सावधान! रिपोर्टचा दावा; कोरोनापासून वाचण्यासाठी फक्त ६ फुटाचं अंतर पुरेसे नाही, तर...

By प्रविण मरगळे | Published: December 14, 2020 04:18 PM2020-12-14T16:18:49+5:302020-12-14T16:21:26+5:30

चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगावर संकट उभं राहिलं, कोट्यवधी लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले, अनेक जणांचे जीव गेले, मात्र अद्यापही कोरोनावर कोणत्याही प्रकारची लस उपलब्ध झाली नाही.

कोरोनामुळे अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. कोरोना संसर्गजन्य रोग असल्याने या आजाराची साखळी तोडण्याचे प्रयत्न करण्यात आले, यात मास्कचा वापर करणे, सॅनिटायझेशन आणि ६ फूट अंतर पाळण्याचं आवाहन वारंवार करण्यात येत होते.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टेंसिंग पालन गरजेचे होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल डिस्टेंसिंग राखण्याचं आवाहन केले होते. कोरोनाशी लढण्यासाठी सोशल डिस्टेंसिंग मोठं हत्यार मानलं जात होतं. पण आता हळूहळू अनलॉक प्रक्रिया सुरु झाली आहे. सर्व व्यवहार पुन्हा सुरळीत होत आहेत.

अशातच ६ फूटाचं अंतर प्रत्येक ठिकाणी पाळता येतं का? बंद खोली, कार आणि कोणत्याही अपुऱ्या जागेजवळ हा फॉर्म्युला फायदेशीर ठरू शकतो का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

दक्षिण कोरियाच्या एका ताज्या अभ्यासानुसार, बंद खोलीत हवेच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका अद्यापही कायम आहे. रिपोर्टमध्ये मंदिर, शाळा, रेस्टॉरंट आणि बाजारपेठ ही ठिकाणी कोरोना संक्रमणाच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी हवेशीर असणं गरजेचे आहे. बंद हवेमुळे कोरोना संक्रमणाचा धोका अधिक असतो.

जर्नल ऑफ कोरियन मेडिकल सायन्समधील रिपोर्टनुसार लक्षण नसलेल्या कोरोना संक्रमित व्यक्तीपासून कोरोनाचं संक्रमण ५ मिनिटाच्या आत इतरांपर्यंत पोहचू शकतं, जेथे जागतिक आरोग्य संघटनेने ६ फूट अंतर कोरोना संक्रमण टाळण्यास फायदेशीर ठरत असल्याचं सांगण्यात आलं तिथे या रिपोर्टमध्ये याच्या उलट दावा करण्यात आला आहे.

या रिपोर्टनुसार बंद खोलीत २० फूटाच्या अंतरावर असलेल्या कोरोना संक्रमित व्यक्तीकडून दुसरा व्यक्ती कोरोना संक्रमित होऊ शकतो असं सांगण्यात आलं आहे. या पूर्वी अमेरिकन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल एंड प्रिर्वेशन द्वारे ऑक्टोबरमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार ६ फूटापेक्षा अधिक अंतर असणारे व्यक्तीही कोरोनाच्या विळख्यात अडकल्याची शक्यता असते असं सांगितले आहे.

संशोधकांचे म्हणणं आहे की, आताही मास्क घालणे आणि वारंवार हात धुणे हे कोरोनापासून बचाव करण्यासाठी फायदेशीर आहे. मात्र मास्क घातल्याने कोरोनापासून वाचू शकतो

दरम्यान, भारतात गेल्या २४ तासांत आढळलेल्या नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. या कालावधीत ३०,२५४ नवे रुग्ण आढळले असून, बरे झालेल्यांची संख्या ३३,१३६ आहे. जगामध्ये या आजाराच्या संसर्गातून बरे झालेल्यांचे प्रमाण भारतात सर्वाधिक म्हणजे ९४.९३ टक्के असून मृत्यूदर अवघा १.४५ टक्के आहे.

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात सक्रिय रुग्णांची संख्या सलग सातव्या दिवशी चार लाखांहून कमी होती. सध्या ३,५६,५४६ सक्रिय रुग्ण असून त्यांचे प्रमाण ३.६२ टक्के आहे.

Read in English