पुरातत्व संशोधकांना खोदकामात सापडले 2000 वर्षे जुने शहर, समोर आली महत्वाची माहिती... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2021 01:27 PM 2021-11-03T13:27:40+5:30 2021-11-03T13:36:27+5:30
सुमारे 2000 वर्षांपूर्वी या संस्कृती विकसित झाल्या, पण यांचा अंत कशामुळे झाला हे अद्याप कळलेले नाही. रियाद: सौदी अरेबियात संशोधकांना मोठं यश मिळालं आहे. सौदी अरेबियातील वायव्य भागात असलेल्या अल-उला पर्वतांमध्ये पुरातत्व शास्त्रज्ञांना लुप्त झालेली राज्ये सापडली आहेत. या राज्यांशी संबंधित अवशेषांच्या माहितीसाठी पुरातत्वशास्त्रज्ञांचे पथक 24 तास खोदकाम करत आहे. या खोदकामात सापडलेल्या शहरांचा संबंध 'दादन' आणि 'लिह्यानाइट' संस्कृतीशी असल्याचे सांगितले जात आहे. या प्रोजेक्टशी संबंधित रॉयल कमिशनने सांगितले की, जुन्या काही डॉक्युमेंट्समध्ये या दादनचा उल्लेख आहे, तर लिह्यान हे त्याच्या काळातील सर्वात मोठे साम्राज्य होते.
युनेक्सोची मान्यता असलेले पहिले स्थळ- अल-उला हे सौदी अरेबियाचे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे, जे 2019 मध्ये सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. ती प्राचीन अरबस्तानची राजधानी मानली जाते. मुख्यतः अल-उला मदान सालेहच्या भव्य समाधीसाठी ओळखले जाते. मदान सालेह हे सौदी अरेबियाचे पहिले जागतिक वारसा स्थळ आहे, ज्याला युनेस्कोने मान्यता दिली आहे. हे ठिकाण अरबस्तानच्या प्राचीन रहिवाशांनी, नबात्यांनी खडक कापून बांधले होते. या लोकांनी सध्याच्या जॉर्डनमध्ये असलेले पेट्रा देखील बांधले.
2 हजार वर्षांपुर्वीच्या सभ्यता- फ्रेंच आणि सौदी पुरातत्वशास्त्रज्ञांची टीम आता दादन आणि लिह्यान संस्कृतीशी संबंधित पाच स्थळांचे उत्खनन करत आहे. सुमारे 2000 वर्षांपूर्वी या भागात या सभ्यता विकसित झाल्या. या संस्कृतींचा अंत होण्याचे कारण काय होते हे अद्याप कळलेले नाही. दादन पुरातत्व मिशनचे सह-संचालक अब्दुलरहमान अल-सोहेबानी यांनी सांगितले की, हा एक असा प्रकल्प आहे जो खरोखरच या सभ्यतेचे रहस्य उघड करू शकतो.
येणाऱ्या काळात महत्वाची माहिती मिळणार- या सामार्जाच्या सीमा दक्षिणेकडील मदिना ते उत्तरेकडील आधुनिक जॉर्डनमधील अकाबापर्यंत विस्तारलेल्या आहेत. इसवी सन 100 पर्यंत सुमारे 900 वर्षे दोन्ही राज्यांनी महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवले. पण, या दोन राज्यांबद्दल फारच कमी माहिती सार्वजनिक आहे. सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणात खोदकाम केले जात असून, येणाऱ्या काळात जुन्या सभ्यतांबद्दल महत्वाची माहिती समोर येणार आहे.