मुलीच्या लग्नाच्या पूर्वसंध्येलाच घरात दुर्घटना;भिंत कोसळून वधू मातापिता गंभीर जखमी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 05:42 PM 2021-07-24T17:42:24+5:30 2021-07-24T17:53:18+5:30
Husband and wife seriously injured due to wall collapses incident in Hingoli : इसाखोद्दीन जहिरोद्दीन खतीब यांच्या मुलीचे रविवारी ( दि. 25 जुलै) सकाळी 10 वाजता लग्न आहे. इसाखोद्दीन यांनी मुलीच्या लग्नाची सर्व तयारी करून सामान घरात ठेवले होते. मुलीच्या लग्नाच्या पूर्वसंध्येला घरात दुर्घटना झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. औंढा नागनाथ (हिंगोली ) : येथील रहिम चौक परिसरात शनिवारी दुपारी ३ वाजता शेजारच्या घराची भिंत कोसळली यात इसाखोद्दीन जहिरोद्दीन खतीब व त्यांची पत्नी आरेफाबी इसाखोद्दीन खतीब हे गंभीर जखमी झाले आहेत. तर त्यांच्या तीन शेळ्या भिंतीच्या मलब्याखाली दबून जागीच ठार झाल्या.
इसाखोद्दीन जहिरोद्दीन खतीब यांच्या मुलीचे रविवारी ( दि. 25 जुलै) सकाळी 10 वाजता लग्न आहे. इसाखोद्दीन यांनी मुलीच्या लग्नाची सर्व तयारी करून सामान घरात ठेवले होते. आज दुपारी त्यांच्या शेजारील अंवर खान पठाण यांच्या घराची भिंत अचानक कोसळली. या भिंतीखाली इसाखोद्दीन व त्यांच्या पत्नी अरेफाबी दबले गेले.
अचानक भिंत कोसळ्याने त्याखाली दबल्या गेल्याने दोघेही गंभीर जखमी असून त्यांच्यावर औंढा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भिंतीखाली दबून त्यांच्या तीन शेळ्या मात्र जागीच ठार झाल्या आहेत.
भिंत पडण्याचा मोठा आवाज झाल्याने शेजारी अझर इनामदार, अहमद खान पठाण, समीर इनामदार, शेख कासिम, शेख कलीम, शफी खतीब, शेख रुस्तुम, शेख नसीब, आश्रम पठाण,अलीम खातीब हे धावून आले. त्यांनी तत्काळ ढिगार्याखाली दबलेल्या पतीपत्नीस बाहेर काढले.
तसेच या दुर्घटनेत मुलीच्या लग्नासाठी खरेदी केलेले साहित्य पूर्णतः उध्वस्त झाले आहे. सुदैवाने घरातील लहान मुले बाहेर खेळण्यासाठी गेले होते. महसूल विभागाकडून पंचनामा सुरू होता.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे, जमादार अफसर पठाण, घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
अचानक झालेल्या या दुर्घटनेत कुटुंबाचे 3 लाखाच्या आसपास नुकसान झाले आहे. मुलीच्या लग्नाच्या पूर्वसंध्येलाच वधूपित्यावर कोसळलेल्या या संकटाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.