टेन्शन मिटलं! कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी गूड न्यूज; ऑस्ट्रेलियानं घेतला मोठा निर्णय By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 04:43 PM 2021-10-01T16:43:28+5:30 2021-10-01T16:57:19+5:30
ऑस्ट्रेलियाच्या थेरेप्यूटिक गुड्स अॅडमिनिस्ट्रेशनने (TGA) सेफ्टी डेटाच्या मूल्यांकनानंतर भारताच्या कोविशील्ड लसीला आणि चीनच्या कोरोनाव्हॅक (सिनोव्हॅक) लसीला "मान्यताप्राप्त लस" म्हणून सूचीबद्ध केले आहे. (Australia approves covishield for international travelers ) कोविशील्ड लस घेतलेल्या आणि ऑस्ट्रेलियाचा प्रवास करण्याची इच्छा असलेल्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. ऑस्ट्रेलियाने सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या कोविशील्ड लसीला मंजुरी दिली आहे. ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी एस्ट्राजेनेका लसीची भारतीय एडिशन असलेल्या कोविशील्डला आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी 'मान्यताप्राप्त लस' म्हणून घोषित केले आहे. (CoronaVirus Australia approves covishield for international travelers indian students will have to wait to return)
ऑस्ट्रेलियाच्या थेरेप्यूटिक गुड्स अॅडमिनिस्ट्रेशनने (TGA) सेफ्टी डेटाच्या मूल्यांकनानंतर भारताच्या कोविशील्ड लसीला आणि चीनच्या कोरोनाव्हॅक (सिनोव्हॅक) लसीला "मान्यताप्राप्त लस" म्हणून सूचीबद्ध केले आहे.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि काही मंत्र्यांनी संयुक्तपणे जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेली कोविशील्ड लस आणि कोरोनाव्हॅक ही चीनी लस, येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी 'मान्यता प्राप्त लस' म्हणून मानली जायला हवी.
ऑस्ट्रेलियाच्या या घोषणेमुळे, ज्या लोकांनी कोविशील्डचा डोस घेतला आहे आणि ज्या लोकांची ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याची इच्छा आहे, त्यांचे टेन्शन मिटले आहे.
या निवेदनात, जग पुन्हा सुरक्षितपणे खुले करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर होणाऱ्या बदलांसंदर्भात ऑस्ट्रेलिया कशा प्रकारे पावले उचलणार हे निश्चित करण्यात आले असल्याचेही सांगण्यात आले आहे. याशिवाय, येत्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय प्रवास कसा असेल, यासाठीही आमचे सरकार एक रोडमॅप तयार करत आहे, असेही या निवेदनात म्हणण्यात आले आहे.
भारतीय प्रवासी, विशेषत: विविध विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमधील अभ्यासक्रम शिकण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवासाची परवानगी देण्यात यावी, यासाठी भारत ऑस्ट्रेलियावर दबाव टाकत असतो. ऑस्ट्रेलियात परदेशी विद्यार्थ्यांचा विचार करता, भारत चीननंतरचा दुसरा सर्वात मोठा स्त्रोत आहे. भारतीय विद्यार्थ्यांनी 2019-20 दरम्यान ऑस्ट्रेलियन अर्थव्यवस्थेत 6.6 अब्ज डॉलर्सचे योगदान दिले आहे.
मात्र, ऑस्ट्रेलियन सरकारच्या या निवेदनातून, भारतीय विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियाच्या प्रवासासाठी परवानगी देण्यापूर्वी आणखीही काही व्यवस्था करावी लागणार आहे, असा स्पष्ट संकेत मिळतो.
यापूर्वी, 2022 मध्ये पहिल्या सत्राच्या अखेरपर्यंत परदेशी विद्यार्थ्यांचा ऑस्ट्रेलियात प्रवेश सुरू होणे अपेक्षित आहे. तसेच, 70% लोकसंख्येचे पूर्णपणे लसीकरण झाल्यानंतरच परराष्ट्र प्रवासासंदर्भात पुढील निर्णय घेण्याची ऑस्ट्रेलियन सरकारची योजना आहे, असे संबंधित अधिकाऱ्यांनी म्हटले होते.
सध्या ऑस्ट्रेलियात 78 टक्क्यांहून अधिक लोकांनी पहिला डोस घेतला आहे तर दुसऱ्या डोसचा दर 55 एवढा आहे. तसेच, पुढील आठवड्यात काही भागांत 70 टक्के लोकांचे पूर्णपणे लसीकरण होईल, असे मानले जात आहे.
ऑस्ट्रेलियन सरकार पहिल्या टप्प्यात ऑस्ट्रेलियन कुटुंबांची पुन्हा भेट घडवून आणण्यासाठी प्रवासाला परवानगी देणार आहे. यामुळे, ऑस्ट्रेलियातील कर्मचारी आत आणि बाहेरही प्रवास करू शकतील. सरकारचा हा निर्णय पर्यटकांना परवानगी देण्याच्या दृष्टीनेही काम करेल.