बिस्कीटवाला ! महादेवाच्या भक्ताकडून माकडांना दररोज गोड नाष्टा; तरुणाच्या भूतदयेची पंचक्रोशीत चर्चा By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 06:13 PM 2021-08-13T18:13:40+5:30 2021-08-13T18:33:42+5:30
( रमेश कदम ) हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे चहाची टपरी चालवणारा गजाजन कोरडे दररोज माकडांना बिस्किटांचा खाऊ देतो. दररोज चोवीस पुडे घेऊन जात तो स्वतःच्या हाताने माकडांना बिस्किटे खाऊ घालतो. ही माकडेही त्याच्या परिचयाची झाली आहेत. दररोज त्याची वाट पाहतात. चहावाल्याची माकडांप्रतीची ही आपुलकी परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. ( व्हिडिओ - https://fb.watch/7m8rlpfaGT/ ) मनुष्यास अन्नदान करून पुण्य मिळविणारे अनेक माणसे समाजात आहेत. कोणी भक्तीपोटी तर कोणी श्रद्धेपोटी अन्नदानाचा यज्ञ राबवीत असतो. परंतु, माकडांसाठी अन्नदानाचा यज्ञ चालवणारा आखाडा बाळापूर येथील हा तरुण विराळाच.
आखाडा बाळापूर जवळच कृष्णापूर हे गाव आहे. या गावातील एक तरुण गजानन कोरडे हा आखाडा बाळापूर येथील जुन्या बसस्थानकावर चहाची टपरी चालवतो. बाळापुरातील पंचमुखी महादेव मंदिर हे त्याचे श्रद्धेचे ठिकाण आहे. तो नेहमी येथे आपल्या कुवतीप्रमाणे दानधर्म करत असतो.
कृष्णापूर येथील महादेव मंदिराजवळ असलेल्या झाडांवर गेल्या काही वर्षांपासून माकडांची टोळी वास्तव्यास असते. इरिगेशन कॅम्पमध्ये वसाहत मोडकळीस असली तरी येथील झाडांवर वानरांच्या टोळ्या मात्र कायम पाहायला मिळतात.
गजानन कोरडे हा सकाळी चहाची टपरी उघडण्यासाठी जाताना या वानरांसाठी आपल्या पिशवीत बिस्कीटचे पुढे घेऊन येतो. बिस्कीटचे पुडे फोडून प्रत्येकाच्या हातात बिस्किट देतो. वानरांना हातात रुचकर बिस्किट मिळत असल्याने त्यांचा सकाळचा नाष्टा कमालीचा गोड होत असतो.
इरिगेशन कॅम्प ते कृष्णापूर या रस्त्यावर माकडे सकाळीच गजाननची वाट पाहत असतात. गजानन दिसताच एखाद्या लेकराप्रमाणे त्याच्याजवळ जातात. लडीवाळपणे त्याला बिस्किटांची मागणी करतात.
गजाननही न चुकता बिस्किटांचे पुडे आणतो आणि माकडांना देतो. माकडांच्या उच्छादाने वैतागलेले, त्रासलेले नागरिक गजानन आणि माकडाचे हे नाते कुतूहलाने पाहतात.
पाहणाऱ्यांना काही काळापुरता गजाननचा हेवा वाटतो. किमान मजुरी कमावणारा गजानन माकडांच्या नाश्त्यावर मात्र दररोज 120 रुपये खर्च करतो. त्याची ही ' दानत ' महादेव मंदिराला येणाऱ्या भक्त गणांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.
माकडांना हनुमानाचे रूप माननारा गजानन नित्यनेमाने बिस्किटांचा नाश्ता पुरवीत असतो. त्याला या कामी कुठलाही लोभ नाही. तर माकडांचाही जीव असतो. त्यांनाही गोडधोड खाऊ वाटतं अशा सरळ शब्दात तो आपल्या कामाचं वर्णन करतो.
गजाननची ही भूतदया आता पंचक्रोशीत पसरली आहे. हे दृश्य पाहण्यासाठी अनेक जण सकाळीच येथे येतात. जीव लावला की प्राणीही माणसाशी अतीव प्रेमाने वागतात याचे मूर्तिमंत उदाहरण कृष्णापूर येथे पाहावयास मिळते.