प्रेरणादायी! इडली डोश्यानं मजुराच्या मुलाचं आयुष्य बदललं; उभारली ७०० कोटींची कंपनी By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 12:18 PM 2021-09-01T12:18:18+5:30 2021-09-01T12:45:53+5:30
शेत मजूराचा मुलगा बनला उद्योगपती; एका शिक्षकानं आयुष्य बदललं मुस्तफा पीसीचा जन्म केरळमधल्या सुदूर गावचा. वडील मजुरी करायचे. हातातोंडाची कशीबशी गाठ पडायची. मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून वडिलांचा संघर्ष सुरू होता. वडिलांना साथ देण्यासाठी मुस्तफानं सहावीनंतर शिक्षण सोडलं आणि शेतात काम करण्यास सुरुवात केली.
मुस्तफा शेतात काम करून वडिलांना मदत करत होता. त्यावेळी एका शिक्षकाची भेट झाली. त्यांनी मुस्तफाला शाळेत परतण्यास सांगितलं. फक्त बोलून थांबले नाहीत, तर मुस्तफाला मदतीचा हातही दिला. यामुळे पुढे जाऊन मुस्तफाला पुढे जाऊन एक चांगली नोकरीच मिळाली नाही, तर त्यानं एक यशस्वी उद्योग उभारला. त्या उद्योगाची उलाढाल आज मिलियन डॉलरमध्ये सुरू आहे. ह्युमन्स ॲाफ बॅाम्बेसोबतच्या मुलाखतीत मुस्तफानं त्याचा जीवन प्रवास उलगडला.
आयडी फ्रेश फूड कंपनीचे सीईओ असलेल्या मुस्तफा पीसीनं त्यांचा थक्क करून टाकणारा जीवन प्रवास एका मुलाखतीत सांगितला. आपल्या उद्योगाची गोष्ट सांगताना त्यानं त्याला शिक्षण देणाऱ्या शिक्षकाचे आभार मानले. त्यांनी मोफत शिक्षण दिल्यामुळेच आपण इथवर पोहोचल्याची भावना मुस्तफानं व्यक्त केली.
मुस्तफाला पहिला पगार १४ हजार रुपये मिळाला होता. तो त्यानं वडिलांकडे आणून दिला. 'मी आयुष्यात जितके पैसे कमावले नाहीत, तितके तू एका महिन्यात कमावलेस,' असं त्यावेळी वडील मुस्तफाला म्हणाले होते. ते शब्द आजही मुस्तफाला आठवतात. मुस्तफाला परदेशात नोकरी मिळाल्यावर त्यानं वडिलांनी घेतलेलं २ लाखांचं कर्जदेखील फेडून टाकलं.
मुस्तफाला स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा होता. मात्र कोणता व्यवसाय करायचा असा विचार त्यांच्या डोक्यात सुरू होता. त्यावेळी त्यांनी चुलत भावाला एका साध्या पाकिटातून इडली-डोश्याचं पीठ विकताना पाहिलं. मात्र ग्राहक गुणवत्तेबद्दल तक्रार करत होते. त्याचवेळी त्यांच्या डोक्यात इडली डोश्याचं दर्जेदार पीठ विकण्याचा विचार आला.
आयडी फ्रेश फूड नावानं मुस्तफानं त्याची कंपनी सुरू केली. सुरुवातीला ५० हजारांची गुंतवणूक केली. कंपनी चालवण्याची जबाबदारी चुलत भावाला दिली. दिवसाकाठी १०० पाकिटं विकली जायला ९ महिन्यांपेक्षाही जास्त कालावधी लागला. त्यात बऱ्याच चुका झाल्या. मात्र चुकांमधून मुस्तफानं बोध घेतला.
कंपनीला पूर्णवेळ द्यायला हवा ही गोष्ट ३ वर्षांनंतर मुस्तफाच्या लक्षात आली. त्यांनी नोकरी सोडली आणि सर्व बचत व्यवसायात गुंतवली. आई-वडिलांच्या मनात धास्ती होती. व्यवसायात अपयश आल्यास दुसरी नोकरी मिळेल, असा विश्वास मुस्तफानं कुटुंबाला दिला. अनेक वर्षे कंपनी संघर्ष करत होती.
एक काळ असा होता की मुस्तफाला कर्मचाऱ्यांना पगारदेखील देता येत नव्हता. मात्र मनात आत्मविश्वास प्रचंड होता. सर्व २५ कर्मचाऱ्यांना एक दिवस कोट्यधीश करेन, असा शब्द त्यांनी दिला होता. आठ वर्षांच्या संघर्षांनंतर कंपनीला गुंतवणूकदार मिळाले. कंपनीचं नशीब पालटलं. एका रात्रीत आयडी २ हजार कोटींचीं कंपनी बनली. मुस्तफानं शब्द पूर्ण केला. सगळे कर्मचारी कोट्यधीश झाले.
२०१८ मध्ये हार्वर्ड विद्यापीठानं मुस्तफाला आमंत्रित केलं होतं. तिथल्या भाषणात मुस्तफानं दोन व्यक्तींचा विशेष उल्लेख केला. शिक्षक आणि वडील यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आपण इथपर्यंत पोहोचलो, याबद्दल मुस्तफानं दोघांचे आभार मानले. तुम्ही कुठून येतात, तुमची पार्श्वभूमी काय, या गोष्टीनं काहीही फरक पडत नाही. तुम्ही मेहनत केली, तर काहीच अशक्य नाही. कष्टांमुळेच एका मजुराचा मुलगा आज मिलियन डॉलर कंपनीचा मालक झाला आहे, असं मुस्तफानं हार्वर्ड विद्यापीठातल्या भाषणात म्हटलं.
एका मजुराच्या मुलाला शिक्षणासाठी मदतीचा हात देऊन त्याचं नशीब पालटणाऱ्या शिक्षकाबद्दल मुस्तफाच्या मनात कृतज्ञतेची भावना आहे. त्या शिक्षकाला भेटण्यासाठी मुस्तफा गावी गेला. पण त्या शिक्षकाचं निधन झाल्याचं समजलं. त्यांची भेट न झाल्याची चुटपूट लागून राहिली. मात्र मुस्तफा त्या शिक्षकांचा उल्लेख आपल्या प्रत्येक भाषणात, मुलाखतीत करतो.