिस्ट करतात.
अस्थमा, छातीमधील संसर्ग तसंच हृदयासंबंधित तीव्र आजार, मोठ्या सर्जरीनंतर रुग्णांना स्वत:ची तब्येत सुधारण्यासाठी फिजिओथेरपी साहाय्य करते
पाठीच्या दुखण्यामध्ये मुख्यत्वे वेगवेगळी कारणे आहेत. लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, तणाव, स्नायू ताणून धरणे, चुकीच्या पद्धतीच्या बैठकी यामुळे हाडांमध्ये वा स्नायू दुखू लागले तर या फिजिओथेरपीच्या काही विशिष्ट दिवसांच्या कोर्सनंतर हे दुखणे आटोक्यात येते. मात्र, या आजाराची मूळ कारणं शोधून काढून त्यावर फिजिओथेरिपिस्टने सांगितल्यानुसार सवयी तसेच जीवनशैलीत बदल करणे आवश्यक असते
फ्रॅक्चर केल्यामुळे हाड जोडले जाते पण हालचाल करताना स्नायुंमध्ये वेदना जाणवत असतात.कारण दुखापत झालेल्या भागातील स्नायु हालचाल कमी झाल्यामुळे जखडले जातात.पण फिजिओथेरपीने या वेदना व सूज कमी करण्यास मदत होते व तुम्हाला पुर्ववत हालचाल करणे देखील सोपे जाते.
आजचं जीवन हे धकाधकीचं आणि धावपळीचं झाल्यामुळे गुडघेदुखी, खांदेदुखी आणि टाचदुखी इत्यादीच्या त्रासाला अनेकांना सामोरं जावं लागतं. या धावपळीमध्ये (तरुणपणी) आपण या दुखण्यांकडे दुर्लक्ष करतो. जसजसं वय वाढत जातं, तसतसे हे दुर्लक्षिलेले आजार डोकं वर काढायला लागतात. अनेक पद्धतीनं उपचार करूनही त्यातून सुटका होत नाही. अशा दुखण्यांवर फिजिओथेरपीद्वारे योग्य उपचार करून घेतल्यास गुडघेदुखी, सांधेदुखी इत्यादींपासून सुटका होऊ शकते.
स्पॉन्डिलिसिस : या प्रकारच्या ८० टक्के रुग्णांना अस्थिव्यंगतज्ज्ञ फिजिओथेरपीची उपचारपद्धती घेण्याची सूचना देतात.
मेंदूशी संबंधित समस्या सोडवण्याचं काम न्यूरोलॉजिकल फिजिओथेरपिचा फायदा होतो. या विषयातले तज्ज्ञ त्या सोडवण्यासाठी उपयुक्त व्यायाम कसे करायचे, हे सांगतात.
वय वाढल्यामुळे वृद्धांमध्ये दिसून येत असणाऱ्या समस्या सोडवून त्यांना आरोग्य मिळवून देणं आणि या वृद्धांना अधिक कार्यक्षमतेनं शरीराचं कार्य सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी गेरिअॅट्रिक फिजिओथेरपीचा फायदा होतो
फिजिओथेरपीत व्यायामाचे प्रकार हे विशिष्ट पद्धतीने करायचे असतात, ते विशिष्ट अवयवांच्या दुखण्यांसाठीच ठरवलेले असतात. काही विशिष्ट कालमर्यादेत केलेल्या या व्यायामप्रकारांनी आराम मिळतो. चालताना,धावताना वा खेळताना निर्माण झालेली दुखापत ही त्रासदायक ठरते. या दुखापती फिजिओथेरपीने बऱ्या होतात.
हायड्रो थेरपी या फिजिओथेरपीतील या उपचारपद्धतीमध्ये विशिष्ट तापमानाच्या पाण्याने आंघोळ केली जाते. त्यामुळे दुखऱ्या स्नायूंना आराम मिळतो. ही थेरपी अनेकदा छोट्या मुलांच्या दुखण्यांमध्ये सुचवली जाते. अपंग तसेच मतिमंद मुलांमध्ये ही थेरपी प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.