हॉकी वर्ल्ड लीगमध्ये भारतानं मिळवलं कांस्यपदक, जर्मनीचा 2-1नं केला पराभव By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 04:05 PM 2017-12-11T16:05:01+5:30 2017-12-11T16:12:29+5:30
हॉकी विश्व लीग स्पर्धेत पुन्हा एकदा सुवर्ण पदक मिळवण्यात अपयशी ठरल्यानंतर भारतीयांनी कांस्य पदकाच्या निर्णायक लढतीत जर्मनीचा 2-1 असा पाडाव करत बाजी मारली
सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतरही प्रेक्षकांनी भारतीय संघाला प्रोत्साहन द्यायला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. या जोरावरच भारतीय खेळाडूंनी कांस्यपदक निसटू दिले नाही.
एस. व्ही. सुनील (21वे मिनिट) आणि हरमनप्रीत सिंग (54) यांनी प्रत्येकी एक गोल करत भारताचे कांस्य पदक निश्चित करण्यात मोलाचे योगदान दिले. त्याचवेळी मार्क अॅपेल याने जर्मनीचा एकमेव गोल साकारला.
खेळाडूंच्या दुखापतीमुळे जर्मनीने या सामन्यात आपल्या अनेक राखीव खेळाडूंना मैदानात उतरवले होते.
साखळी सामन्यात जर्मनीने भारताला 2-0 असा धक्का दिला होता. या पराभवाचा वचपाही यावेळी भारताने काढला
आक्रमक सुरुवात केलेल्या जर्मनीने दोन्ही क्वार्टरमध्ये एकूण सहा पेनल्टी कॉर्नर मिळवले. मात्र भारतीयांनी आपल्या भक्कम बचावाच्या जोरावर त्यांना यश मिळवू दिले नाही.