चीनमध्ये सिंगल रहण्यालाच तरुणींची पसंती; कारण वाचून हैराण व्हाल! By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 11:12 AM 2021-10-14T11:12:11+5:30 2021-10-14T11:19:56+5:30
चीनमध्ये शहरी भागांत राहणाऱ्या 50% तरुणींना लग्न कराण्याची इच्छा नाही. सर्वेक्षणात, 44% तरुणींनी लग्न करण्यास नकार दिला, तर 25% तरुणही लग्न टाळताना दिसत आहे. चीनमध्ये (China) लग्नासंदर्भातील अजब रिती-रिवाजांबद्दल आपण वाचले अथवा ऐकले असेलच. पण, आता चीनमध्ये लग्नासंदर्भात आणखी एक हैराण करणारी माहिती समोर आली आहे. चीनच्या कम्युनिस्ट यूथ लीगने 'चायनीज यूथ अर्बन पॉप्युलेशन' नावाने एक अध्ययन केले आहे. यानुसार, आता चीनमध्ये महिला लग्नापासून मागे हटत असल्याचे समोर आले आहे. महत्वाचे म्हणजे यात शहरी महिलांचे प्रमाण अधिक आहे.
सिंगल रहण्याला महिलांची पसंती - चीनमध्ये शहरी भागांत राहणाऱ्या 50% तरुणींना लग्न कराण्याची इच्छा नाही. या अभ्यासात 18 ते 26 वयोगटातील तरुणींचे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणात, 44% तरुणींनी लग्न करण्यास नकार दिला, तर 25% तरुणही लग्न टाळताना दिसत आहे.
कारण काय? - पण, या लोकांची लग्न करण्याची इच्छा का नाही? याची अनेक कारणे समोर आली आहेत. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 34.5% तरुण आणि तरुणींनी सांगितले, की त्यांच्याकडे वैवाहिक जीवन जगण्यासाठी ना पुरेसा वेळ आहे, ना शक्ती. तर 60.8% लोकांची चांगला जोडिदार मिळेना म्हणून लग्न करण्याची इच्छा नाही.
विश्वासाची कमतरता - चीनमधील तरुणी लग्न न करण्याची इतर अनेक कारणे सागतात. त्यांच्या मते, आर्थिक अडचण, लग्नानंतरचे संसाराचे ओझे, वैवाहिक संबंधातील अविश्वास आणि आजवर कुणावरही प्रेम न जडल्यासारख्या कारणांमुळे लग्न करण्याची त्यांची इच्छा नाही.
सरकारसाठी चिंतेचा विषय - सर्वेक्षणाचा निकाल चीन सरकारसाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. एकीकडे, चीनमध्ये कूलिंग ऑफ लॉच्या माध्यमाने घटस्फोटांच्या घटना कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर दुसरीकडे तरुणांचा विवाह संस्थेवरील विश्वासच उडत चालला आहे.
संस्कारांचा आभाव - खरे तर, चीन विकासाच्या आंधळ्या शर्यतीत गुंतला आहे. येथील बहुतेक लोक नात्यांपेक्षाही आपल्या फायद्या-तोट्याला अधिक महत्व देत आहेत. यामुळे येथील 'स्व-केंद्री' संस्कृती लोकांना कुठेतरी एकाकी पाडत आहे, असे म्हणता येऊ शकते. धावपळीच्या जीवनशैलीमुळे पालकांना झोपायला आणि एकमेकांसोबत वेळ घालवायलाही वेळ नाही. यामुळे येथील बहुतांश लोकांना मुलेही ओझं वाटू लागली आहेत.