Afghanistan Crisis: तालिबानच्या चौकडीतला 'शेरू' भारताचा मित्र?; भारतीयांना दिली होती मोठी ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 03:12 PM2021-08-20T15:12:36+5:302021-08-20T15:15:54+5:30

Afghanistan Crisis: भारतात शिक्षण झालेल्या शेर मोहम्मद अब्बास यांनी भारत सरकारला दिली होती ऑफर

तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा करताच संपूर्ण देशात दहशतीचं वातावरण आहे. लाखो लोक देश सोडण्याच्या प्रयत्नात आहेत. तालिबानींकडून देशातील जनतेला सुरक्षेचं आश्वासन देण्यात आलं आहे. मात्र जनतेचा त्यांच्या शब्दावर विश्वास नाही.

अफगाणी नागरिक मिळेल त्या मार्गानं देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. पत्रकार परिषद घेऊन लोकांना आश्वस्त करणाऱ्या तालिबान्यांचा दावा भररस्त्यात उघडा पडताना दिसत आहे. दहशतवादी अनेक ठिकाणी बेछूट गोळीबार करत आहेत.

तालिबानमधील परिस्थिती वेगानं बिघडत असल्यानं भारतानं काही दिवसांपूर्वीच दूतावासातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बोलावून घेतलं. या कर्मचाऱ्यांना तालिबाननं विमानतळापर्यंत सुरक्षा दिली. मात्र त्याचवेळी भारताला एक मोठी ऑफर होती अशी माहिती समोर आली आहे.

तुमचे राजदूत काबुलमध्येच ठेवा, त्यांना माघारी बोलवू नका, असा प्रस्ताव तालिबानी नेत्यांनी भारत सरकारला दिला होता. तालिबानचे वरिष्ठ नेता शेर मोहम्मद अब्बासनं हा प्रस्ताव दिला होता.

शेर मोहम्मद कतारची राजधानी दोह्यातील तालिबानी नेत्यांच्या पथकात होता. विशेष म्हणजे शेर मोहम्मदचं शिक्षण इंडियन मिलिट्री अकादमीत झालं आहे. अब्बासचे भारतीय मित्र त्याला शेरू नावानं हाक मारतात.

अब्बासनं दिलेल्या अनौपचारिक प्रस्तावानं भारतीय राजदूतांना धक्का बसला होता. मात्र भारतानं हा प्रस्ताव स्वीकारला नव्हता. सोमवारी आणि मंगळवारी भारतानं काबुलमधील दुतावासात अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका केली.

दोह्यात असलेल्या तालिबानी नेत्यांमध्ये अब्बासचा तिसरा क्रमांक लागतो. याआधी अब्बास भारतावर टीका करायचा. मात्र आता त्यानं पवित्रा बदलला. त्यामुळेच त्याच्या प्रस्तावानं भारताच्या पथकाला धक्का बसला.

तालिबानची राजवट आल्यानं काबुलमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल भारताला असलेली चिंता समजू शकतो. पण दूतावासातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काळजी करू नये, अशा शब्दांत अब्बासनं भारत सरकारला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता.

अब्बासच्या प्रस्तावावर भारतीय पथकानं विचार केला. मात्र त्यास फारसं महत्त्व दिलं नाही. तालिबानसोबतच लष्कर-ए-तोयबा आणि हक्कानी नेटवर्कचे दहशतवादी काबुलला पोहोचले असल्याची गोपनीय माहिती भारतीय पथकाला मिळाली होती. त्यामुळेच भारतीय कर्मचाऱ्यांनी विमानतळ गाठून परतीचा मार्ग धरला.