Ayman Al-Zawahiri Killed: लादेनला दडविणाऱ्या पाकिस्ताननेच जवाहिरीचा ठिकाणा उघड केला? बाजवांनी फायदा पाहिला By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 12:23 PM 2022-08-02T12:23:24+5:30 2022-08-02T12:44:41+5:30
Story Behind al-Zawahiri's Death: ड्रोन अमेरिकेचा होता, तर पाकिस्तानी आयएसआयचा चिफ अमेरिकेत काय करत होता? ज्या अमेरिकी किलर ड्रोनला रस्ता देण्यासाठी इम्रान खान विरोध करायचे त्याला अचानक परवानगी कशी काय मिळाली? अमेरिकेने आज अफगानिस्तानात घुसून राजधानी काबुलवर जोरदार ड्रोन हल्ले केले. यामध्ये अल कायदाचा लादेननंतरचा म्होरक्या अल जवाहिरीचा खात्मा झाला. एवढेच नाही तर तालिबानचा गृहमंत्री शिराजुद्दीने हक्कानीच्या मुलाचा आणि एका नातेवाईकाचा देखील यात मृत्यू झाल्याची माध्यमांमध्ये चर्चा सुरु आहे. अफगान मीडियानुसार हक्कानीनेच जवाहिरीला आपल्या सुरक्षित ठिकाणावर लपविले होते.
मात्र, जवाहिरीच्या या मृत्यूमागे पाकिस्तानचा हात असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख कमर जावेद बाजवा यांनी यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. याच पाकिस्तानने ओसामा बिन लादेनला आपल्या सैन्याच्या तळाजवळच लपविले होते. अमेरिकेच्या सैन्याने मध्यरात्री तिथे हेलिकॉप्टरद्वारे कमांडो उतरवून लादेनचा खात्मा केला होता. लादेनच्या डोक्यात गोळ्या झाडल्याचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले होते.
अमेरिकेने ज्या ड्रोनने जवाहिरीवर हल्ला केला, त्या ड्रोनने कतारसारख्या कोणत्यातरी आखाती देशातून उड्डाण केले होते. हे ड्रोन पाकिस्तान मार्गे काबुलपर्यंत पोहोचले आणि मिशन सक्सेसफुल केले. तज्ज्ञांनुसार बाजवांच्या परवानगीशिवाय अशाप्रकारे ड्रोन पाकिस्तानी हवाई हद्दीतून जाऊ शकत नाही. ज्या अमेरिकी किलर ड्रोनला रस्ता देण्यासाठी इम्रान खान विरोध करायचे त्याला शाहबाज सरकारने मंजुरी दिली. यामागे कारण काय?
पाकिस्तानी पत्रकार कामरान युसुफ यांनी केलेल्या खुलाशानुसार जवाहिरीवर हल्ल्याच्या दोन दिवस आधी अमेरिकेच्या सैन्याच्या एक बड्या अधिकाऱ्याने पाकिस्तानी सैन्य प्रमुख बाजवा यांना फोन केला होता. यावरून असे वाटतेय की पाकिस्तान या मिशनचा मुख्य भाग होता. याचे कारण म्हणजे कंगाल झालेल्या पाकिस्तानला आयएमएफकडून कर्ज हवेय. हे कर्ज अमेरिकेच्या संमतीशिवाय पाकिस्तानला मिळणे अशक्य आहे. यामुळेच बाजवा यांनी अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा केली.
जपानी मीडियाने काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानने अमेरिकेकडे कर्जासाठी हात पसरविल्याचे म्हटले होते. याचबरोबर पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयचा प्रमुख काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेल्याचे म्हटले होते. यामुळे बाजवा यांनी जवाहिरीच्या ठिकाण्याची माहिती अमेरिकेला पुरविली, पाकिस्तानी आयएसआयने यासाठी मदत केल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दक्षिण आशियाई घडामोडींचे तज्ज्ञ मायकल कुगेलमन यांनीही या कारवाईत पाकिस्तानने अमेरिकेला मदत केली असण्याची शक्यता वर्तवली आहे. काही दिवसांपूर्वी आयएसआयचे प्रमुख अमेरिकेला गेले होते. अमेरिकेने ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात ठार केले तेव्हा इस्लामाबाद आणि वॉशिंग्टनमधील संबंध बिघडले होते, असेही कुगेलमन म्हणाले. जवाहिरीचा खात्मा करून इस्लामाबादला येत्या काही वर्षांत मोठा फायदा होऊ शकतो, असेही ते म्हणाले.
सिराजुद्दीन हक्कानी कोण? सिराजुद्दीन हक्कानी कोण? हक्कानी नेटवर्कचा म्होरक्या आणि पाकिस्तानी आयएसआयने पाळलेला दहशतवादी. हक्कानी नेटवर्क आयएसआयनेच तयार केले होते. याच हक्कानीच्या घरापासून काही अंतरावर जवाहिरी राहत होता. तसेच अमेरिकेचा दुतावास आणि सैन्य अड्डा जिथे होता, त्यापासून हे ठिकाण अगदी हाकेच्या अंतरावर होते. पाकिस्तानला ग्रे लिस्टमधून बाहेर पडायचे आहे. हक्कानीचा पालनकर्ता आयएसआय चिफ अमेरिकेत कशासाठी गेला होता? जवाहिरीची डील करण्यासाठी का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.