"अटल टनेल युद्धात निरुपयोगी ठरेल, चिनी सैन्य काही मिनिटांतच नष्ट करेल" चीनची भारताला धमकी By बाळकृष्ण परब | Published: October 5, 2020 05:25 PM 2020-10-05T17:25:49+5:30 2020-10-05T17:45:43+5:30
Global times on Atal Tunnel Marathi News : दळणवळण आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या हिमाचल प्रदेशमधील अटल टनेलचे लोकार्पण नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले आहे. दरम्यान, या अटल टनेलच्या निर्मितीमुळे चीनला चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत. लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे चीनकडून शांततेची वार्ता केली जात आहे. तर दुसरीकडे चिनी सरकारच्या नियंत्रणाखालील प्रसारमाध्यमे भारताला सातत्याने धमक्या देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतेच लोकार्पण केलेल्या अटल टनेलवरून चीनमधील ग्लोबल टाइम्सने भारताला धमकी दिली आहे. रोहतांगमध्ये बांधण्यात आलेला हा अटल टनेल युद्धाच्या काळात भारताच्या उपयोगी येणार नाही, असा दावा ग्लोबल टाइम्सने केला आहे.
शांततेच्या काळात हा बोगदा भरतासाठी उपयुक्त ठरेल. मात्र युद्धकाळात हा बोगदा टिकणार नाही. युद्धकाळात हा बोगदा निरुपयोगी ठरेल. तसेच चिनी सैन्य अवघ्या काही काळातच त्याला नष्ट करेल. पीएलएकडे बोगदे निरुपयोगी करण्याचे अनेक उपाय आहेत, असा दावा ग्लोबल टाइम्सने केला आहे.
ग्लोबल टाइम्समध्ये म्हटले आहे की, अजूनही शांततेची वेळ आहे. युद्धाला तोंड फुटल्यास अटल टनेल निरुपयोगी ठरेल याची भारताला जाणीव नाही. भारतातील नेतेमंडळी याचा वापर केवळ दिखाव्यासाठी आणि आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर करत आहेत.
दरम्यान, अटल टनेलची निर्मिती करण्यात आलेला भाग हा पर्वतीय प्रदेश आहे.येथील लोकसंख्या विरळ आहे. त्यामुळे या अटल टनेलची बांधणी केवळ लष्करी वापराच्या हेतूनेच करण्यात आली आहे, असा दावाही ग्लोबल टाइम्सने केला आहे.
कुठलाही बोगदा भारताची लढाऊ क्षमता वाढवू शकत नाही. भारत आणि चीनच्या सामरिक शक्तीमध्ये मोठा फरक आहे. विशेषकरून भारताची युद्ध लढण्याची क्षमता ही अगदीच ढिसाळ आहे. भारत आणि चीनच्या क्षमतेमध्ये मोठे अंतर आहे, असे सांगत ग्लोबल टाइम्सने भारताला संयमाने वागण्याचा सल्ला दिला आहे.
हिमाचल प्रदेश आणि लेह या भागांना जोडणाऱ्या अटल टनेलचे राष्ट्रार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले होते. रोहतांग येथे तयार करण्यात आलेल्या या बोगद्याचे राष्ट्रार्पण करताना मोदींनी हा बोगदा देशाच्या बॉर्ड इन्फ्रास्ट्रक्चरची नवी ओळख बनेल, असे सांगितले होते.
तज्ज्ञांच्या मते भारताच्या सीमावर्ती भागातील बांधकाम भक्कम होताना पाहून चीनमधील प्रसारमाध्यमे अस्वस्थ झाली आहेत. तसेच चीन सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने अटल टनेलबाबतही आपला प्रोपेगेंडा छापून भारताला धमकी देण्याचा प्रयत्न केला आहे.
भारत चीनला लागून असलेल्या सीमेवर रस्ते पूल आणि अन्य इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करत आहे. भारताने गतवर्षी डीएसडीबीओ रोड हा २५५ किमी लांबीचा मार्ग बांधला हे काम पूर्ण करण्यासाठी भारताला २० वर्षे लागली. याशिवाय भारत सरकारने अजून ७३ मार्ग निश्चित केले आहेत ज्यांच्यावरून हिवाळ्यातही वाहतूक होत राहील, यावरून ग्लोबल टाइम्सने भारताला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.
मात्र युद्धाच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या या रस्त्यांचे भविष्य तीन व्यावहारिक बाबींवर अवलंबून असते. पहिली बाब म्हणजे भारत सरकारची इच्छा, दुसरी बाब म्हणजे वित्तीय तरतूद आणि तिसरी बाब म्हणजे तंत्रज्ञान. मात्र तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारत चीनच्या तुलनेत खूप मागे आहे. हे ७३ मार्ग बांधण्याची गोष्ट दहा वर्षांपूर्वी केली गेली होती. मात्र आतापर्यंत हे रस्ते बांधले गेलेले नाहीत. त्यामुळे भारताच्या मर्यादा स्पष्ट होतात. त्याशिवाय पर्वतीय भागात रस्ते बांधणे कठीण काम आहे. भारत सरकारला अशा योजनांवर काम करण्याचा कमी अनुभव आहे.