Afghanistan Crises: अफगाणिस्तानात तालिबान विरोधात ब्रिटन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, दिले महत्वाचे संकेत By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 08:31 PM 2021-08-17T20:31:17+5:30 2021-08-17T20:39:54+5:30
Afghanistan Crises: अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर संपूर्ण जगभरात याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. तालिबान विरोधात आता ब्रिटननंही मोठं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटननं अफगाणिस्तानात तालिबान्यांच्या सत्तेला रोखठोक विरोध केला असून तालिबान्यांना रोखण्यासाठी सर्व संसाधनांचा उपयोग करणार आहे, असं विधान ब्रिटनचं परराष्ट्र मंत्री डॉमनिक राब यांनी केलं आहे.
रॉयटर्सच्या माहितीनुसार, ब्रिटन आपल्या सहकारी देशांसोबत मिळून तालिबान्यांना प्रतिबंध घालण्याचं काम करेल. यात अफगाणिस्तानला दिल्या जाणाऱ्या विकास सहायता निधी पूर्णपणे रोखण्याचा निर्णय घेतला जाणार आहे आणि हा सर्वोत्तम उपाय आहे, असं डॉमनिक राब म्हणाले.
तालिबानच्या वागुणुकीवर सर्व अवलंबून असून राष्ट्रविरोधी कारवाई होत असल्याचं दिसून आलं तर वित्त पुरवठा रोखण्याचा पर्याय आमच्यासमोर आहे, असंही ते पुढे म्हणाले.
ब्रिटिश वेबसाइट स्कायन्यूजच्या माहितीनुसार, तालिबान अफगाणिस्तानात ज्यापद्धतीनं कब्जा करत आहे ते पाहता याची कल्पना कुणीच केली नव्हती. अशापद्धतीनं तालिबान आक्रमकरित्या भूमिका घेणार असल्याचं आम्हाला आधी कळालं असतं तर निश्चितच आम्ही कारवाई केली असती, असं डॉमनिक राब म्हणाले.
अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा केला असला तरी तालिबान्यांसोबत कोणतेही औपचारिक संबंध ब्रिटन प्रस्थापित करणार नाही. कारण तालिबान संघटना मानवाधिकार मानकांमध्ये बसत नाही, असंही डॉमनिक म्हणाले.
तालिबानी नेत्यांनी व्यावहारिक भूमिका घेणं गरजेचं आहे, असंही डॉमनिक म्हणाले. तसंच तालिबानसोबत ब्रिटन थेट कोणतेच व्यवहार करणार नाही आणि गरज पडलीच तर थर्ड पार्टी माध्यमातून संबंध ठेवले जातील, असं ब्रिटननं स्पष्ट केलं आहे.
अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर पश्चिमेकडील देशांमध्ये दहशतवाद निर्माण करण्यासाठी होता कामा नये. तालिबानी शासनाला मोडून काढण्यासाठी त्यांच्याविरोधात आर्थिक प्रतिबंध घालण्याचा उपाय करावा लागेल, असं ब्रिटननं म्हटलं आहे.
तालिबानवर विश्वास ठेवता येणार नाही. पण जगभरातील नेत्यांनी आशावादी राहावं आणि तालिबान सत्तेवर आल्यानंतर पश्चिमेकडील देशांशी ते कसा व्यवहार ठेवतात हे पाहावं लागेल, असं डॉमनिक म्हणाले.
गेल्या २० वर्षात अफगाणिस्तानमधील कोणत्याही दहशतवादी संघटनेनं पश्चिमेकडील देशांवर हल्ला केलेला नाही. याच काळात ८० लाख दारुगोळा सुरुंगांनाही हटविण्याचं काम करण्यात आलं. महिला आणि लहान मुलांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला होता. याशिवाय गर्भवती महिलांच्या मृत्यूचं प्रमाण जवळपास अर्ध्यावर आलं आहे. याचाही विचार केला जावा, असं डॉमनिक म्हणाले.