ट्रम्प यांना पॉर्नस्टारला 33 लाख रुपये द्यावे लागणार; 'तो' सनसनाटी आरोप पडला महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 03:02 PM2020-08-23T15:02:45+5:302020-08-23T15:35:26+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एका पॉर्नस्टारला जवळपास 33 लाख रुपये द्यावे लागणार आहेत. अमेरिकेतील एका न्यायालयाने हा आदेश दिला आहे. स्टॉर्मी डॅनियल्स नावाच्या या पॉर्नस्टारने म्हटले आहे, की तिचे ट्रम्प यांच्याशी अफेअर होते. मात्र, ट्रम्प यांनी हे फेटाळले आहे.

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, 41 वर्षीय स्टॉर्मी डॅनियल्सने ट्रम्प यांच्या विरोधात खटला भरला होता. तीचा खटला नंतर रद्द झाला. आता कोर्टाने म्हटले आहे, की खटल्यादरम्यान डॅनियल्सचे जे पैसे खर्च झाले आहेत, ते ट्रम्प यांना चुकवावे लागतील.

कॅलिफोर्नियातील न्यायालयाने ट्रम्प यांना 33 लाख रुपये संबंधित पॉर्नस्टारला देण्याचा आदेश दिला आहे. डॅनियल्स यांच्या वकिलाने न्यायालयाच्या निर्णयाची माहिती दिली. स्टॉर्मी डॅनियल्सने या निर्णयानंतर ट्विट करत म्हटले आहे, की हो, एक आणखी विजय!

ट्रम्प यांच्या विरोधात खटला भरल्यानंतर स्टॉर्मी डॅनियल्सने एक पुस्तकही लिहिले होते. यात तिने ट्रम्प यांच्या सोबत असलेल्या संबंधांचाही उघडपणे उल्लेख केला होता. हे पुस्तक प्रचंड चर्चेत आले होते.

डॅनियल्स यांचे म्हणणे होते, की ट्रम्प यांच्याशी असलेल्या कथित अफेअरनतंर तिला गप्प राहण्यासाठी पैसेही देण्यात आले होते. यासाठी एक करारही करण्यात आला होता.

ट्रम्प यांच्या वकिलामार्फत तिला जवळपास 97 लाख रुपये देण्यात आले होते. एवढेच नाही, तर डॅनियल्सने दावा केला होता, की 2006 मध्ये ट्रम्प यांच्याशी तिचे अफेअर होते.

पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्सने डोनल्ड ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तिने दावा केला होता, की 2006 मध्ये कॅलिफोर्निया आणि नेवादादरम्यान असलेल्या लेक टोहोय हॉटेलमध्ये तिची ओळख डोनल्ड ट्रम्प यांच्याशी झाली. तेव्हा ट्रम्प एक व्यवसायिक होते.

2011मध्ये ‘इनटच’ला दिलेल्या मुलाखतीत पॉर्नस्टारने म्हटले होते, की ट्रम्प यांनी तिला डिनरचे आमंत्रण दिले होते. यासाठी ती ट्रम्प यांना त्यांच्या हॉटेलच्या खोलीत भेटण्यासाठी गेली होती.

तिने म्हटले होते, की ट्रम्प “बिछान्यावर पाय पसरून बसले होते आणि कदाचित ते टीव्ही पाहत होते. ते पायजम्यावर होते.

डॅनियल्सने दावा केला आहे, की तिने हॉटेलमध्ये ट्रम्प यांच्यासोबत सेक्स केला. मात्र, ट्रम्प यांनी सातत्याने तिचा हा दावा फेटाळून लावला आहे.

एवढेच नाही, तर ट्रम्प म्हणाले होते, की ते त्यांच्या टेलीव्हिजन शो ‘द अॅपरेन्टिस’मध्ये आपल्याला संधी देऊ शकतात. असेही डॅनियल्सने म्हटले आहे.