Afghanistan Crisis: विरोधकांना ओळखण्यासाठी तालिबानाची अनोखी पद्धत; सिमकार्डही चावून खायला सांगताहेत! By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 02:07 PM 2021-08-16T14:07:46+5:30 2021-08-16T14:17:04+5:30
Afghanistan Crisis: दक्षिण अफगाणिस्तानातील कंदहार प्रांताच्या कंदहार या राजधानीच्या शहरापासून देशाची राजधानी काबुलपर्यंत जाणाऱ्या मुख्य मार्गावरचा बहुतांश भाग तालिबान्यांच्या ताब्यात आहे. तालिबान आणि अफगाणिस्तानमध्ये मोठा संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिकेच्या सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानच्या एकेक भागावर ताबा मिळवायला सुरुवात केली आणि अखेर काबुलमध्ये प्रवेश केला. आता संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता असणार आहे.
दक्षिण अफगाणिस्तानातील कंदहार प्रांताच्या कंदहार या राजधानीच्या शहरापासून देशाची राजधानी काबुलपर्यंत जाणाऱ्या मुख्य मार्गावरचा बहुतांश भाग तालिबान्यांच्या ताब्यात आहे. या मार्गावरची तीन किंवा चार मोठी शहरंचं अफगाणिस्तान सरकारच्या नियंत्रणात आहेत.
कंदहार शहरातून बाहेर पडताच तालिबान्यांचे पांढरे झेंडे दिसू लागतात. ठिकठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला तालिबानी उभे असलेले दिसून येत आहे.
तालिबान्यांचे गुप्तहेर कंदहार आणि काबुलमध्ये तर आहेतच. शिवाय, मार्गातील सर्वच बसस्टॉप आणि महत्त्वाच्या ठिकाणीही आहेत आणि हे गुप्तहेर या मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येकावर बारिक लक्ष ठेवत असल्याची माहिती जागतिक माध्यमांनी दिली आहे. जिथे कुठे त्यांना एखाद्यावर जराही संशय आला त्याचा पाठलाग करतात आणि ज्या गाडीतून ती व्यक्ती जात असेल त्या गाडीचा नंबर आणि संबंधित व्यक्तींचं वर्णन मोबाईलवरून पुढे रस्त्यात उभ्या असलेल्या आपल्या सहकाऱ्यांना कळवतात.
बीबीसी मराठीच्या वृत्तानूसार, काबुल ते कंदहारच्या या मार्गावरून प्रवास करताना बहुतांश लोक जसे स्मार्टफोन सोबत ठेवत नाहीत. तसेच अफगाणिस्तानच्या सरकारी दूरसंचार कंपनीचं सिमकार्डही सोबत ठेवत नाहीत. कारण एखाद्याजवळ अफगाण दूरसंचार कंपनीचं सिमकार्ड आढळल्यास तालिबानी बळजबरीने ते सिमकार्ड चावून खायला सांगतात. अफगाणिस्तानातील सरकारी दूरसंचार कंपनी असलेली 'सलाम' ही कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून तालिबान्यांच्या हिटलिस्टवर आहे.
दरम्यान, तालिबानने काबुलमध्ये प्रवेश करताच अमेरिकेने दूतावासातील कर्मचाऱ्यांना एअरलिफ्ट केले. त्यापूर्वी सर्व संवेदनशील माहिती डिलीट करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या.
अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानातून माघारी सुरू केल्यानंतर तालिबानने हळूहळू भूभाग ताब्यात घेण्यास सुरुवात केली. ११ सप्टेंबरपर्यंत संपूर्ण सैन्य माघारी होईल, असे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी यापूर्वीच सांगितले आहे.
तालिबानी प्रवक्त्यांनी सांगितले की, आम्हाला कोणाचाही बदला घ्यायचा नाही. सरकार आणि लष्करात सेवा देणाऱ्यांना माफ करण्यात येईल.
नागरिकांनी घाबरू नये. कोणीही भीतीने देश सोडून जाऊ नये, असे आवाहनही केले. मात्र, नागरिकांनी भीतीपोटी काबुल सोडण्यास सुरुवात केली असून शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे.