100 वर्षे जुन्या वाड्याचा असा केला कायापालट, आता एका रात्रीसाठी मोजावे लागतात 1 लाख रुपये By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 02:57 PM 2021-07-27T14:57:25+5:30 2021-07-27T15:08:55+5:30
Halala Kanda mansion: श्रीलंकेतील वेलिगामा शहराजवळ एक 100 वर्षे जुना वाडा होता. चार मित्रांनी मिळून तो वाडा खरेदी केला आणि त्या वाड्याचे संपूर्ण रंगरुप बदलून टाकले. तुम्ही कधी 100 वर्षे जुन्या वाड्यात एका रात्रीच्या मुक्कामासाठी 1 लाख रुपये खर्च करण्याचा विचार केलाय ? नाही ना. पण, असं प्रत्यक्षात घडत आहे. श्रीलंकेतील वेलिगामा शहरातील 'हलाला कांडा' नावाचा जुना वाडा आता एक आलिशान बंगला बनला आहे. त्या बंगल्यात राहण्यासाठी लोक एक लाख रुपये द्यायला तयार होत आहेत.
श्रीलंकेतील वेलिगामा शहराजवळ एक 100 वर्षे जुना वाडा होता. चार मित्रांनी मिळून तो वाडा खरेदी केला आणि त्या वाड्याचे संपूर्ण रंगरुप बदलून टाकले. आता या वाड्यात एक रात्र राहण्यासाठी 1 लाख रुपये दर आकारला जातो.
पडीक झालेल्या हलाला कांडा वाड्यावर सर्वात आधी 2010 मध्ये इंटीरियर डिजायनर डीन शार्पची नजर पडली. त्यांनी तीन मित्रांसोबत मिळून हा वाडा खरेदी केला आणि त्याला पूर्णपणे रिनोव्हेट केले. रिनोव्हेशनपूर्वी या वाड्याची अवस्था खूप खराब होती, पण आता हा वाडा एखाद्या चित्रपटातील बंगल्याप्रमाणे दिसत आहे.
श्रीलंकन न्यूज वेबसाइट डेली न्यूजच्या रिपोर्टनुसार, हलाला कांडा नावाच्या या वाड्यचा इतिहास खूप रंजक आहे. 1912 मध्ये एका श्रीमंत शेतकऱ्याच्या मुलाने आपल्या पत्नीसाठी हा वाडा बांधला होता. स्थानिक लोक या वाड्याला जुगनू हिल नावाने ओळखतात.
डीन शार्प सांगतात की, आधी या वाड्याची अवस्था खूप खराब होती. इतके वर्ष कुठलीही डागडुजी न केल्यामुळे वाड्याच्या अनेक ठिकाणी झाडं उगवली होती, भींती जीर्ण झाल्या होत्या. अशी अवस्था असतानाही डीन यांनी हा वाडा खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
2011 मध्ये डीन शार्पने जेनी लुईस, रिचर्ड ब्लेसडेल आणि बेंटले डी बेयर या आपल्या तीन मित्रांसोबत मिळून 4.3 लाख डॉलर म्हणजेच 3 कोटी रुपयांमध्ये हा वाडा आणि त्याच्या आसपासची दोन एकर जमीन खरेदी केली.
डीन शार्प आणि त्यांच्या मित्राने जेव्हा हा वाडा खरेदी केला, तेव्हा अनेकांनी त्यांना मुर्खात काढले. त्यांचा हा निर्णय चुकीचा असून, यामुळे मोठं नुकसान होईल, असंही म्हटले.
वाडा खरेदी केल्यानंतर त्याच्या रिनोव्हेशनसाठी आर्किटेक्ट रॉस लोगीने मदत केली. डिसेंबर 2012 मध्ये या वाड्याच्या रिनोव्हेशनचे काम सुरू झाले होते. शार्प यांना या वाड्याच्या मुळ रचनेत कुठलाही बदल करायचा नव्हता. त्यामुळे त्यांनी पूर्ण वेळ देऊन 4 वर्षे या वाड्याच्या रेनोव्हेशनवर काम केले.
हलाला कांडा वाड्यात पाच बेडरूम, एक किचन आणि एक ओपन कोर्टयार्ड आहे. याशिवाय, काही अॅंटीक वस्तुदेखील ठेवण्यात आल्या आहेत. सध्या या वाड्यात एक मॅनेजर, शेफ, दोन कर्मचारी, दोन माळी आणि एक सुरक्षा गार्ड काम करतात.
चांगल्या अवस्थेत असताना या वाड्यात इथियोपियाचा राजा हॅली सेलासी आणि महान ऑस्ट्रेलियन क्रिकेटर कीथ मिलरसारखे लोक राहून गेलेत.