कोरोनापाठोपाठ चीनवर कोसळलं नवं संकट; लाखो लोकांचा जीव धोक्यात तर अनेक जण बेपत्ता!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 05:57 PM2020-06-13T17:57:23+5:302020-06-13T18:00:18+5:30

कोरोना विषाणूनंतर चीनमध्ये एक नवीन आपत्ती आली आहे. चीनमधील बर्‍याच राज्यात भयानक पाऊस झाला आहे. यामुळे तेथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. चीनी मीडियाच्या वृत्तानुसार, चांगकिंगमध्ये पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. काही ठिकाणी दरडी कोसळली आहे. भूस्खलन झालं आहे. त्यामुळे पर्वतीय रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

दक्षिण आणि दक्षिण पश्चिम चीनमध्ये पाऊस, वादळ, पूर आणि भूस्खलनामुळे कोट्यवधी लोकांना स्थलांतरित करावं लागलं आहे. हजारो घरे बुडाली आहेत. एक मोठा परिसर पाण्यात बुडाला आहे.

चीन सरकारने म्हटले आहे की, दक्षिण आणि मध्य चीनमधील पुरामुळे १२ हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. लाखो लोकांना घरं सोडून जावं लागलं आहे.

चीनच्या आपत्कालीन सेवांनी सांगितले की, या पुरामुळे आम्ही २.५० लाख लोकांना स्थलांतरित केले आहे. हे सर्व लोक ज्याठिकाणी पाणी साचलं आहे तिथे राहत होते, आता या सर्व लोकांना सुरक्षित छावण्यांमध्ये आणलं आहे.

चांगचिंग, गुआंग्झी, झुआंग, यांगशुओ, हुनान, गुईझोऊ, क्वांगटोंग, फुचिन आणि चिचियांगमध्ये १३०० हून अधिक घरे पूर आणि मातीखाली अडकली आहेत. प्राथमिक अंदाजानुसार ५५० मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे ४ हजार १६१ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

दक्षिणेकडील गुआंग्झीमध्ये पूर येणे विशेषतः धोकादायक होते. येथे ६ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. बरेच लोक बेपत्ता आहेत. हुनन प्रांताच्या उत्तरेकडे सात जण ठार झाले आहेत आणि बरेच लोक येथे बेपत्ता आहेत.

गेल्या एका आठवड्यापासून दक्षिण चीनमधील काही राज्यात जोरदार पाऊस पडत आहे. चीनच्या ८ राज्यांमधील ११० नद्यांमधील पाण्याची पातळी वाढल्याने बऱ्याच भागात पूर आला आहे.

चीनमधील पूर सहसा सखल भागात मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. या प्रदेशातील यांग्त्झी आणि पर्ल नद्यांचा सर्वाधिक त्रास होतो. याँगत्सी नदीच्या वर असलेल्या थ्री जॉर्ज धरणाचे पाणी थांबविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

१९९८ साली चीनमध्ये अलीकडच्या वर्षातील भीषण पूर आला होता. या पूरात २ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. सुमारे ३० लाख घरे उद्ध्वस्त झाली होती.

यावेळीही १ हजाराहून अधिक हॉटेल पाण्यात बुडाली आहेत. देशातील ३० हून अधिक पर्यटन स्थळे नष्ट झाली आहेत. २०१९ मध्येही चीनमध्ये आलेल्या पुरामुळे शेकडो लोकांचे प्राण गेले होते. अनेक लोक बेपत्ता झाले होते.