CoronaVirus News : कोरोनापासून बचाव करण्यासाठी 'नेकलेस' तयार, पण... By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 08:07 PM2020-07-06T20:07:31+5:302020-07-06T20:27:21+5:30Join usJoin usNext कोरोनावर मात करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ लस शोधत आहेत. तर काही देशांमध्ये कोरोनावरील उपचार करण्यासाठी विचित्र मार्ग सुचविले जात आहेत. इंडोनेशियातील कृषी मंत्रालयाने असा दावा केला आहे की, 'युकलिप्टस' नावाच्या वनस्पतीपासून बनविलेला 'अँटी-व्हायरस नेकलेस' कोरोनावर मात करू शकतो. यूकेलिप्टसवर आधारित हा अँटी-व्हायरस नेकलेस कोविड -१९ चा प्राणघातक संसर्ग रोखू शकतो, असे इंडोनेशियाचे कृषिमंत्री सियारुल यासीन लिंपो यांनी सांगितले. तसेच, मंत्रालय लवकरच या नेकलेसचे लाँचिंग केले जाणार असल्याचेही ते म्हणाले. कोरोनावर मात करणारा हा अँटी-व्हायरस नेकलेस' मंत्रालयाच्या आरोग्य संशोधन आणि विकास यंत्रणेने तयार केला आहे. पुढील महिन्यापासून या नेकलेसचे मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन केले जाईल. कोविड-१९ च्या उपचार किंवा बचावाच्या उद्देशाने मंत्रालयाच्या संशोधकांनी तयार केलेल्या चार उत्पादनांपैकी हा एक नेकलेस आहे, असे सियारुल यासीन लिंपो यांनी सांगितले. ‘ट्रिब्यून न्यूज’ च्या वृत्तानुसार सियारुल यासीन लिंपो यांनी सांगितले की, "हा नेकलेस तयार करण्यासाठी यूकेलिप्टसच्या 700 प्रजातींचा वापर करण्यात आला आहे. आमच्या प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत असे समोर आले की, हा नेकलेस कोरोना विषाणू नष्ट करण्यास सक्षम आहे." इंडोनेशियाच्या दक्षिणेकडील प्रांताच्या माजी राज्यपालांनीही याबाबत मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, "हा अँटी-व्हायरस नेकलेस केवळ 15 मिनिटांत 42 टक्के व्हायरस नष्ट करू शकतो." दरम्यान, सियारुल यासीन लिंपो म्हणाले, "आम्ही स्वतः हा हार वापरला आहे. हार 30 मिनिटांत 80 टक्के व्हायरस नष्ट करू शकतो. इतकेच नाही तर, चाकूने हातावर जखम झाल्यास, त्या जागी याचा वापर केल्यास जखम बरी होतो." याचबरोबर, हा अँटी-व्हायरस नेकलेस घातल्यानंतर गर्दीत जाण्याचे धाडस झाल्याचे सियारुल यासीन लिंपो यांनी सांगितले. सियारुल यासीन लिंपो हे बहुधा कामाच्यावेळी हा नेकलेस घालतात. तसेच, शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू आणण्यासाठी बाहेर जाताना हा नेकलेस घालून जातात. एजन्सीचे प्रमुख फडज्राय ड्जूफ्राई यांनी सांगितले की, कोरोना रूग्णांवर या नेकलेसची प्रोटोटाइपची चाचणी घेण्यात आली. यानंतर, रुग्णांमध्ये बरे होण्याचे प्रमाण दिसून आले. फडज्राय ड्जूफ्राई म्हणाले की, आम्ही कृषी मंत्रालयाच्या 20 कोरोना पॉझिटिव्ह कर्मचार्यांवर याची चाचणी घेतली होती. या सर्व रुग्णांना श्वास घेण्यात त्रास होत होता. परंतु प्रोडक्टचा वापर केल्यानंतर, त्यांची तब्येतीमध्ये वेगाने सुधारणा झाली. दरम्यान, कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या वक्तव्याशी आरोग्य तज्ज्ञ सहमत नाहीत. अशा वक्तव्यांमागे कोणतेही वैज्ञानिक तर्क दिसून येत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. स्थानिक जीवशास्त्रज्ञ संस्थेच्या उपसंचालकांनी सांगितले की, 'आम्हाला माहीत आहे की कोरोना व्हायरसवर औषध अद्याप सापडलेले नाही. मला असे वाटते की लोकांनी असे दावे करणे थांबविले पाहिजे.' दरम्यान, जगभरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. संपूर्ण जगात कोरोना रूग्णांची संख्या आतापर्यंत 1 कोटी 15 लाखांहून अधिक आहे. कोरोनावर मात करण्यासाठी अनेक देशांमध्ये शास्त्रज्ञ लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत.Read in Englishटॅग्स :कोरोना वायरस बातम्याइंडोनेशियाआरोग्यcorona virusIndonesiaHealth