The Boy Who Sold The Orange Set Up A Company With A Turnover Of 400 Cr. Pyare Khan Success Story
नागपूर स्टेशनवर संत्री विकली, रिक्षा चालवली अन् आज ४०० कोटीच्या कंपनीचा मालक बनला By प्रविण मरगळे | Published: November 11, 2020 04:15 PM2020-11-11T16:15:33+5:302020-11-11T16:19:11+5:30Join usJoin usNext इच्छाशक्ती असेल तर माणूस यशाचं शिखर सहजपणे गाठू शकतो, ही कहाणी आहे नागपूरमधील उद्योगपती प्यारे खान यांची...अत्यंत संघर्षमय जीवनातून त्यांनी आयुष्यात मोठं यश निर्माण केलं. एकेकाळी रेल्वे स्थानकात संत्री विकणारा ४०० कोटींची उलाढाल असणाऱ्या कंपनीचा मालक बनला आहे. ट्रान्सपोर्ट कंपनी अश्मी रोड ट्रान्सपोर्टचे मालक प्यारे खान यांनी त्यांच्या यशाचा संपूर्ण प्रवास सांगितला आहे.मी नागपूरच्या झोपडपट्टी भागात माझे दोन भाऊ, बहिण आणि आई वडील यांच्यासह राहत होतो. वडील खेडोपाडी जाऊन कपडे विकत असत, पण जर त्यातून काही कमाई होत नसे, त्यांनी ते काम बंद केले. मग मुलांना वाढवण्यासाठी आईने किराणा दुकान सुरू केले. त्यातून कुटुंब जगू शकत होतं. १२-१३ वर्षापासून मी बाहेर काम करायला लागलो. उन्हाळ्याच्या सुट्टीतील दोन महिने फक्त काम करत होतो, रेल्वे स्थानकात संत्री विकायची आणि त्यातून दररोज ५०-६ रुपये कमवायचे. त्यानंतर गाड्या साफ करण्यासारख्या बर्याच लहान गोष्टी देखील केल्या असल्याचं प्यारे खान म्हणाले. दहावीत नापास झाल्यावर मग मी शिक्षण सोडण्याचे ठरविले कारण घरी अभ्यास करण्यासारखी परिस्थिती नव्हती. जेव्हा मला वाहन चालविण्याचा परवाना मिळाला, तेव्हा मी कुरिअर कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करण्यास सुरूवात केली. यावेळी माझा अपघात झाला तेव्हा तेही काम सोडले. त्यानंतर काही दिवसांनंतर भाड्याने रिक्षा घेऊन चालवू लागलो. काही वर्षांनी आईने दागिने विकून ११ हजार रुपये दिले आणि बाकी कर्ज काढून मी स्वत:ची रिक्षा घेतली. ऑटोमधून २०० ते ३०० रुपयांची दररोज कमाई होत असे. २००१ पर्यंत असचं सुरु होतं. त्यानंतर मनात आलं की, हेच काम करत राहिलो तर आयुष्यभर करावं लागेल, म्हणून ४२,५०० रुपयांना रिक्षा विकून टाकली. घरच्यांनी विरोध केला पण मला काहीतरी वेगळं करायचं होतं. रिक्षा विकून आलेल्या पैशातून परफ्युम, कॅमेरे यासारख्या वस्तू कोलकाताहून नागपूरला आणून विकू लागलो. दुकान सुरू करण्याव्यतिरिक्त, मी ऑर्केस्ट्रा ग्रुपमध्ये कीबोर्ड देखील वाजवत होतो. ग्रुप टूरला जात असे आणि ब-याचदा बसेस लागत होत्या, त्याचा हिशोब शेठ माझ्याकडे देत होते. एक दिवस मी सेठला विचारले की, आपण टूरसाठी बस भाड्याने घेतो, जर मी बस खरेदी केली तर तुम्ही भाड्याने घ्याल का? तेव्हा ते होय म्हणाले, मग मी पैसे उभे केले. स्वत:चे काही, नातेवाईक आणि बँकेकडून कर्ज घेऊन एक बस विकत घेतली. पण बस फारशी टिकली नाही आणि काही दिवसांत ते काम थांबले. त्यानंतर मी बँकांच्या फेऱ्या मारत होतो, कारण मला स्वतःचा ट्रक घ्यायचा होता. कोणतीही बँक मला कर्ज देत नव्हती. ते घराचा पत्ता विचारत असत. घर झोपडपट्टीमध्ये असल्याने कोणत्याही बँकेने कर्ज मंजूर केले नाही. वर्षभर प्रयत्न करून मला एका बँकेकडून मोठ्या अडचणीने ११ लाख रुपयांचे कर्ज मिळाले. मी त्या बँकेत पुन्हा पुन्हा भेटायचो, त्यांना वाटलं की हा माणूस गरजू आहे आणि मला काम करण्याची आवडही..ते पाहून बँकेच्या अधिकाऱ्यांनी मला कर्ज मंजूर केले, मग मी पहिला ट्रक घेतला आणि तो नागपूर ते अहमदाबाद दरम्यान चालविला. काही दिवसांनंतर ट्रकचा अपघात झाला. नातेवाईक म्हणाले की ट्रक बँकेला परत कर. तू हे काम करू शकत नाही, मी अपघाताच्या ठिकाणी गेलो आणि ट्रक घेऊन आलो. ड्रायव्हर दवाखान्यात दाखल केले. ट्रक दुरुस्ती केल्यानंतर मी पुन्हा रस्त्यावर उतरवला. अपघात झाल्याने बँकेचे २-३ महिने हफ्ते थकले, परंतु काम सुरु झाल्यानंतर मी हफ्ते पुन्हा दिले. २००५ मध्ये एक-दोन ट्रक खरेदी केले. २००७ पर्यंत माझ्याकडे दहा ते बारा ट्रक होते. मग मी कंपनी अश्मी रोड ट्रान्सपोर्टच्या नावावर कंपनीची नोंदणी केली. खऱ्या अर्थाने २००७ पासून माझ्या कामाला सुरुवात झाली. मी अशाठिकाणी काम घेणे सुरु केले ज्याठिकाणी दुसरे लोक घाबरत होते, खूप जोखीम घेतली. हळूहळू मला मोठ्या ग्रुप्सची कामे मिळू लागली. काही वर्षांपूर्वी दोन पेट्रोल पंपही उघडले.. आज कंपनीची ४०० कोटींची उलाढाल आहे. ७०० हून अधिक कर्मचारी आहेत. पुढील दोन वर्षांत आमची कंपनी १ हजार कोटींपर्यंत उलाढाल करेल असा विश्वास आहे. मी कधीही यशाच्या मागे धावलो नाही पण मी कामाच्या मागे धावतो. जे काम हाती घेतलं ते पूर्ण करेपर्यंत सोडलं नाही. स्वत: ला त्यात पूर्णपणे झोकून दिलं. हेच माझ्या यशाचे रहस्य आहे असं प्यारे खान म्हणाले. टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीInspirational Stories