भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 03:24 PM 2020-07-16T15:24:14+5:30 2020-07-16T15:36:53+5:30
चीनसोबत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तैवानचे लष्कर, नौदल आणि हवाई दलाने युद्धसराव केला भारताप्रमाणेच अन्य शेजारी देशांसोबतही चीनने गेल्या काही काळात वाद उकरून काढले आहेत. त्यामुळे चीनविरोधात अनेक देश आक्रमक झालेले आहेत. दरम्यान, आता चीनशी उभा दावा असलेल्या तैवाननेदेखील चीन विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
चीनसोबत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तैवानचे लष्कर, नौदल आणि हवाई दलाने युद्धसराव केला. तैवानच्या राष्ट्रपती इंग वेन यांनी याबाब सांगितले की, आम्ही कमकुवत नाही आहोत. आम्ही आमची भूमी चीनच्या घुसखोरीपासून वाचवण्यास सक्षम आहोत. जर चीनने कुठली आगळीक केली तर त्याला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ, हे आम्ही चीनला सांगू इच्छितो.
तैवानने केलेल्या युद्ध सरावामध्ये आठ हजार सैनिकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये हवाई दलाची एफ-१६ विमाने आणि स्वदेशी फायटर जेट चिंग-कुओ यांनी शक्तिप्रदर्शन केले.
मध्य तैवानच्या किनारपट्टी भागातील ताऊचुंग येथे झालेल्या लष्करी सरावामध्ये रणगाडेही सहभागी झाले होते. या युद्धसरावाला हान कुआंग, असे नाव देण्यात आले होते. कोरोनाच्या संसर्ग काळात चीनने तैवानच्या भूभागावर अनेकदा फायटर जेट उडवले होते. त्यामुळे त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हा युद्ध सराव करण्यात आला.
तर तैवानच्या नौदलानेसुद्धा दक्षिण चीन समुद्राच्या किनाऱ्यावर क्षेपणास्रे आणि मशीन गनच्या सहाय्याने अभ्यास केला. यादरम्यान, नौदलाच्या अनेक लढाऊ युद्धनौका समुद्रात उतरल्या होत्या.
तैवानमधील काही बेटे ही आपल्या हद्दीत येतात, असा चीनचा दावा आहे. मात्र हा भूभाग आपला असल्याचे तैवानकडून सांगण्यात येते. हान-कुआंग हा तैवानचा वार्षिक युद्धसराव असून, यामध्ये तैवानच्या तिन्ही सेना आपले शक्तिप्रदर्शन करत असतात.
साई इन वेंग या या वर्षी जानेवारीमध्ये चीनच्या राष्ट्रपतीपदावर निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी चीनसमोर कधीही झुकणार नसल्याची घोषणा केली होती. तसेच गेल्या दहा वर्षातील सर्वात मोठा संरक्षण अर्थसंकल्प सादर केला होता.
तैवानकडे उपलब्ध असलेल्या शस्त्रास्त्रांपैकी बहुतांश शस्त्रास्त्रे ही अमेरिकन बनावटीची आहेत. तसेच तैवानच्या सैनिकांना प्रशिक्षणही अमेरिकी सैन्य देत असते. चीनकडे तैवानच्या तुलनेत अधिक शस्त्रास्त्रे आणि सैनिक आहेत. मात्र तैवानने चीनसमोर कधीही माघार घेतलेली नाही.
यावर्षी २९ मार्च रोजी चीनने तैवानच्या हवाई हद्दीत आपली लढाऊ विमाने पाठवली होती. त्यानंतर तैवानी हवाई दलाच्या विमानांनी त्यांनी पिटाळून लावले होते.
त्यानंतर चीनने पुन्हा एकदा आपली लढाऊ विमाने पाठवली होती. त्यानंतर चिनी विमानांना पिटाळण्यासाठी तैवानकडून लढाऊ विमाने पाठवण्यात आली होती.
यानंतर तैवानने आपल्या शहरी भागात रणगाड्यांसह युद्धसराव केला होता. दरम्यान, कोरोनाच्या संकटाचा गैरफायदा घेत चीन हल्ला करेल अशी जपान आणि तैवानला भीती आहे, असा जगातील वहुतांश संरक्षण तज्ज्ञांना भीती आहे.