Afghanistan Taliban Crisis: ३१ ऑगस्टपर्यंत वाट का बघतंय तालिबान?; अफगाणी अधिकाऱ्यानं केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 04:27 PM2021-08-21T16:27:30+5:302021-08-21T16:34:30+5:30

Afghanistan Taliban: १५ ऑगस्टला अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा मिळवला. काबुलमध्ये तालिबानींनी संसद आणि राष्ट्रपती भवन ताब्यात घेतले.

अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा मिळवल्यानंतर सर्व देश चिंतेत आहेत. चीन, पाकिस्तान यांनी तालिबानी सरकारला मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारत, अमेरिकासारखे देश सध्या वेट अँन्ड वॉचच्या भूमिकेत आहेत.

अफगाणिस्तानात तालिबान सरकार स्थापन करण्याची हालचाल वाढली आहे. परंतु ३१ ऑगस्टपूर्वी कुठलीही अधिकृत घोषणा किंवा निर्णय घेण्यात येणार नाही असं एका अफगाणी अधिकाऱ्याने तालिबानींशी चर्चा केल्यानंतर सांगितले.

ही तीच तारीख आहे ज्यादिवशी अमेरिका त्यांचे सर्व सैन्य परत बोलवण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, तालिबानचे मुख्य प्रवक्ते अनस हक्कानी यांनी अमेरिकनसोबत चर्चा झाल्याप्रमाणे अंतिम प्रक्रिया संपेपर्यंत काहीच करायचं नाही.

हक्कानी यांच्या विधानानं अखेर ३१ ऑगस्टनंतर तालिबानी काय योजना बनवत आहेत याबाबत चिंता निर्माण झाली आहे. आगामी सरकारमध्ये गैर तालिबानी अधिकाऱ्यांचा समावेश असेल हे आश्वासन ते पूर्ण करतील का? महिलांचा समावेश करतील का? हे अस्पष्ट आहे.

अफगाणिस्तानची राष्ट्रीय सुरक्षा दलाला बदलण्याची तालिबानची कुठलीही योजना आहे की नाही हे स्पष्ट केले नाही. अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा मिळवल्यानंतरही अनेक भागात तालिबानींविरोधात रणनीती आखली जात आहे. त्याठिकाणी तालिबानी हिंसेचा प्रयोग करताना दिसत आहेत.

याच दरम्यान, रिपब्लिकन पार्टीच्या २४ पेक्षा जास्त सीनेटरांनी अफगाणिस्तानात अमेरिकन सेनेचे अब्ज डॉलर्ससह अन्य संवेदनशील हत्यारं, साहित्य तालिबानच्या हाती लागल्याचा आरोपावर ज्यो बायडन प्रशासनाकडून स्पष्टीकरण मागवलं आहे.

तालिबान या उपकरणाचा वापर करण्यासाठी रशिया, पाकिस्तान, इराण आणि चीनसारख्या देशांची मदत घेऊ शकतं अशी भीती सीनेटरांना आहे. अमेरिकन सैन्य अब्ज डॉलर्स उपकरणं अफगाणिस्तानात सोडून परत येत आहेत. यातील अनेक तालिबानींच्या कब्जात गेल्याचं बोललं जात आहे.

तालिबानकडून अफगाणिस्तानमध्ये आगामी सरकार स्थापन करण्याचा निर्णय किंवा घोषणा ३१ ऑगस्टपर्यंत केली जाणार नसल्याचे म्हटले आहे. याबाबत टाईम्स वृत्तसंस्थेनं वृत्त दिले आहे.अमेरिकी सैन्यमाघारीची मुदत संपल्यानंतर तालिबानच्या सरकारची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे समजते.

अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घानी यांनी देश सोडून पळ काढल्यानंतर आता त्यांचे भाऊ हशमत घानी अहमदजई यांनी तालिबानचा हात पकडला आहे. हशमत घानी हे तालिबानमध्ये दाखल झाल्याचे वृत्त आले आहे. हशमत घानी अहमजदई यांनी तालिबानला पाठिंबा देण्याचा निर्णय हा अल्हाज खलील-उर-रहमान हक्कानी याच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर घेतला आहे.

ऑगस्ट महिन्यातील पहिल्या १५ दिवसांत तालिबानने जोरदार मुसंडी मारत थेट राजधानी काबूल पर्यंत धडक दिली. तसेच राष्ट्रपती अश्रफ घानी देशाबाहेर पळून गेल्यानंतर सर्व सत्तासुत्रे ताब्यात घेत राजधानीतील सर्व सरकारी इमारतींवर कब्जा केला आहे.

Read in English